नागपूर,  दि. 13 - आरोग्यसेवेच्या क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात उपचार होतात. त्यामुळे या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी आहेत. नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता या शहरात आंतरराष्ट्रीय मेडिकल हब होण्याची पूर्ण क्षमता आहे. विशेष म्हणजे येत्या काळात येथे ‘मेडिकल टुरिझम’ वाढीस लागेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देशातील पहिल्या ‘इंडो-युके इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेडिसिटी’च्या कोनशीलेचे रविवारी अनावरण करण्यात आले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. 
वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला खा.अजय संचेती, खा.कृपाल तुमाने, आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.आशीष देशमुख, आ.प्रकाश गजभिये, महापौर नंदा जिचकार, ‘एमएडीसी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, ‘इंडो-युके इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेडिसिटी’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय राजन गुप्ता, ब्रिटीश उच्चायुक्तामधील व्यापार, वित्त विभागाच्या उपसंचालिका जेन ग्रेडी, ईआन वॉटसन, मार्क हिचमॅन प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी यासंदर्भात ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत करार केला होता. त्याअंतर्गत देशात ११ ‘मेडिसीटी’ स्थापन होणार आहेत. यातील पहिल्या ‘मेडिसिटी’च्या स्थापनेचा मान नागपुरला मिळाला आहे. नागपूर ही व्याघ्र राजधानी आहे. अशा स्थितीत येथे उपचार घ्यायला येणाºया विदेशी रुग्णांना नैसर्गिक पर्यटनाचादेखील आनंद घेता येईल. २०१९ पर्यंत ‘मेडिसिटी’चा पहिला टप्पा पूर्ण होईल, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

‘मिहान’चा चेहराच बदलेल
 

२० वर्षांपूर्वी‘ मिहान’चा आराखडा तयार झाला तेव्हा ‘मेडिकल टुरिझम’साठी विशेष क्षेत्र राखीव ठेवण्यात आले होते. मात्र हा प्रकल्प लांबला. सत्ताबदलानंतर ‘मिहान’च्या विकासाने वेग घेतला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी तर यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. हे एक इस्पितळ राहणार नसून ‘मेडिसिटी’ आहे. त्यामुळे यातून निश्चितच ‘मिहान’चा चेहरामोहराच बदलेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.