... and Shiv Sena done the praise of the BJP | ...अन् शिवसेनेने केले भाजपाचे कौतुक
...अन् शिवसेनेने केले भाजपाचे कौतुक

मुंबई - एरवी प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेवरून भाजपावर बोचरी टीका करणा-या शिवसेनेने रविवारी मात्र भाजपाचे कौतुक केले. ईशान्य भारतातील भाजपाचा विजय म्हणजे वाळवंटातून केशराचे पीक काढण्यासारखे आहे. सुनील देवधर नावाच्या एका मराठी माणसाने कम्युनिस्टांची राजवट उलथवून टाकली, अशा शब्दांत भाजपाचे कौतुक करतानाच या निकालामुळे मोदी-शाह यांच्याशिवाय भाजपामध्ये तिसरा माणूस उदयाला आला, अशी कोपरखळी मारायलाही शिवसेना विसरली नाही.
ईशान्य भारतातील तीन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया देताना भाजपाचे कौतुक केले. देशाच्या राजकारणापेक्षा, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विजय महत्त्वाचा असल्याचे राऊत म्हणाले. उत्तर प्रदेश, गुजरातमधला विजय सोपा असतो. तेथे पक्षाची बांधणी आहे. राम मंदिर, गोध्रासारखे विषय असतात फोडणी द्यायला. पण त्रिपुरा, नागालँडसारख्या राज्यात जाऊन काम करणे, पक्ष उभा करणे आणि विजय मिळवणे ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असते. या राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सत्तापरिवर्तन होणे गरजेचे होते. त्यामुळे भाजपाचा हा विजय महत्त्वाचा वाटतो, असे राऊत म्हणाले.

आशिष शेलारांना तिखट भाषेत प्रत्युत्तर
ज्यांच्या डोक्यात किडे वळवळत असतात ते नाखूश असतात, अशा शब्दांत राऊत यांनी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचा समाचार घेतला. ईशान्येतील यश देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तेथे राष्ट्रीय विचारांचा पगडा असलेला एक पक्ष उभा राहतो आणि जिंकून येतो तेव्हा ते निकाल देशासाठी महत्त्वाचे ठरतात.


Web Title:  ... and Shiv Sena done the praise of the BJP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.