Movement in the Nilangi: Shivsena's auction of symbolic chairs of Guardian Minister | निलंग्यात आंदोलन :शिवसेनेने केला पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव

निलंगा : राज्य सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करीत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी पालकमंत्री असा फलक चिकटविलेल्या प्रतिकात्मक खुर्चीचा गुरुवारी निलंगा येथे जाहीर लिलाव केला. यावेळी छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी सर्वाधिक बोली लावत ४५ हजारांत ही खुर्ची घेतली. 
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात वीज वितरण कंपनीच्या खुर्चीचा जाहीर लिलाव केला होता. आता ते सत्तास्थानी असूनही शेतकºयांच्या वीज प्रश्नांवर, शेतमालाच्या भावावर हे सरकार मौन बाळगून आहे. या नाकर्तेपणाचा आम्ही निषेध करतो, असे जाहीर करीत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव केला. त्यापूर्वी मतदारसंघात शेतकरी जनजागरण मोहीम राबवून लिलावासाठी शेतकºयांकडून पावत्या फाडण्यात आल्या. 
दरम्यान, गुरुवारी दुपारी १२.३० वाजता शिवाजी चौकात हा लिलाव सुरू झाला. यावेळी शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, माजी जि.प. सदस्या विमलताई आकनगिरे, सुधाकर पाटील, अजित निंबाळकर, तुराब बागवान, राजेंद्र मोरे, काका जाधव, बालाजी वळसांगवीकर, युसुफ शेख, बालाजी माने, संजय बिरादार, बालाजी धुमाळ आदींची मंचावर उपस्थिती होती. 
अभय साळुंके यांनी ऐनवेळी पालकमंत्री नावाचा कागदी फलक लावून एक खुर्ची मंचावर आणली व लिलाव सुरू केला. ११ हजारांपासून सुरुवात होऊन ४५ हजारांवर बोली थांबली. त्यावेळी छावाचे विजयकुमार घाडगे यांनी सर्वाधिक रक्कम देऊन खुर्ची घेतली. हा खुर्चीचा लिलाव नसून, शासनाच्या नाकर्तेपणाचा लिलाव असल्याचे घाडगे म्हणाले. 
या आंदोलनाच्या पूर्वसंध्येपासूनच शहरात तणावपूर्ण शांतता होती. मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मध्यरात्री २ वाजता सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात लिलावाचे ३५० बॅनर्स लावले होते. मात्र त्यावर आक्षेपार्ह मजकूर आहे, असे कारण सांगून पालिका प्रशासनाने सर्व बॅनर्स पहाटेच जप्त केले. उदगीर मोड, हाडगा नाका, शिवाजी चौक, कासार शिरसी मोड, आनंदमुनी चौक यासह सर्वच चौकांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त होता. 

शेतक-यांनीही मोठा सहभाग नोंदवून शासनाबाबतचा आक्रोश दाखवून दिला. या प्रतिकात्मक लिलावात शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, छावा संघटना, आम आदमी पार्टी, शेतकरी संघटना, जनसुराज्य पार्टी यांच्यासह शेतकरी होते. खुर्ची लिलावानंतर रघुनाथदादा पाटील यांच्यासह शेतकºयांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला. कार्यकारी अभियंता ढाकणे यांची भेट घेऊन तालुक्यातील तोडलेले वीज  कनेक्शन जोडावेत, असे आवाहन केले.  यासंदर्भातचा न्यायालयाचा निकाल, शासनाने शेतक-यांच्या वीजबिलापोटी भरलेले २० हजार कोटी यांचा जाब विचारत तात्काळ वीज जोडणी करण्याची मागणी केली. पहिल्यांदा हत्तरगा (हा.) येथील ३०० वीज कनेक्शन तातडीने जोडण्याची मागणी केली. शेवटी अभय साळुंके यांनी सर्वांचे आभार मानले.
लिलावात जमलेली रक्कम हनुमान मंदिरात आराधनेसाठी...
४प्रतिकात्मक खुर्ची लिलावासाठी मतदारसंघात फिरून शेतकºयांकडून पावत्या फाडण्यात आल्या होत्या. २३०० शेतकºयांनी प्रत्येकी १०० रुपये भरून सहभाग नोंदविला होता. त्यातून रोख २ लाख ३० हजार रुपये जमा झाले. या पैशातून माकणी थोर येथील जाज्वल्य देवस्थान हनुमान मंदिर येथे आराधना करून शासनाला शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करण्यात येईल व शेतकºयांसाठी भोजनाचे आयोजन केले जाईल, असे अभय साळुंके यांनी सांगितले. तसेच लिलावात आलेल्या ४५ हजारांतील १ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला, २२ हजार अंबुलगा साखर कारखान्याच्या आंदोलनात शहीद झालेल्या दाजिबा लांबोटे यांच्या कुटुंबियांना तर उर्वरित २२ हजार मुख्यमंत्र्यांचे विमान ज्यांच्या घरावर पडले होते, त्या लक्ष्मण कांबळे यांच्या कुटुंबियास देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. 
‘छावा’ने घेतला खुर्चीचा ताबा...
४‘छावा’चे विजयकुमार घाडगे यांनी ४५ हजार रुपयांची अंतिम बोली लावली.  त्यानंतर खुर्चीचा ताबा छावा कार्यकर्त्यांकडे देण्यात आला. त्यावेळी पदाधिकाºयांनी शासनाचा निषेध नोंदवीत अभिनव आंदोलन केले. दरम्यान, प्रतिकात्मक लिलावप्रसंगी कायदा, सुव्यवस्था पोलिसांनी अबाधीत ठेवली. एक उपविभागीय अधिकारी, पाच पोलीस अधिकारी व ४० कर्मचाºयांचा फौजफाटा होता


Web Title: Movement in the Nilangi: Shivsena's auction of symbolic chairs of Guardian Minister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.