एका महिन्यात एका जलपर्णी रोपाचा तीनशेपट विस्तार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 03:40 PM2019-06-21T15:40:25+5:302019-06-21T15:44:53+5:30

सोलापूरच्या कंबर तलावातील जलपर्णीच्या निर्मूलनासाठी जगभर होत आहे संशोधन

A 300-foot-long expansion of a waterfowl plant in one month | एका महिन्यात एका जलपर्णी रोपाचा तीनशेपट विस्तार 

एका महिन्यात एका जलपर्णी रोपाचा तीनशेपट विस्तार 

Next
ठळक मुद्दे पाण्यावर आच्छादनासारखी पसरत जाणाºया जलपर्णीमुळे  सूर्यप्रकाश व हवाही रोखली जातेपाण्यातील मासे, जीवजंतू यांना पुरेसा आॅक्सिजन व सूर्यप्रकाश न मिळाल्याने त्यांचे अस्तिवही धोकादायक वळणावरजलपर्णी समूळ नष्ट करण्यासाठी सध्यातरी काही उपाय नाही. पण आंतरराष्टÑीय स्तरावर यासंबंधी विविध प्रकारचे संशोधन सुरु

संजय शिंदे

सोलापूर : एकेकाळी कमळासाठी प्रसिद्ध असणारा येथील धर्मवीर संभाजी तलाव अर्थात कंबर तलावाला आता दुर्गंधी पसरविणाºया जलपर्णीने विळखा घातला आहे. जलपर्णी ही केवळ सोलापुरातीलच समस्या नाही तर जगभरात तिने आपले पाय पसरले आहेत. ही वनस्पती एवढ्या वेगाने वाढते की, एका जलपर्णीच्या महिनाभरात जवळजवळ २५० ते ३०० जलपर्णी तयार होतात. जलपर्णीच्या समूळ उच्चाटनासाठी आज जरी कोणताही पर्याय उपलब्ध नसला तरी तिच्या  निर्मूलनासाठी जगभर संशोधन सुरु आहे. 

‘इकोर्निया’ हे जलपर्णीचे शास्त्रीय नाव. अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाण्यात ही वनस्पती वेगाने वाढते. आजूबाजूला असलेल्या विविध वस्त्यांमधून येणारे सांडपाणी  कंबर तलावाच्या पाण्यात मिसळून ते प्रदूषित होते. 

याच परिसरात कपडेही धुतले जातात. साबण व पावडरची रसायने हे सुद्धा तलावात मिसळत असते. जलपर्णी वाढण्याला हे घटक कारणीभूत आहेत. पर्यायाने सोलापूरला आॅक्सिजन पुरवठा करणारा तलावाचा परिसर म्हणून  या तलावाची जी ख्याती होती ती आता लोप पावत आहे. 

जलपर्णीचा दुर्गंध जवळपास ५० मीटर परिसरात पसरत असल्यामुळे रहिवाशांबरोबरच येथे असलेल्या उद्यानात फिरायला येणाºयांनाही त्याचा त्रास होतो.

इंग्रजांनाही कंबर तलावाचे लागले होते वेड !
- कंबर तलाव म्हणजेच धर्मवीर संभाजी तलावाच्या निर्मितीचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. तलावाचा उल्लेख आठशे वर्षांपासून आढळतो. श्री सिद्धेश्वर या ग्रामदेवतेच्या गुरुस्थानी असलेल्या मंगळवेढ्याच्या रेवणसिद्ध या सिद्ध सांप्रदायिक महायोग्याने आपला योगदंड आपटून हे तळे निर्माण केले, अशी आख्यायिका आहे. तर काही जणांच्या मते उल्कापाताने हे तळे निर्माण झाले आहे. त्याच्या पश्चिमेला रेवणसिद्धेश्वरांचे प्राचीन हेमाडपंथी देवालय आहे. एकेकाळी हे मंदिर तळ्याकाठी होते, असे सांगितले जाते. लोकांनी भर घालून हे तळे आटवून त्याचा आकार लहान करुन टाकला असे म्हणतात.

- इंग्रजांनाही या तळ्याने आपल्या सौंदर्याने वेड लावले होते. १८७५ मध्ये सर अ‍ॅलन ह्यूम यांनी आपल्या ‘स्ट्रे फिदर्स’ या संशोधनपर पुस्तकामध्ये सोलापुरातील या तळ्याचे सुंदर वर्णन केल्याचे आढळते. ह्यूम म्हणतात, ‘कॅम्प भागातील तळे मोतीबाग तळे म्हणून ओळखले जाते. हे तळे उन्हाळ्यातही आटत नाही. मोतीबाग तळे वाळवंटातील संपन्न अशा ओअ‍ॅसिस सारखे असून त्याच्या सभोवताली दाट झाडी आहेत. हे कमळतळे आहे. त्यातील एक ओढा बारा महिने वाहत राहतो.’ त्याला ते लाईव्ह नल्ला असे म्हणतात.
- पूर्वी तलावात भरपूर झाडी व कमळाची फुले होती, परंतु तलाव स्वच्छ करताना ही झुडपे व कमळाची फुले काढण्यात आली. याला पूर्वी मोतीबाग तळे देखील म्हणत असत.

- हिवाळ्यात या तळ्याकाठी चौदा प्रकारची स्थलांतरीत बदके येतात. याशिवाय या परिसरात ६५ प्रकारचे पाणपक्षी दिसतात. ४५ प्रकारच्या वनस्पती येथे आढळल्या आहेत. शंख, शिंपले यांच्याबरोबरच ढोक, ढिबरा, कन्हेर, चिबरा, गोड्या पाण्यातील चविष्ट मासे मुबलक प्रमाणात येथे सापडतात.

पाण्यातील जीवजंतूंसाठी घातक
- पाण्यावर आच्छादनासारखी पसरत जाणाºया जलपर्णीमुळे  सूर्यप्रकाश व हवाही रोखली जाते. त्यामुळे पाण्यातील मासे, जीवजंतू यांना पुरेसा आॅक्सिजन व सूर्यप्रकाश न मिळाल्याने त्यांचे अस्तिवही धोकादायक वळणावर येऊन ठेपले आहे. जलपर्णी समूळ नष्ट करण्यासाठी सध्यातरी काही उपाय नाही. पण आंतरराष्टÑीय स्तरावर यासंबंधी विविध प्रकारचे संशोधन सुरु असल्याचे या वनस्पतीवर संशोधन करणारे सोलापुरातील सोनी महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक प्रकाश कांतीकर यांनी सांगितले. जलपर्णी वाढू न देण्यासाठी ती नियमितपणे काढणे हाच सध्या यावरील उपाय असल्याचे ते सांगतात. आतापर्यंत अनेक सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी ही जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.

कागद निर्मितीसाठी उपयोग
प्रा. प्रकाश कांतीकर यांनी जलपर्णीवर संशोधन करून या वनस्पतीपासून  कागद तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. स्मार्ट सोलापूर अंतर्गत एखादा कागद प्रकल्प सोलापुरात सुरू करता आल्यास लोकांना रोजगारही मिळेल आणि जलपर्णीही कमी होण्यास मदत होईल, असे त्यांना वाटते.

Web Title: A 300-foot-long expansion of a waterfowl plant in one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.