Farmers devoted to Devni Nagar Panchayat for the subsidy for tired irrigation | थकीत सिंचन विहिर अनुदानासाठी शेतकर्‍यांनी देवणी नगर पंचायतीस ठोकले टाळे

देवणी (लातूर): महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मध्ये ३९ शेतकर्‍यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या होत्या़ त्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत़ परंतु, त्याचे अनुदान तसेच मजुरांचा रोजगार थकित आहे. हे अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी आज संतप्त शेतकर्‍यांनी  नगर पंचायतीस टाळे ठोकले.

सिंचनाचे प्रमाण वाढावे तसेच मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून शासनाच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना अनुदानावर विहीर मंजूर केली जाते़ सन २०१३-१४ मध्ये तालुक्यातील ३९ शेतकर्‍यांना मग्रारोहयोअंतर्गत विहीर मंजूर झाल्या़ त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी विहीर खोदकामास सुरुवात केली़ खोदकामानुसार निधी मिळणे अपेक्षित असताना त्याचे वितरण करण्यात आले नाही़ परिणामी, पैश्याअभावी काही शेतकर्‍यांनी विहीर खोदकाम करणे बंद केले़ त्यातच देवणी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले़ त्यामुळे लाभार्थ्यांची अडचण झाली़

दरम्यान, लाभार्थी शेतकर्‍यांनी अनुदान मिळावे म्हणून वारंवार संबंधित कार्यालयाकडे हेलपाटे मारुन निधी देण्याची मागणी केली़ परंतु, अनुदान देण्यात आले नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी राजकीय पक्ष, संघटनांसमवेत सोमवारी नगरपंचायतीस टाळे ठोकले़


Web Title:  Farmers devoted to Devni Nagar Panchayat for the subsidy for tired irrigation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.