Bodice | जेवायला बसलेल्या बापाची कु-हाडीचे घाव घालून हत्या, वेळ अमावस्येसाठी करण्यात आलेल्या कोपीत जाळले प्रेत

उदगीर (जि. लातूर) : जेवण करण्यासाठी शेतात बसलेल्या बापाच्या डोक्यावर व मानेवर कु-हाडीचे घाव घालून मुलाने हत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उदगीर तालुक्यातील चांदेगाव शिवारात घडली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आईवरही कु-हाडीचा घाव घातल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. 

उदगीर तालुक्यातील चांदेगाव शिवारात केरबा गणपती वंगवाड (वय ६०) हे आपल्या कुटुंबियासह वेळा अमावस्या साजरी करण्यासाठी शेतात गेले होते. त्यांना दोन मुले असून, मोठा मुलगा गोविंद (३५) हा त्यांच्याशी नेहमीच शेतीच्या वाटणीसाठी भांडत असे. दरम्यान, रविवारी दुपारी १ वाजता केरबा गणपती वंगवाड जेवणासाठी बसले असता पाठीमागून आलेल्या गोविंद वंगवाड याने वडिलांवर कुºहाडीने घाव घातला. आई सुंदराबाई यांनी वडिलांना मारू नकोस म्हणून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सैतानाचे रुप धारण केलेल्या गोविंदने आईवरही वार केला. त्याने पुन्हा वडिलांवर कु-हाडीचे घाव घालून वेळा अमावस्येनिमित्त पांडव पूजेसाठी केलेल्या कोपीत वडिलांचा मृतदेह टाकून पेटवून दिला. मृतदेह संपूर्ण जळावा म्हणून त्याने शेतातील तुराट्या त्यावर टाकून तेथून तो निघून गेला व दुस-याच्या शेतात जाऊन त्याने जेवण केले व तेथून पळून गेला.  दरम्यान, ही घटना आईने शेजा-यांना कळविली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांनी पंचनामा करून जाळलेला मृतदेह पोत्यात भरून उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती, पोलीस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

काबाड कष्ट करून वडिलांनी कमविली ३२ एकर जमीन
४केरबा गणपती वंगवाड यांना मुळात ७ एकर शेती असून, त्यांनी काबाड कष्ट करून २५ एकर जमीन कमविली. आज ते ३२ एकरांचे मालक होते. त्यांना मोठा मुलगा गोविंद (३५) आणि छोटा व्यंकट (३०) अशी दोन मुले आहेत. मोठा गोविंद वंगवाड शेतीच्या वाटणीसाठी नेहमीच भांडत असे. वेळा अमावस्येच्या दिवशी तर त्याने कहरच केला. जेवणासाठी बसलेल्या वडिलांच्या मानेवर व डोक्यावर कुºहाडीने घाव घालून त्यांना संपविले. 

जखमी आईवर खाजगी रुग्णालयात उपचार... 
वडिलांना मारू नकोस म्हणून सोडविण्यास गेलेल्या आईवरही पोटचा मुलगा गोविंद याने कु-हाडीचा वार केला. यात आई सुंदराबाई यांच्या डाव्या हातावर गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना उदगीर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांनी सांगितले. 

खुनी मुलाच्या शोधात पोलीस..
जेवणापूर्वीच वडिलांची हत्या करून कोपीत मृतदेह जाळून फरार झालेल्या खुनी मुलाच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे. विशेष म्हणजे वडिलांचा मृतदेह जाळून मुलाने दुसºयाच्या शेतात जाऊन वेळा अमावस्येचे ोवणही केले. या घटनेमुळे चांदेगाव हादरले आहे.