लातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटी परिसर बनला ‘ब्लॅक स्पॉट’; १६ अपघातात १७ जण झाले ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:08 PM2019-03-07T13:08:15+5:302019-03-07T13:12:23+5:30

अपघात प्रवण क्षेत्र म्हणून उपाययोजना करण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे.

Sakhara area on the Latur-Barshi highway became a 'Black spot' ; 16 people were killed in 17 accident | लातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटी परिसर बनला ‘ब्लॅक स्पॉट’; १६ अपघातात १७ जण झाले ठार 

लातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटी परिसर बनला ‘ब्लॅक स्पॉट’; १६ अपघातात १७ जण झाले ठार 

googlenewsNext
ठळक मुद्देलातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटी परिसर अपघात प्रवण क्षेत्र  अरुंद रस्ता आणि वळणामुळे हे अपघात होत असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले.

लातूर : बार्शी महामार्गावरील रामेगाव ते बारा नंबर पाटी दरम्यानचा मार्ग अपघात प्रवण क्षेत्र ठरला आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या चौदा महिन्यांच्या कालावधीत एकूण १६ अपघात झाले. या अपघातामध्ये १७ नागरिक ठार झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. रामेगाव ते साखरा पाटी हा मार्ग ब्लॅक स्पॉट ठरला आहे. 

लातूर-बार्शी राज्य महामार्ग हा दळणवळणासाठी सोयीचा मार्ग आहे.  परिणामी, या मार्गावर रात्रं-दिवस वाहनांची मोठी वर्दळ असते. टेंभुर्णी ते निजामाबाद असा हा मार्ग महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला जोडणारा आहे. लातूर ते मुरुड या महामार्गावरील साखरा पाटी ते रामेगाव हा परिसर सध्या अपघात प्रवण क्षेत्र ठरला आहे. या ठिकाणी होणाऱ्या अपघातांची मालिका थांबत नसल्याचे चित्र आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या चौदा महिन्यांच्या कालावधीत एकूण १६ भीषण अपघात झाले. जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये १३ अपघातांची नोंद असून, दहा जण ठार झाले आहेत. तर जानेवारी, फेब्रुवारी २०१९ मध्ये तीन अपघात झाले. यामध्ये ७ जण ठार झाल्याची नोंद गातेगाव पोलीस ठाण्यात आहे. महिन्याला किमान एक मोठा अपघात साखरा पाटी ते रामेगाव या दरम्यानच्या मार्गावर हमखास होतो, असा अनुभव गेल्या पाच वर्षांचा आहे. अरुंद रस्ता आणि वळणामुळे हे अपघात होत असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले.

बुधवारी पहाटेही एका अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविल्याची घटना घडली. या अपघातात २४ वर्षीय तरुण ठार झाला आहे. फेब्रुवारीमध्ये एका टिप्परने भरदुपारी तीन दुचाकीला उडविले होते. या अपघातात दोघे जण जागीच ठार, दोघांचा उपचारासाठी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. गातेगाव पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. या पत्राची साधी दखलही संबंधित विभागाने घेतली नाही. हा मार्गच आता धोकादायक ठरला आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले पत्र...
लातूर-बार्शी राज्य महामार्गावरील रामेगाव ते साखरा पाटी या दरम्यानचा मार्ग अपघात प्रवणक्षेत्र ठरला आहे. याबाबत गातेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठविण्यात आले होते. हा पॉर्इंट डेंजर झोन म्हणून जाहीर करावा. त्याचबरोबर रस्त्याची रुंदी वाढवावी, असेही पत्रात नमूद करण्यात आल्याचे सपोनि. संभाजी कटारे यांनी सांगितले. रामेगाव ते साखरा पाटी मार्गाच्या साईड पट्ट्या भरून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हा मार्ग जम्पिंग रोड असल्याने अपघाताच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. अपघात प्रवण क्षेत्र म्हणून उपाययोजना करण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे. वाहन धारकांनी आपल्या वाहनाचा वेग कमी ठेवला पाहिजे. त्याचबरोबर रस्त्याचा अंदाज घेऊन वाहन चालविणे अधिक हिताचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Sakhara area on the Latur-Barshi highway became a 'Black spot' ; 16 people were killed in 17 accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.