ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर 28 डिसेंबर रोजी कोणतीही व्यक्ती 10 पेक्षा अधिक 500 व 1000 रुपयांच्या नोटा बाळगल्यास त्या रकमेच्या पाचपट दंड किंवा 4 वर्षे कारावास, असा अध्यादेश निघाला. या निर्णयामुळे भारतातील सव्वा लाख संग्राहक अडचणीत व पेचात सापडल्याची माहिती संग्राहक किशोर चंडक खास 'लोकमत'शी बोलताना दिली.  मात्र 'आम्ही संग्राहक संग्रह केलेल्या नोटा बँकेत जमा करू शकत नाही. हवे असल्यास आम्ही जेलमध्ये जाऊ', असाही पवित्रा भारतातील संग्राहकांनी घेतला असल्याचेही किशोर चंडक यांनी सांगितले़ 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रोज सरकारतर्फे नवनवीन अध्यादेश निघत आहेत. अनेक अध्यादेश हे सरकारने ज्या दृष्टिकोनातून नोटाबंदी केली त्यास अनुसरून आणि बेहिशेबी पैसा चलनात यावा किंवा तो चलनातून बाद व्हावा, यासाठी काढला. मात्र 28 डिसेंबर रोजी काढण्यात आलेला अध्यादेश हा भारतातील सव्वा लाख संग्राहकांना धक्का देणारा ठरला आहे. सर्वसाधारण लोकांच्या दृष्टीने 500 किंवा 1000 रूपयांची नोट ही फक्त एक चलन असते़ मात्र संग्राहकाच्या दृष्टीने त्यामध्ये थोडा जरी फरक झाला म्हणजेच गव्हर्नरची स्वाक्षरी, वर्ष बदलले किंवा नोटाच नंबरमागे काही अद्याक्षरे आली तर ती नोट वेगळी म्हणून संग्राह्य होते़.
आजपर्यंत '500'च्या 64, '1000'च्या 54 वेळा नोटा बदलल्या
500 व 1000 रुपयांच्या आजपर्यंत प्रत्येकी 64 व 54 नोटा निघालेल्या आहेत. 500 रुपयाची पहिली नोट ही 2 ऑक्टोबर 1987 रोजी चलनात आली, तर 1000 रुपयांची पहिली नोट 1 एप्रिल 1954 रोजी चलनात आली. मात्र गांधीजींच्या चित्राची 1000 रुपयांची पहिली नोट ही ऑक्टोबर 2000 मध्ये चलनात आली. यातील काही नोटा यापूर्वीच चलनातून बाद झालेल्या आहेत. तरीही संग्राहकांच्या दृष्टीने त्या अतिशय मोलाच्याच आहेत. 

सोलापुरातील संग्राहक किशोर चंडक यांच्याकडे असलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटांचा संग्रह  

 
 
'नोटा संग्राहकांना दिलासा द्यावा'
नोटा संग्राहक हे काळा पैसा म्हणून नोटा संग्रह करत नाहीत़ तसेच या संग्रहित नोटा कोणत्याही अतिरेकी कारवाईसाठी वापरत नाहीत़ संग्राहक हा भारताच्या सांस्कृतिक ठेवेचा जतन करीत आहे. त्यांच्यासाठी या निघालेल्या अध्यादेशामध्ये योग्य ते बदल करावेत व संग्राहकांना दिलासा द्यावा. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ नये. -किशोर चंडक, संग्राहक, सोलापूर        

हे आहेत किशोर चंडक नोटांच्या संग्राहामुळे यांचे नाव 'लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड'मध्ये नाव आले आहे.