Award of Agriculture Culture, recipient of Sahitya Akademi Award, Shrikant Deshmukh | शेती संस्कृतीचा सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त श्रीकांत देशमुख यांची प्रतिक्रिया

लातूर : जागतिकीकरणानंतर शेतीचे बदललेले अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न ‘बोलावें ते आम्ही’ या काव्य संग्रहातून केला आहे. त्याची राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दखल हा शेती संस्कृतीचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त श्रीकांत देशमुख यांनी आज येथे व्यक्त केली.

लातूर येथे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) म्हणून कार्यरत असलेले कवी देशमुख यांनी गद्य व पद्य स्वरुपात विपुल लेखन केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, कष्टकरी, दलित यांचे दु:ख व वेदना ही माझ्या लेखनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ‘बोलावें ते आम्ही’ हे काव्यसंग्रहाचे नाव संत तुकोबाराय यांच्या अभंगातील ओवीचे आहे. तुकोबा, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारपरंपरा आम्ही मानतो.

शेती व्यवस्थेतील दु:ख व वेदना यांचा शोध घेणे ही जबाबदारी वाटते. त्यामुळे लेखनात कष्टकºयांचे आयुष्य आणि वेदना उमटली आहे. हा भूमीनिष्ठ बनलेल्या ‘बोलावें ते आम्ही’ काव्यसंग्रह ग्रंथाली प्रकाशनने वाचकांसमोर आणला आहे, असेही देशमुख म्हणाले.
मूळचे सिंदखेडराजा जवळील राहिरी येथील रहिवासी असलेले श्रीकांत देशमुख यांचे औरंगाबाद व जालना येथे शिक्षण झाले. काही काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी शासकीय सेवा स्वीकारली. ते नांदेड येथे साखर सहसंचालक होते व सध्या लातूरला विभागीय सहनिबंधक आहेत.

बळिवंत / श्रीकांत देशमुख...
श्रीकांत देशमुख यांचे ‘बळिवंत’, ‘आषाढमाती’, ‘बोलावें ते आम्ही’ हे काव्यसंग्रह शेतीनिष्ठ जीवनावर आधारित आहे. देशमुख हे कविता हा वाङ्मय प्रकार गंभीरपणे हाताळणारे व स्वत:ची जीवनदृष्टी असणारे कवी आहेत. कृषी जनसमुहाच्या वास्तवाची मांडणी करणाºया या कविता शेतक-यांच्या जगण्यात बारमाही येणाºया चढ-उताराला केंद्रभागी ठेवतात. त्यामुळे ही कविता म्हणजे शेतकºयांची सलग आत्मचरित्र गाथा बनते. गावगाडा, गावगाड्याची जीवन पद्धती आपल्या कवितेत त्यांनी अस्सलपणे शब्दबद्ध केली आहे. शेतकºयांची अगतिक स्थिती, कुचंबना, वाट्याला येणारे दु:ख, दु:खावेगातून घडलेल्या आत्महत्या कवितेत अपरिहार्यपणे चित्रित होतात. त्यांच्या कवितेतील कृषी समुहातील स्त्री जगण्याचे केलेले चित्रण स्वतंत्रपणे विचारात घेतले पाहिजे, इतके ते वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेले आहे. देशमुखांची कविता ही कृषी जनसमुहाचाच उद्गार आहे. त्यांच्या कवितेत येणारी प्रतिमा, प्रतिके ही खास कृषी जनव्यवस्थेतील आहेत. जगण्याचा तळ हा तणावासह शोधणे तिला महत्त्वाचे वाटते. कृषीमूल्य व्यवस्था, दु:ख, दारिद्र्य, तुटलेपणा ही त्यांच्या कवितेची आशयसूत्रे बनतात. शेतक- यांचे संपूर्ण जगणेच एक दीर्घ अभंग बनते. त्यामुळे आपली जातकुळी, पूर्व परंपरा तुकारामांची आहे याची भरीव आठवण त्यांची कविता देते. - राजन गवस