सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 20  : शिवसेना खासदारांच्या मागणीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने मुंबईत एलफिस्टन रोड रेल्वेस्थानकाचे नवे नाव प्रभादेवी मंजूर केले आहे. उर्वरित ८ रेल्वे स्थानकांच्या नावातला बदल लवकरच मंजूर होईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत, दिवाकर रावते व श्रीरंग बारणे यांना दिली.

शिवसेना खासदारांनी पश्चिम रेल्वेच्या एलफिस्टन रोड रेल्वेस्थानकाचे नाव प्रभादेवी, बॉम्बे सेंट्रलचे नाना शंकरशेठ, ग्रँटरोडचे गावदेवी, चर्नीरोडचे गिरगाव, मध्य रेल्वेच्या करी रोडचे लालबाग, सँडहर्स्ट रोडचे डोंगरी व हार्बर रेल्वेच्या कॉटन ग्रीनचे काळा चौकी आणि रे रोडचे घोडपदेव अशी विनंती केंद्रीय गृह मंत्रालयाला केली आहे.

राज्य सरकारमार्फत आलेला नावातल्या बदलाचा प्रस्ताव, सरकारी स्तरावर गृह मंत्रालय आपल्या शिफारसीसह रेल्वे मंत्रालयाकडे पाठवते. रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सदर प्रस्ताव अंतिम मंजुरीसह गृह मंत्रालयामार्फत राज्य सरकारकडे पाठवला जातो. या प्रक्रि येत आत्तापर्यंत एलफिस्टन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्यास गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. उर्वरित आठ स्थानकांच्या नावातील बदलालाही लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती राजनाथसिंगांनी शिवसेना खासदारांना दिली.