In the case of husband's murder, wife's life imprisonment with beloved, Latur district and sessions court result | पतीच्या खून प्रकरणी प्रियकरासह पत्नीस जन्मठेप, लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

लातूर : आपल्याच शेतात सालगडी म्हणून काम करणा-या एका तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवून त्यातून आलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीचा प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी अश्विनी अरुण देशमुख (रा. चिकलठाणा, ता. लातूर), सालगडी सचिन प्रल्हाद कांबळे याला लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालय (क्र. २) चे न्यायाधीश ए.एन. पाटील यांनी दोन हजारांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 
लातूर तालुक्यातील चिकलठाणा येथील रहिवासी अरुण नानासाहेब देशमुख यांचा मृतदेह त्यांच्या शेतात १६ मार्च २०१५ रोजी आढळून आला. त्यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. दरम्यान, सदर घटनेत मयत अरुण नानासाहेब देशमुख यांचे भाऊ नारायण देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत अरुण देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख व त्यांचा सालगडी सचिन प्रल्हाद कांबळे यांच्या विरोधात गु.र.नं. ४८/२०१५ कलम ३०२, १०९ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीत म्हटले होते, अश्विनी देशमुख व सचिन कांबळे यांच्यातील असलेल्या अनैतिक संबंधास मयत अरुण देशमुख अडसर ठरत असल्यामुळे अश्विनीच्या सांगण्यावरून सचिन याने अरुण देशमुख यांचा खून केला होता. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आलापूरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.आर. सय्यद यांनी या प्रकरणाचा तपास करून दोघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. २) ए.एन. पाटील यांच्या न्यायालयासमोर चालविण्यात आला. सरकार पक्षाच्या वतीने एकूण १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये फिर्यादी नानासाहेब देशमुख व डॉक्टरांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने सरकार पक्षाच्या वतीने सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी अश्विनी अरुण देशमुख व सालगडी सचिन प्रल्हाद कांबळे यांना कलम ३०२, १०९ भादंवि अन्वये जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. 
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता संतोष वसंतराव देशपांडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी, समन्वयक, पोलीस हवालदार आर.टी. राठोड, दिलीप बा. नागराळे यांनी सहकार्य केले.


Web Title: In the case of husband's murder, wife's life imprisonment with beloved, Latur district and sessions court result
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.