The death of one in a two-wheeler accident, ammunition ornaments | दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, रुग्णवाहिका बनल्या शोभेच्या वस्तू

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात दोन रुग्णवाहिका उभ्या असूनसुद्धा केवळ चालक नसल्याने अपघातातील एका गंभीर जखमी रुग्णास खासगी वाहनाने लातूरला घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. किल्लारीजवळील पेट्रोलपंपानजीक दोन दुचाकीचा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला होता. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गंभीर जखमी झालेल्या अभिषेक अनिल कोहाळे याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला रेफर करण्यात आले होते. या ठिकाणी १०८ व १०२ अशा दोन रूग्णवाहिका असतानाही चालक नसल्याने खासगी वाहनाने लातूरला हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. किल्लारी येथील उमरगा रोडवरील एका पेट्रोलपंपाजवळ दोन दुचाकीचा अपघात झाला. दुचाकी एमएच २४ एके ८३९ वर गुलाब व्यंकट पवार व अभिषेक अनिल कोहाळे हे किल्लारीपाटी जात होते. तर एमएच १३ एआर ४८२३ वर महादेव गिरी, महानंदा गिरी दोघे जण मुदगड एकोजीकडे जात असताना सुधीर बिराजदार यांच्या शेतानजीक अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेक अनिल कोव्हाळे यांना ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला रेफर करण्यात आले. मात्र, वाटेत मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे.
चालक नसल्याने गैरसोय
वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील म्हणाल्या, कायमस्वरूपी चालक नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. प्रकाश शेलार म्हणाले, तांत्रिक अडचणीमुळे रुग्णवाहिका बंद आहे. डॉक्टर कमी असल्याने अडचण आहे. डॉक्टरची रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार आहे.