‘वंचित’च्या ६.५ टक्के मतांचा आघाडी, युतीलाही फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:04 AM2019-05-25T06:04:44+5:302019-05-25T06:05:03+5:30

काँग्रेस ४, तर राष्ट्रवादीचा ३ जागांवर पराभव

6.5 percent of the 'deprived' votes lead; | ‘वंचित’च्या ६.५ टक्के मतांचा आघाडी, युतीलाही फटका!

‘वंचित’च्या ६.५ टक्के मतांचा आघाडी, युतीलाही फटका!

Next

अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्र्वादी काँग्रेसच्या विजयावर पाणी फेरले. वंचितच्या उमेदवारांनी मिळवलेल्या मतांमुळे काँग्रेसच्या चार, राष्ट्रवादीच्या तीन तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन्ही उमेदवारांना विजयापासून ‘वंचित’ रहावे लागले. तर शिवसेनेला दोन आणि भाजपाला एका जागी पराभव पत्करावा लागला. राज्यातील ४८ जागांवर वंचितने उमेदवार उभे केले होते. त्यांना ४१ लाख ३९ हजार मतं मिळाली आहेत. ही मतं एकूण झालेल्या मतदानाच्या साडेसहा टक्के आहेत.


नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वंचितचा चांगलाच फटका बसला. येथे वंचितच्या उमेदवाराने १,६६,१९६ मते मिळवली. येथे अशोक चव्हाण यांचा ४०,१४८ मतांनी पराभव झाला. उस्मानाबादेत ‘वंचित’ने ९८,५७९ मते मिळवली पण येथे नोटाची मते १०,०२४ होती. येथे राष्टÑवादीचे जनजीतसिंह राणा यांचा १,२७,५६६ मतांनी पराभव झाला.
मराठवाड्यात परभणीमध्ये राष्ट्रवादीला वंचितचा फटका बसला. येथे ‘वंचित’ने १,४९,९४६ मते मिळवली. तर राष्टÑवादीच्या राजेश विटेकर यांचा ४२,१९९ मतांनी पराभव झाला.


माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा १,५८,६०८ मतांनी पराभव झाला व येथे ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर यांना १,७०,००७ मते मिळाली.
अमरावती येथे वंचितच्या उमेदवाराने ६५,१३५ मते मिळवली आणि तेथे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ ३६,९५१ मतांनी पराभूत झाले. औरंगाबादेतही वंचित आघाडी सोबत असणाऱ्या एमआयएमने ३,८९,०४२ मते मिळवली व तेथे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. बीडमध्ये ‘वंचित’ने ९२,१३९ मते मिळवली पण वंचित व इतरांची मते एकत्र केली तरीही प्रीतम मुंडे यांचे मताधिक्य कमी झाले नसते. बुलडाण्यात ‘वंचित’ने १,७२,६२७ मते मिळवली. येथे राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे १,३३,२८७ मतांनी पराभूत झाले.
चंद्रपूरमध्ये ‘वंचित’चा फटका भाजपला बसला. येथे वंचितच्या उमेदवाराने १,१२,०७९ मते मिळवली. येथे भाजपाचे माजी मंत्री हंसराज अहिर यांचा ४४,७६३ मतांनी पराभव झाला आहे. त्या उलट गडचिरोली चिमूर येथे काँग्रेसचे उमेदवार नामदेव उसेंडी यांना वंचितचा फटका बसला. येथे ‘वंचित’ने १,११,४६८ मते मिळवली आणि उसेंडी यांचा ७७,५२६ मतांनी पराभव झाला आहे.


राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने महाआघाडीत दोन जागा लढवल्या होत्या. मात्र दोन्ही जागा ‘वंचित’मुळे त्यांना गमवाव्या लागल्या. हातकणंगले येथे वंचितच्या उमेदवारास १,२३,४१९ मते मिळाली. आणि राजू शेट्टी यांचा पराभव ९६,०३९ मतांनी झाला. हीच अवस्था सांगलीत झाली. येथे वंचितच्या उमेदवाराने तब्बल ३,००,२३४ मते मिळवली. येथे विशाल पाटील यांचा १,६४,३५२ मतांनी पराभव झाला. हिंगोलीत वंचितच्या उमेदवारास १,७४,०५१ मते मिळाली पण येथे शिवसेनेच्या उमेदवाराने २ लाख ७७ हजार मतांपेक्षा जास्तीची आघाडी घेतली होती. अशीच परिस्थिती लातूरमध्येही झाली. मुंबईत वंचितच्या उमेदवारांनी मते मिळवली पण कोठेही त्यांच्यामुळे अन्य उमेदवाराचा पराभव झाला नाही.
अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हातकणंगले, हिंगोली, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, सांगली व सोलापूरात ‘वंचित’ने एक लाख ते अडीच लाखाच्या घरात मते मिळवली आहेत तर १६ लोकसभा मतदार संघात ५० हजार ते ९९ हजारांच्या आत मते मिळवली आहेत. त्यामुळे वंचितने अनेकांना सत्तेपासून वंचित ठेवल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर भाजपाची ‘बी टीम’ असा आरोपही झाला पण त्यांनी भाजप शिवसेनेच्या तीन जागाही पराभूत केल्या आहेत.


आंबेडकर यांना २,७८,८४८ मते
अकोल्यात वंचित आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २,७८,८४८ मते मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवाराला २,५४,३७० मते मिळाली. या दोघांच्या मतांची बेरीज ५,३३,२२१८ होते. ही जागा काँग्रेसने आंबेडकरांसाठी सोडली असती तरीही त्यांना विजयासाठी २१,२२६ मते कमी पडली असती. कारण येथे भाजपला ५,५४,४४४ मते मिळाली आहेत. तर अन्य उमेदवारांंना ३१,७७८ मतं आहेत.

Web Title: 6.5 percent of the 'deprived' votes lead;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.