घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 06:22 PM2019-03-06T18:22:05+5:302019-03-06T18:26:58+5:30

देशभरात लातूर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन मूल्यमापनात अव्वल ठरली.

Latur Municipal Corporation top in solid waste management | घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा अव्वल

घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१९ राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक

लातूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा देशात अव्वल ठरली असून, राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. ३ ते १० लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामधून झालेल्या मूल्यांकनात सदर पारितोषिक मिळाले आहे.

केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत असलेल्या केंद्रीय पथकाने लातूर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनाचे मूल्यमापन केले. या मूल्यमापनात लातूर मनपा अव्वल ठरली. सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करून संकलन करणे व त्याची विल्हेवाट लावण्यात लातूर मनपाला यश आले असून, प्रभाग क्र. ५, १८ तसेच शासकीय कॉलनी, फ्रुट मार्केट, विवेकानंद चौक, भाजीपाला मार्केट या ठिकाणी ओला कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. त्याचबरोबर शासकीय कॉलनी येथे सुका कचऱ्याच्या विघटीकरणाचा प्रकल्प उभारला आहे. वरवंटी येथील कचरा डेपो येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिग असून, तेथे दररोज हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मोठी यंत्रणा उभी केली आहे. शहरातील सार्वजनिक भिंती रंगविणे, रात्रझडवई, १०० टक्के घंटागाडीद्वारे कचरा संकलन लातूर मनपाने अत्यंत चोख पद्धतीने केले आहे. प्रभाग क्र. ५ मध्ये पहिल्यांदा लातूर मनपाने ओला कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे.

टाकाऊ प्लास्टिकपासून डांबरी रस्ता विकसीत करण्यात आला असून, सॅनिटरी नॅपकीनवरही प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. या प्रभागात जवळपास २० कुटुंब घरातच कचरा कुजवून खत बनवितात. कन्हैना नागरी सोसायटीत आणि भाजीपाला मार्केट येथेही तिसरा खत प्रकल्प उभारला आहे. या सर्व कामाचे मूल्यमापन केंद्रीय पथकाकडून झाले असून, त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. मात्र कोणत्या गटात पारितोषिक लातूर मनपाला मिळाले हे बुधवारी दिल्ली येथे जाहीर करण्यात आले असून, त्यात कचरा व्यवस्थापनात लातूर मनपाला राष्ट्रीय स्तरावरील देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, सहायक आयुक्त वसुधा फड, सतीश शिवणे यांच्या नेतृत्वाखाली सफाई विभागातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीला राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळाले आहे. 

राष्ट्रीयस्तरावरील सन्मान...
लातूर शहरामध्ये ११ हजारांपेक्षा अधिक पथदिवे बसवून शहर उजळविले असून, सुका कचरा वर्गीकरण केंद्राची उभारणी तसेच शहरात पाच ठिकाणी खत प्रकल्प उभारले गेले. या खत प्रकल्पातून अनेक शेतकऱ्यांनी तसेच नर्सरी चालकांनी खतत विकत घेतला आहे. त्याचा मनपाला आर्थिक फायदा झाला आहे. विशेष म्हणजे कचरा डेपोवर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिग पडलेला होता. त्या ठिकाणी दररोज हजार टन प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारल्याने ढिग जमिनी स्तरावर आला आहे. याच कामाला राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला आहे.

Web Title: Latur Municipal Corporation top in solid waste management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.