Adv. Directional leadership was defeated due to the demise of Madhukarrao Pratkar! - Vikhe Patil | अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे दिशादर्शक नेतृत्व हरपले!- विखे पाटील

मुंबई- ज्येष्ठ काँग्रेस नेते अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे राज्याचे एक दिशादर्शक व अनुभवी नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. अ‍ॅड. किंमतकर यांच्या निधनावर विखे पाटील यांनी दुःख व्यक्त केले.

दिवंगत नेत्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, अ‍ॅड. किंमतकर हे जमिनीशी नाळ जुळलेले जाणते नेते होते. विचारधारेशी त्यांची कमालीची बांधिलकी होती. आयुष्यभर त्यांनी लोकांसाठी संघर्ष केला. आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. विदर्भाबाबत त्यांचा दांडगा अभ्यास होता. विदर्भातील परिस्थिती, समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत ते सतत आग्रही भूमिका मांडायचे.

एक आमदार आणि मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक जाणते नेतृत्व गमावल्याचे सांगून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.