आॅनलाइन लोकमत

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) दि. १८- दारू बाळगण्याचा परवाना असलेल्यांना आता महिन्यातून फक्त दोनच बाटल्या बाळगता येतील. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव व्ही.राधा यांनी दिली.
अवैध दारू विक्री विरोधातील कायद्याचा मसुदा तयार होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत अनेक सूचना केल्या आहेत. या मसुद्याबाबत चर्चा करण्यासाठी व्ही. राधा शुक्रवारी राळेगणसिध्दीत आल्या होत्या. अण्णा हजारे, व्ही.राधा, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची सुमारे तासभर याप्रश्नी चर्चा झाली.
पूर्वी दारू पिणाऱ्या परवानाधारकास महिन्याला दारूच्या बारा बाटल्या बाळगण्याची परवानगी होती. अण्णा हजारे यांनी त्यास आक्षेप घेतला होता. या परवानगीने ग्रामीण भागात घराघरात दारूची दुकाने होतील, अशी भीती अण्णांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करून यात बदल करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागाच्या राज्य सचिव व्ही.राधा यांच्यात बैठकही झाली होती. त्यानंतर फक्त दोन बाटल्याच बाळगता येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला.
सचिव व्ही.राधा म्हणाल्या, अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अवैध दारूविक्री विरोधात नवा कायदा करण्यात येत आहे. अण्णांच्या सूचनेनुसार ग्रामसभेला कायद्याने अधिकार देऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात येईल. अवैध दारूविरोधात कारवाई करण्याचे अधिकार ग्रामसुरक्षा दलाला देण्यात येणार आहेत. दारूविक्री करणाऱ्यांविरोधात महिलांनी थेट माझ्याकडेच तक्रार करावी. आम्ही तातडीने कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातून राज्यातील व्यसनमुक्ती अभियानाची चळवळ
राज्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये दारू, तंबाखू, गुटखा विरोधात व्यसनमुक्ती अभियान चळवळ राबविण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ नगर जिल्ह्यातूनच होणार असल्याची माहिती व्ही.राधा यांनी दिली.