Road accident in Latur, 7 people died | लातूरजवळ क्रूझरचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू, 13 जण गंभीर जखमी
लातूरजवळ क्रूझरचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू, 13 जण गंभीर जखमी

लातूर : लातूर-नांदेड महामार्गावरील कोळपा पाटीनजीक रस्त्यालगत थांबलेल्या मालवाहतूक टेम्पोला भरधाव वेगातील क्रूझरने मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक दिली. त्याचवेळी समोरुन येणारी दुसरी क्रूझरही या दोन्ही वाहनांवर धडकली. या विचित्र अपघातात 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाले असून 13 गंभीर जखमी झाले आहेत.  चाकूर तालुक्यातील लातूर रोड येथील रेल्वे स्थानकात उतरलेल्या प्रवाशांना घेऊन लातूरकडे निघालेली भरधाव क्रूझर (एम. एच. २४ व्ही. ११०४) कोळपा पाटीनजीक रस्त्यालगत थांबलेल्या मालवाहतूक टेम्पोला (एम.एच. ०४ सी.जी. २७३६) मंगळवारी (28 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास जोराची धडकली. दरम्यान, त्याचवेळी पंढरपूरहून नांदेडकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या क्रूझरला (एम.एच. १३ बी. एन. २४५४) ही जीप धडकली. झालेल्या या विचित्र अपघातात एकाच जीपमधील 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

मृत व्यक्तींची नावं
विजय तुकाराम पांडे ( वय 30  वर्ष, नाशिक)
दत्तू बळीराम शिंदे (वय 35 वर्ष, नांदेड)
शुभम शरद शिंदे (वय 25 वर्ष, अहमदनगर )
उमाकांत सोपान कारुले(वय 45 वर्ष)
मीना उमाकांत कारुले (वय 40 वर्ष, लातूर)
तुकाराम ज्ञानोबा दळवे (वय 35वर्ष, लातूर)
 मनोज चंद्रकांत शिंदे (  वय 25 वर्ष, लातूर) 

जखमीमध्ये अर्जुन रामराव राठोड (२७ रा. परतूर जि. जालना), शब्बीर राजेखाँ खान (१९ रा. निलंगा जि. लातूर), कृष्णा दौलत मगर (१९ रा. नाशिक), मल्लीकार्जुन गोविंद होडे (३२ रा. गातेगाव ता. जि. लातूर), वैष्णवी धनंजय भालेराव (१८ रा. दिपज्योती नगर, लातूर), मदन विठ्ठल पवार (२३ रा. औरंगाबाद), शेख इम्रान इम्तियाज (१९ रा. चाकूर जि. लातूर), गणेश उमाकांत कासले (१२ रा. रेणापूर नाका, लातूर), ज्ञानेश उमाकांत कासले (११ रा. रेणापूर नाका, लातूर), विद्या धनंजय भालेराव (४२ रा. दिपज्योती नगर, लातूर), रामराव मारोती धुसरे (४९ रा. नाशिक), रविदास जयराम सानप (३४ रा. नवी मुंबई), अजय दयानंद वाघमारे (२४ रा. लातूर रोड ता. चाकूर जि. लातूर) आदींचा समावेश आहे. जखमींवर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  अपघाताची माहिती मिळताच विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे,  सपोनि. पवार, गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे, सपोनि. सत्यवान हाके, सपोनि. महेश गळगट्टे यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. 

एकाच कुटुंबातील 2 जणांचा मृत्यू  
या विचित्र अपघातात लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका परिसरात राहणारे उमाकांत सोपानराव कासले (४५ रा. नवीन रेणापूर नाका, लातूर), मिनाबाई उमाकांत कासले (४० रा. नवीन रेणापूर नाका, लातूर), हे जागीच ठार झाले तर त्यांचे दोन्ही मुले गणेश उमाकांत कासले (१२ रा. रेणापूर नाका, लातूर), ज्ञानेश उमाकांत कासले (११ रा. रेणापूर नाका, लातूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. 

वाढदिवसादिवशीच ‘शुभम’वर काळाचा घाला 
अपघातात ठार झालेला शुभम शरद शिंदे (२४ रा. वेलपिंपळगाव ता. जि. अहमदनगर),  हा लोदगा येथील फिनिक्स अ‍ॅकाडमीच्या फूड टेक्नॉलॉजीला द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. शुभमचा मंगळवारी ( २८ नोव्हेंबर ) वाढदिवस होता. मात्र, काळाने वाढदिवसादिवशीच शुभमवर झडप घातली आहे.  गावाकडून लातूरकडे येत असतानाच झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

टेम्पोचे टायर फुटले होते 
नळेगावहून लातूरच्या दिशेने सोयबीनचे पोते घेवून निघालेल्या टेम्पोचे (एम. एच. ०४ सी. जी. २७३६) सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पाठीमागील टायर फुटले. त्यामुळे टेम्पो कोळपापाटी नजीक रस्त्यालगत थांबविण्यात आला होता. दरम्यान, टेम्पोत चालक सत्तार उजेडे हे झोपले होते. पहाटेच्यावेळी भरधाव क्रुझर टेम्पोवर धडकल्याने मोठा आवाज आला. झोपेतून उठून पाहतो तर काय विचित्र अपघात झाल्याचे दिसून आले. दरम्यान, त्यांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली.

दोन आठवड्यात 17 जणांचा मृत्यू 
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या तीन भीषण अपघातात गेल्या दोन आठवाड्यात एकूण १७ जणांचा मृत्यू झाला असून  ३६ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. लातूर-निलंगा मार्गावर दोन अपघात तर लातूर-नांदेड महामार्गावरील मंगळवारी पहाटे अपघात झाला. हे तीनही अपघात केवळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे, खड्ड्यामुळे झाले आहेत. गेल्या २४ तासात लातूर जिल्ह्यात रस्ते अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


Web Title: Road accident in Latur, 7 people died
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.