‘घोडावत ग्रुप’ची बेळगावातून विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:13 AM2017-07-25T01:13:16+5:302017-07-25T01:13:16+5:30

जानेवारीपासून प्रारंभ : ५० सीटर विमान खरेदी करार; कोल्हापुरातून ने-आण करण्यासाठी खास व्यवस्था

Airlines from Belgaum of 'Ghodavat Group' | ‘घोडावत ग्रुप’ची बेळगावातून विमानसेवा

‘घोडावत ग्रुप’ची बेळगावातून विमानसेवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : संजय घोडावत ग्रुपतर्फे जानेवारीपासून बेळगावमधून हवाई सेवेला प्रारंभ केला जाणार आहे. ‘स्टार एअर’ या हवाई सेवेसाठी ‘एम्ब्रार-ई. आर.’ ‘जे. १४५ एल. आर.’ या दोन ५० सीटर विमानांच्या खरेदीचा करारही नुकताच झाला. बेळगावमधील सांबरा विमानतळावरून पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, चेन्नई, तिरूपती अशी हवाई सेवा सुरू केली जाईल. या हवाई सेवेमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील औद्योगिक, शैक्षणिक, राजकीयसह इतर क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळणार आहे. कोल्हापुरातून बेळगाव विमानतळापर्यंत प्रवाशांची ने-आण करण्यासाठी विशेष बससेवाही सुरू केली जाणार आहे.
हवाई उड्डाण मंत्रालयातून त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता केली गेली आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत उर्वरित काही कायदेशीर बाबी पूर्ण होतील. संजय घोडावत ग्रुपने याआधी कोल्हापुरातून हवाई सेवेची परवानगी शासनाकडे मागितली होती. जवळपास सहा वर्षे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रन-वे, नाईट लँडिंग तसेच टर्मिनल बिल्डिंगच्या सुविधा शासन पातळीवरून उपलब्ध होऊ न शकल्याने हा प्रस्ताव मागे पडला तरीही विमानतळ विकसित करून द्या, व्यवस्थापन करू, असा प्रस्ताव ‘घोडावत ग्रुप’ने दिला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह परिसराचा विकास अधिक गतीने होऊ शकणार होता. मात्र, तसे झाले नाही. त्यानंतर घोडावत ग्रुपने बेळगावच्या सांबरा विमानतळाकडे लक्ष केंद्रीत केले. नोव्हेंबर २०११ पूर्वी ‘किंगफिशर एअरलाईन्स’ची सेवा कोल्हापूर विमानतळावरून सुरू होती. मात्र काही काळानंतर ही सेवा बंद झाली. त्याचा औद्योगिक विकासाला फटका बसून मोठ्या कंपन्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरविली. अशा स्थितीत घोडावत ग्रुप बेळगावमधून हवाई सेवेस प्रारंभ करत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या अविकसित भागाचा विकासही या प्रकल्पामुळे साधला जाणार आहे.


दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरांना जोडणार

बेळगावमधून पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबईसह विविध प्रमुख मोठ्या शहरांना हवाई सेवेने जोडले जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने देशातील प्रमुख शहरेदेखील जोडली जाणार आहेत. बेळगाव-दिल्ली या मार्गावरील ५२ तासांचा प्रवास हवाई मार्गावरून केवळ अडीच तासांत, तर बेळगाव-तिरूपती हा बारा तासांचा प्रवास अवघ्या दीड तासांत पूर्ण होणार आहे.


घोडावत ग्रुपने हवाई सेवेच्या माध्यमातून मोठे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून ग्रुपचा लौकिक वाढण्यास मदत होणार असून भविष्यात ‘स्टार एअर’ यशस्वी झेप घेईल. या हवाई सेवेमुळे कोल्हापूरसह कर्नाटकातील औद्योगिक, शैक्षणिक व पर्यटनाला गती मिळण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय हेलिकॉप्टर पायलट परवानाही नुकताच मिळाला असून स्वत:चे हेलिकॉप्टर चालविणारे देशातील तिसऱ्या उद्योगपती बनण्याचा मान मिळाला आहे. हवाई सेवेचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. याचा आनंद वाटतो.
- संजय घोडावत, उद्योगपती

Web Title: Airlines from Belgaum of 'Ghodavat Group'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.