७७८ महाविद्यालयांचे होणार आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:29 AM2018-06-15T06:29:16+5:302018-06-15T06:29:16+5:30

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व ७७८ महाविद्यालये आणि संस्थांचे त्रयस्थ शैक्षणिक आॅडिट करण्यात येणार असून त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरुवारी एका टास्क फोर्सची स्थापना केली.

 778 colleges will be audited | ७७८ महाविद्यालयांचे होणार आॅडिट

७७८ महाविद्यालयांचे होणार आॅडिट

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व ७७८ महाविद्यालये आणि संस्थांचे त्रयस्थ शैक्षणिक आॅडिट करण्यात येणार असून त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरुवारी एका टास्क फोर्सची स्थापना केली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प; मुंबईचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.आर.एस.माळी, वझे केळकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.गोविंद पारटकर आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव व्यंकटरमणी हे या टास्क फोर्सचे सदस्य तर राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने हे सदस्य सचिव असतील.
युजीसी, एआयसीटीई, बार कौन्सिल आॅफ इंडिया, कौन्सिल आॅफ आर्किटेक्चर, एनसीटीई आदी प्राधिकरणांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्थांमध्ये भौतिक सोईसुविधा आहेत की नाही याचे आॅडिट केले जाईल. महाविद्यालये व त्यांचे अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा तुकड्या आदींचे संलग्नीकरण व त्यांचे नूतनीकरण विहित तरतुदींनुसार करण्यात येत आहे व त्यानुसार आवश्यक त्या शुल्काचा भरणा/वसुली विद्यापीठाकडे मजा होत आहे की नाही याचेही आॅडिट केले जाईल.
या शिवाय, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव हे या समितीचे सदस्य तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव हे सदस्य सचिव असतील. टास्कफोर्सला आवश्यक तेव्हा मार्गदर्शन करणे, टास्क फोर्सने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे कृति-आराखडा (अ‍ॅक्शन प्लॅन) तयार करून कुलपतींकडे सादर करणे, ज्या संस्थांनी नियमांचे उल्लंघन केले आहे त्यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस करण्याचे अधिकार समितीला असतील.
प्रचलित यंत्रणा व कार्यपद्धतीमध्ये करावयाच्या सुधारणा आणि उपाययोजना सुचविणे आणि महाविद्यालयांनी नियमांच्या उल्लंघनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विद्यापीठास मार्गदर्शक सूचना देण्याचे काम ही समिती करेल.

विद्यार्थी व पालकांना विनाकारण मनस्ताप
मुंबई विद्यापीठाने वापरलेल्या आॅन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीवर टॅग केलेल्या शिक्षकांचा अत्यल्प सहभाग राहिल्याने तसेच हे मूल्यांकन वेळेत न होऊ शकल्याने विद्यार्थी व पालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला, असे खापरही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने फोडले आहे.

Web Title:  778 colleges will be audited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.