अभिजीत बिचुकलेला तिसऱ्या गुन्ह्यात अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 08:35 PM2019-07-06T20:35:51+5:302019-07-06T20:36:51+5:30

दहा वर्षांपूर्वी पोस्टमनला मारहाण केल्याचा आरोप

Abhijit Bichukale arrested in third case Sent to judicial custody | अभिजीत बिचुकलेला तिसऱ्या गुन्ह्यात अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी

अभिजीत बिचुकलेला तिसऱ्या गुन्ह्यात अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी

Next

सातारा : धनादेश न वटल्याने बिग बॉसमधून पोलिसांनी अटक केलेल्या अभिजीत बिचुकले (रा. केसरकर पेठ, सातारा) याच्या मागचे शुक्लकाष्ट काही संपता संपेनासे झाले आहे. खंडणीच्या गुन्ह्यानंतर आता दहा वर्षांपूर्वी पोस्टमनला मारहाण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी बिचुकलेला शनिवारी अटक केली. यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

२८ हजारांचा धनादेश न वटल्याने अभिजीत बिचुकलेला काही दिवसांपूर्वी सातारा पोलिसांनी बिग बॉसमधून अटक केली होती. जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचवेळी पोलिसांनी पूर्वी दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली. या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे आदेश देण्यात आले. 

बिचुकलेने जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर १८ जुलैला सुनावणी होणार आहे. मात्र, खंडणी प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीची तारीख शनिवार, दि. ६ रोजी असल्यामुळे त्याला कळंबा कारागृहातून जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी खंडणीच्या खटल्यातील फिर्यादी फिरोज पठाण यांची महत्त्वपूर्ण साक्ष झाली. बिचुकले याने खंडणीचे पैसे मागितले नाहीत, असा कुठलाही प्रकार घडला नाही, अशी साक्ष पठाण यांनी दिली. अगोदरच तयारीने आलेल्या पोलिसांनी ही सुनावणी झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात दहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या ३५३ (शासकीय कामात अडथळा) गुन्ह्यात अभिजीत बिचुकलेला अटक केली. त्यानंतर न्यायालयाने या गुन्ह्यातही बिचुकलेला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, सोमवार, दि. ८ रोजी खंडणीच्या प्रकरणातील सुनावणी होणार असून, अभिजीत बिचुकलेच्या वतीने अ‍ॅड. श्रीकांत हुटगीकर हे काम पाहत आहेत.

काय आहे प्रकरण ?
२४ डिसेंबर २००९ रोजी पोस्टमन बाळाराम दादू घाडगे (वय ५९, रा. सदर बझार सातारा) हे गुरुवार पेठ परिसरामध्ये टपाल वाटत होते. त्यावेळी राहुल दिगंबर मोरे (रा. गुरुवार पेठ, सातारा) याने पोस्टमन घाडगे यांना अडवले. ‘आमचे पत्र आले आहे, ते द्या,’ अशी मागणी त्यांच्याकडे केली. परंतु घाडगे यांनी ‘तुमचे पत्र माझ्याजवळ  नाही. तुम्ही पोस्टात जाऊन चौकशी करा,’ असे सांगितले. यावरून त्याने घाडगे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याकडे दुर्लक्ष करून ते पुढे जात असताना तेथे अभिजीत बिचुकले आला. या दोघांनी पोस्टमन घाडगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळ असलेली पत्रे रस्त्यावर फेकून दिली. या घटनेनंतर घाडगे यांनी शहर पोलीस ठाण्यात राहुल मोरे, अभिजीत बिचुकले आणि अन्य एका महिलेवर गुन्हा दाखल केला होता.
 

Web Title: Abhijit Bichukale arrested in third case Sent to judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.