Due to lack of math teacher, the villagers locked the school | गणितास शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी शाळेस ठोकले टाळे
गणितास शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी शाळेस ठोकले टाळे

लातूर : अहमदपूर तालुक्यातील सताळा येथील एका शाळेत गणित विषयांचे शिक्षक दोन वर्षांपासून नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी गुरुवारी शाळेस टाळे ठोकले़ गणित विषयास शिक्षकाची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी मागणी केली़

सताळा येथे शिवाजी विद्यालय असून इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात़ शाळेत २०७ विद्यार्थी संख्या आहे़ इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गणित विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाही़ परिणामी, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे़ ही समस्या सोडविण्यासाठी संस्थेने शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी वारंवार मागणी केली होती़ परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी शाळेस टाळे ठोकले़

यावेळी सरपंच सुवर्णाताई बालाजी बैकरे, उपसरपंच विठ्ठल खलसे, ग्रामपंचायत सदस्य शालिनी काळे, वैजयंती लोखंडे, कल्पना मेथे, पोलीस पाटील बालिका सगर, रघुनाथ मुंडे, दत्तात्रय खंदाडे, नरसिंग शिंदे, राम महाळंकर, उत्तम हिंडे, नारायण मस्के, वर्धमान उळगड्डे, सय्यद मुबारक, बालाजी शिंदे, दीपक मुंडे, अक्षय रुक्के, शरद महाळंकर आदी उपस्थित होते़ कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूक होत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप काढणार नाही, असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला होता़

उद्या शिक्षक रुजू होतील़
दोन वर्षांपूर्वी अतिरिक्त शिक्षक झाल्याने त्यांची अन्यत्र बदली झाली़ मात्र, काही दिवसांपासून गणित विषयास शिक्षक नव्हता़ गुरुवारी संस्थेने एका शिक्षकाची नेमणूक केली आहे़ शुक्रवारपासून ते रूजू होतील, असे मुख्याध्यापक बी़एऩ पवार यांनी सांगितले़. दरम्यान, बालाजी बैकरे म्हणाले, जोपर्यंत गणित विषयाचा शिक्षक रुजू होणार नाही़ तोपर्यंत शाळेचे कुलूप काढणार नाही़


Web Title: Due to lack of math teacher, the villagers locked the school
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.