डेंग्यूच्या तापीमुळे शरीरातील पेशींची संख्या होते कमी; लहान मुलांची काळजी घ्या - डॉ. वर्धमान उदगीरकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 02:45 PM2018-10-18T14:45:02+5:302018-10-18T14:45:02+5:30

सध्या डेंग्यू आजार वाढला आहे़ त्यामुळे ताप भरल्यास तो अंगावर काढू नका. दुर्लक्ष केल्यास डेंग्यू आजाराची गुंतागुंत वाढू शकते़ अनेकदा शरीरातील पेशींची संख्या कमी होते, असे लातुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्धमान उदगीरकर यांनी सांगितले. 

Dengue heat reduces the number of cells in the body; Take care of small children - Dr. Vardhaman Udgirkar | डेंग्यूच्या तापीमुळे शरीरातील पेशींची संख्या होते कमी; लहान मुलांची काळजी घ्या - डॉ. वर्धमान उदगीरकर 

डेंग्यूच्या तापीमुळे शरीरातील पेशींची संख्या होते कमी; लहान मुलांची काळजी घ्या - डॉ. वर्धमान उदगीरकर 

Next

लातूर : सध्या डेंग्यू आजार वाढला आहे़ त्यामुळे ताप भरल्यास तो अंगावर काढू नका. दुर्लक्ष केल्यास डेंग्यू आजाराची गुंतागुंत वाढू शकते़ अनेकदा शरीरातील पेशींची संख्या कमी होते, असे लातुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्धमान उदगीरकर यांनी सांगितले. 
लातूर जिल्ह्यात सध्या डेंग्यूचा ताप वाढला आहे. यासंदर्भात बोलताना डॉ. वर्धमान उदगीरकर म्हणाले, डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून तो एडिस जातीच्या डासांमुळे होतो. त्यास हड्डीतोड तापही म्हटले जाते. एडिस डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होते. लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्दांना डेंग्यूचा सर्वात अगोदर आजार होण्याची भीती असते.
डेंग्यू आजाराचे दोन प्रकार असून पहिला प्रकारात ताप येणे तर दुसऱ्या प्रकार हा गुंतागुंतीचा आहे. गुंतागुंतीच्या प्रकारात यकृत, किडनी, मेंदू या अवयवांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर शरीरावर सूज, पोटात आणि छातीत पाणी भरण्याची भीती असते. डेंग्यूची गुंतागुंत वाढल्यास प्लेटलेट कमी- कमी होतात. प्रत्येकात साधारणपणे दीड लाख ते साडेचार लाखापर्यंत प्लेटलेट असतात. परंतु, डेंग्युमुळे त्या ५ ते १० हजारापर्यंत खाली येऊ शकतात. डेंग्यूच्या निदानासाठी एनएस-१ अ‍ॅन्टीझीन तसेच आयजीएमआयजीजी या तपासण्या केल्या जातात.

डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणे...
अंगात तापी भरतो. तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, स्रायूदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, डोळे दुखणे असे त्रास जाणवतात तर डेंग्यूमधील गुंतागुंतीमध्ये कातडीवर पुरळ येणे, चट्टे पडणे, हिरड्या-नाकातून रक्त येणे, डोळ्यांत रक्त उतरणे, लघुशंका आणि उलटीतून रक्त येते.

आजारात पपई फायदेशीर...
डेंग्यू आजार झालेल्यास पपई, पपईच्या पानांचा ज्यूस, अर्क असलेली औषधे उपचारासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे पपईवर भर द्यावा. तसेच रुग्णांनी विश्रांती घ्यावी. व्यवस्थित व पूरक पाणी प्यावे. अंगात ताप भरल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डेंग्यूमुळे बहुतांश वेळा प्लेटलेटची आवश्यकता असते. त्यामुळे डॉक्टर प्लेटलेट चढवितात. 

असा करा प्रतिबंध...
डेंग्यू आजार होऊन नये म्हणून नाल्या, गटारी साफ केल्या पाहिजे. घरातील कुंड्यांतील पाणी दररोज बदलले पाहिजे. डबक्यात पाणी साठू देऊ नये. घर परिसरात पडलेल्या टायरामध्ये पाणी साचू देऊ नये. पाण्याच्या टाक्या, पाणी साठविण्याची भांडी नेहमी झाकून ठेवावीत. रिकामी पिंपे व पाण्याची भांडी पालथी करुन ठेवावीत. कारण थोड्याशाही साचलेल्या पाण्यात एडीस डासांची वाढ होऊ शकते. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.

ही घ्या काळजी...
डेंग्यूचा आजार होऊ नये म्हणून कामाच्या ठिकाणी, प्रवासात लांब बाह्याचे कपडे वापरावेत. मुलांना अंगभर कपडे घालावेत. तसेच घरात मॅट, क्वाईल, लिक्विड अशी डास प्रतिबंधात्मक साधने वापरावीत. मच्छरदाणी वापर करावा. घरांना जाळ्या बसवाव्यात.

रक्तातील प्लेटलेटची नियमित तपासणी करावी...
डेंग्यूमधील गुंतागुंत समजण्यासाठी रक्तातील प्लेटलेटची नियमित तपासणी करावी. कारण सामान्यपणे डेंग्यू ताप हा फ्लूसारखा वाटत असला तरी कधी- कधी तो गंभीर आजार बनू शकतो. डेंग्यूविरुध्द अजूनही कोणतीही लस उपलब्ध नाही. डेंग्यूचा आजार झाल्यानंतर बहुतांश नातेवाईक रुग्णाच्या शरीरातील पेशी वाढत नसल्याने ते संभ्रमित होऊन घाबरतात. परंतु, घाबरु नये. औषधोपचार आणि रुग्णाच्या रोगप्रतिकार शक्तीनुसार कमी झालेल्या पेशी हळूहळू वाढतात. त्यामुळे औषधोपचार सुरुच ठेवावे, असे डॉ. वर्धमान उदगीरकर यांनी सांगितले.

Web Title: Dengue heat reduces the number of cells in the body; Take care of small children - Dr. Vardhaman Udgirkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर