तब्बल ३९२ वर्षांनंतर झाली ‘त्या’ गावात जत्रा

By सचिन खुटवळकर | Published: March 3, 2019 12:55 AM2019-03-03T00:55:30+5:302019-03-03T00:57:41+5:30

सातेरी देवीचा जागर : ग्रामस्थांची एकजूट, सांस्कृतिक ठेव्याचे पुनरुज्जीवन

After that 392 years later, JATRA in the 'that' village | तब्बल ३९२ वर्षांनंतर झाली ‘त्या’ गावात जत्रा

मोर्ले-दोडामार्ग येथील श्री सातेरी देवीचे मंदिर.

googlenewsNext

सचिन खुटवळकर/पणजी
गावातील जत्रा बंद पडण्याचे प्रकार कोकण-गोव्यात काही नवे नाहीत. अनेक गावात मानपानावरून किंवा धार्मिक कारणांमुळे अनेक वर्षे जत्रा होत नाहीत. नंतर सामंजस्याची भूमिका घेऊन ग्रामस्थ पुनश्च जत्रा सुरू करतात, असाही अनुभव बऱ्याचदा येतो. कोकणात असाच एक गाव आहे, जिथे तब्बल ३९२ वर्षांनंतर जत्रा भरली. दशावतारी आले, ‘कालोत्सव’ झाला आणि गावच्या सांस्कृतिक कोंदणाला आणखी एक पैलू लाभला.
ही कहाणी आहे मोर्ले गावाची. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील हा गाव. श्री सातेरी देवी पंचायतन हे इथले देवस्थान. गोव्याच्या सीमेपासून अवघ्या २२ किमी. अंतरावर असलेल्या या गावातील बुजूर्गांनाही कधी जत्रा झाल्याचे आपल्या बालपणात पाहिल्याचे, ऐकल्याचे स्मरत नाही. इतकेच नव्हे, तर देवस्थानशी निगडित काही संदर्भही काळाच्या ओघात लुप्त झाले होते. श्रीराम नवमी, वार्षिक हरिनाम सप्ताह, नवरात्रोत्सव, धालोत्सव, शिमगोत्सव असा प्रगल्भ सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या गावच्या अनेक पिढ्या गेल्या, त्या जत्रा होत नसल्याची वेदना उरात बाळगूनच. परंतु सध्याच्या पिढीने एक निर्धार केला, तो म्हणजे देवस्थानाशी निगडित जुने संदर्भ शोधायचे आणि खंडित झालेली धार्मिक कार्ये पुनश्च सुरू करायची.
श्री सातेरी देवी देवस्थान कमिटी या कामी अग्रेसर राहिली. सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेतले गेले. कौल, प्रसाद या पारंपरिक धार्मिक रिवाजांचा आधार घेतला. हे कार्य करण्यात वाकबगार असणाऱ्या बांदा येथील एका जाणकाराने त्यासाठी सहकार्य केले. त्यातून एक-एक ऐतिहासिक संदर्भ जुळत गेला आणि देवस्थानशी निगडित अनेक बाबी उलगडू लागल्या. जत्रेची परंपरा खंडित होण्याचा कालावधी याच आधारे शोधला असता, तो ३९२ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. याच दरम्यान मंदिर प्राकारात असलेल्या पाषाणदेवतांचे महत्त्वही अधोरेखित झाले व ग्रामस्थांनी अथक परिश्रम करून काही दिवसांतच उघड्यावर असलेल्या श्री वेताळ पंचायतन, श्री नितकारी व श्री म्हारींगण देवतांच्या पाषाणांवर छपरे चढविली. त्यानंतर गावात जत्रा करण्यास अनुमती देणारा देवीचा ‘कौल’ मिळाला. मात्र धार्मिक संकेतानुसार, ग्रामस्थांनी जत्रा होईपर्यंत शाकाहारी भोजन व मद्यसेवन त्याज्य करणे आवश्यक होते. तब्बल ४५ दिवस सर्व ग्रामस्थांनी ही ‘पाळणूक’ केली.
अखेर शनिवार दि. ९ फेब्रुवारी हा दिवस उजाडला. मंदिराचा आसमंत विद्युत रोशणाईने झगमगून गेला. गावात खेळण्यांची, खाजाची दुकाने आली. हॉटेलवाले, फूल विक्रेते, इतर दुकानदारांनी डेरा टाकला. लेकी माहेरी आल्या. मुंबईकर चाकरमानी कुटुंबासह दाखल झाले. गाव गजबजला. सायंकाळी दशावतारी कंपनी आली. हजारो भाविकांनी मंदिराला भेट दिली. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. तब्बल ३९२ वर्षांनी मध्यरात्री मंदिराभोवती अवसारी पुरुषांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात देवीची मानाची तळी फिरविण्यात आली. नंतर दशावतारी नाटक झाले व पहाटे दहीकाल्याने जत्रेची सांगता झाली.

शिवलिंगाचा २१ दिवसांत जीर्णोद्धार; उद्या महाशिवरात्री उत्सव
श्री सातेरी मंदिराच्या उजव्या बाजूस उघड्यावर एका दगडी चौथऱ्याच्या मध्यभागी शिवलिंगाच्या आकाराचा एक दगड होता. पूर्वापार ‘लिंगाचा दगड’ म्हणून हे ठिकाण ओळखले जात असे. जत्रोत्सवासंबंधी चौकशी करताना हे ठिकाण म्हणजे काळाच्या ओघात लुप्त झालेले शिवलिंग असल्याचे निदर्शनास आले. जत्रेपूर्वी या शिवलिंगाची पुन:प्रतिष्ठापना करणे अनिवार्य होते. केवळ २१ दिवसांत मंदिर बांधणे आवश्यक असल्याने ग्रामस्थ तयारीला लागले. त्यासाठी कुडाळ येथील मूर्तिकारांना शिवलिंग, नंदी व गोमुख अशी तीन पाषाणे बनविण्याचे कार्य सोपविण्यात आले. ग्रामस्थ, महिला, युवकांनी रात्रंदिवस मेहनत करून गवंड्यांच्या मदतीने टुमदार ‘श्री लिंगेश्वर’ मंदिर उभारले. त्यानंतर जीर्ण झालेले शिवलिंग बुधवार दि. ६ फेब्रुवारी रोजी विधिवत काढून त्या जागी गुरुवार दि. ७ फेब्रुवारी रोजी नव्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी सोमवार दि. ४ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव होणार आहे.

Web Title: After that 392 years later, JATRA in the 'that' village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :konkanकोकण