The ancient sculpture of the Jain temple, the sculpture of rare sculptures are ignored, type of oyas | जैन मंदिरात प्राचीन कोरीव मूर्ती, दुर्मीळ शिल्पकलेचा ठेवा दुर्लक्षित, औशामधील प्रकार

लातूर  - भूकंपानंतर पुनवर्सन झालेल्या औसा तालुक्यातील कार्ला गावात प्राचीन जैन मंदिर असून, या मंदिरात साधारणत: पाच फूट उंचीच्या तीन कोरीव मूर्ती आहेत़ मधली मूर्ती सप्तफणा पार्श्वनाथांची आहे़ ती आकर्षक असून, बाजूच्या दोन मूर्ती थोड्या खंडित झालेल्या आहेत़ अत्यंत बारीक कलाकुसर व यक्ष-यक्षिणीच्या सुबक आकर्षक मूर्ती सुव्यवस्थित असल्या तरी देखभालीचा अभावामुळे ही ऐतिहासिक दुर्मीळ शिल्पकला दुर्लक्षीत आहे़
या शिल्पकलेची पाहणी नांदेडच्या जैन इतिहास संशोधिका डॉ़ अरुणा काला यांनी करून या ऐतिहासिक शिल्पकलेचा ठेवा जपण्याचे आवाहन केले़
कार्ला येथील जैन मंदिर प्राचीन असून, १९९३ ला झालेल्या भूकंपामुळे या गावाचे पुनर्वसन झाले आहे़ भूकंपात गाव उजाड झाले असले, तरी मंदिर सुरक्षित आहे़
आठ बाय आठच्या दगडी शिळेवर नक्षीकाम केलेले हे मंदिर असून, मंदिराच्या एका बाजूला दगडी शिळेनेच बांधलेले घर आहे़
मंदिराच्या चारही बाजूला खांब असून, या खांबांवरही नक्षीकाम
आहे़ मंदिराला दार नाही़
दगडी शिळेचे अरुंद प्रवेशद्वार
आहे़ प्रवेशद्वारावरही मूर्ती कोरलेल्या आहेत़
मंदिरात विशेष आणि दुर्मिळ आदिनाथ भगवंतांचे यक्ष गोमुख प्रतीक चिन्ह आहे़ गोल दगडावर ते कोरलेले असून, हे मंदिर दगडी शिळेवर कोरलेले आहे़ छतावरही मोठमोठ्या शिळा ठेवलेल्या आहेत़
या मंदिराची देखभाल झाल्यावर गावाला वैभव प्राप्त होईल़ मंदिर प्राचीन असून, एक ऐतिहासिक जैन दस्तऐवज आहे, असेही डॉ़ अरुणा काला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़