ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 17 - शहरातील निर्जन ठिकाणी दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. शेवगाव शहरालगत आखेगाव रस्ता व जुना सालवडगाव रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या निर्जन ठिकाणी ही घटना घडली आहे. तर आणखी एकाची प्रकृती अत्यवस्थ असून त्याला नगरला उपचारासाठी हलवण्या आले आहे. रविवारी ( 16 जुलै ) मध्यरात्री ही घटना घडली. 
 
सकाळी फिरायला जाणा-या लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली. दीपक रामनाथ गोर्डे ( वय 35) व मंगल अनिल अळकुटे ( वय 32 ) अशी  मृतांची नावे असून बाळू रमेश केसभट ( वय 28) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. 
 
पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे दुहेरी हत्याकांड अनैतिक संबधातून घडल्याची परिसरात चर्चा होती. दरम्यान, पोलीस हत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.  गेल्या महिन्यात 17 जून रोजी शहरातील विदयानगर परिसरात माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे यांच्यासह  कुटुंबातील चार जणांची हत्या झाली होती. त्यातील तीन आरोपी पोलिसांनी जेरबंद केले. तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या घटनेला महिना होत नाही तोच पुन्हा दुहेरी हत्याकांडाचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
 
आणखी बातम्या वाचा