मुंबईत 791 इमारती धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 01:40 PM2017-07-25T13:40:07+5:302017-07-25T17:40:14+5:30

मुंबईत घाटकोपरमध्ये साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्यानंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

791 buildings in Mumbai are dangerous | मुंबईत 791 इमारती धोकादायक

मुंबईत 791 इमारती धोकादायक

Next

मुंबई, दि. 25 - मुंबईत घाटकोपरमध्ये साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्यानंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत एकूण 791 इमारती रहाण्यासाठी धोकादायक आहेत. मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याआधी मुंबई महापालिकेने धोकादायक इमारतींची एक यादी तयार केली होती. त्यात C-1 कॅटेगरीमध्ये 791 इमारती होत्या. अत्यंत धोकादायक इमारतींना C-1 कॅटेगरीमध्ये ठेवले जाते. 

हिंदुस्थान टाइम्सने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मार्च अखेरीस 791 पैकी 186 इमारती पाडण्यात आल्या तर, 117 इमारती रिकामी करण्यात आल्या. इमारतीला धोकादायक जाहीर करण्याआधी महापालिकेचे अधिकारी त्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करतात. त्यानंतर इमारत रिकामी करण्यासाठी नोटीस दिली जाते. पालिकेकडून अशा अतिधोकादायक इमारतींचा विद्युत पुरवठा खंडीत केला जातो तसेच पाणी जोडणीही तोडली जाते. 
 
महापालिकेच्या C-2 आणि C-3 कॅटगरीमध्येही काही इमारती असतात. C-2 यादीत ज्या इमारती येतात. त्या इमारतींच्या स्ट्रक्चरला रिपेअरची गरज असते. C-3 इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते. मुंबई महापालिका कायदा 1888 अंतर्गत पालिकेकडून नोटीस बजावली जाते. सात दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले जातात. हा कायदा इमारत रिकामी करण्याचा अधिकार देतो. 
 
आणखी वाचा 
VIDEO : घाटकोपर इमारत दुर्घटना Update : चौघांचा मृत्यू
गृहिणींचं कोलमडलं बजेट, भाजीपाला महागला
फेसबुकवरील "मोहम्मद अली अब्दलवहाब" या प्रोफाईलपासून सावधान
 
कुर्ल्याच्या एल वॉर्डमध्ये सर्वाधिक 113, त्यानंतर घाटकोपरच्या एन वॉर्डमध्ये 80 इमारती C-1 कॅटेगरीमध्ये आहेत. पावसाळयाआधी महापालिकेने एल वॉर्डमधील फक्त दोन इमारती पाडल्या आणि 19 इमारती रिकामी केल्या. माटुंगा, सायन आणि दादर या एफ नॉर्थ वॉर्डमध्ये 77 इमारती  C-1 कॅटेगरीमध्ये आहेत. पश्चिम उपनगरात अंधेरी के वॉर्डमध्ये 50 इमारती C-1 कॅटेगरीमध्ये आहेत. ज्या इमारती 30 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत त्यांना स्ट्रक्चरला ऑडीट बंधनकारक आहे. 2013 मध्ये डॉकयार्डमध्ये महापालिकेची 32 वर्ष जुनी इमारत कोसळली होती. त्यात 61 जणांचा मृत्यू झाला होता. 32 जण जखमी झाले होते.
 
घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली
घाटकोपरच्या दामोदर पार्क येथे श्रेयस सिनेमागृहाजवळची साई दर्शन ही चार मजली इमारत मंगळवारी सकाळी कोसळली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या इमारतीत 15 खोल्या होत्या तसेच इमारतीच्या तळमजल्यावर सितप नर्सिंग होम हे रुग्णालय होते. सुरुवातीला 8 ते 10  जण ढिगा-याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण ताज्या माहितीनुसार ढिगा-याखाली 35 ते 40 जण अडकले असण्याची शक्यता आहे.  
 

Web Title: 791 buildings in Mumbai are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.