मॅटवरील कुस्तीचा अनुभव-- हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी- लाल मात-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:07 AM2018-03-18T01:07:44+5:302018-03-18T01:08:22+5:30

तो मार्च १९६६ चा काळ होता. कुस्ती संघटक व मठ तालमीचे वस्ताद बापूसाहेब राडे आमच्या गंगावेस तालमीत आले व पतियाळाला गादीवरच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आहेत तिथे दीनानाथला उतरूया,

Wrestling Experience on Matte - Life story of Hindakesari Dinanath Singh | मॅटवरील कुस्तीचा अनुभव-- हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी- लाल मात-

मॅटवरील कुस्तीचा अनुभव-- हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी- लाल मात-

googlenewsNext

तो मार्च १९६६ चा काळ होता. कुस्ती संघटक व मठ तालमीचे वस्ताद बापूसाहेब राडे आमच्या गंगावेस तालमीत आले व पतियाळाला गादीवरच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आहेत तिथे दीनानाथला उतरूया, असे त्यांनी सुचविले. नाशिकला झालेल्या कुस्तीमुळे तसा कुस्ती क्षेत्रात मी चांगलाच चर्चेत आलो होतो. लोकांनाही मी काहीतरी कुस्तीत नक्की करून दाखवेन, असा विश्वास वाटत होता. या स्पर्धेत तू उतरलास तर तूला निश्चित मेडल आहे, तेव्हा गादीवरून कुस्तीत तू भाग घे, असा आग्रह त्यांनी धरला. हा विषय आम्ही गवळी वस्तादांना सांगितला. ते लगेच तयार झाले. मातीची कुस्ती करून ‘महाराष्ट्र केसरी’ व्हायचे माझे स्वप्न होते. परंतू मध्येच ही संधी आली. राडे वस्ताद यांनी मला गादीवरील कुस्तीचे प्रशिक्षण देण्यासाठी बलभीम बँकेजवळील दौलतराव भोसले विद्यालयात नेले. तिथे मॅटवरचा सराव सुरू झाला. राडे वस्ताद यांच्यामुळे मी अशा कुस्तीसाठी आयुष्यात पहिल्यांदा गादीवर पाय ठेवला. तिथे पंधरा दिवस चांगला सराव केला. राडे हा कुस्तीवर जीवापाड प्रेम करणारा रांगडा माणूस. कुस्तीचे समालोचन करावे तर ते राडे यांनीच. त्यांच्यामुळे कुस्तीलाही रंगत येत असे. राडे मास्तरांचे निवेदन कुस्त्यांच्या मैदानात वेगळीच जान आणत असे. अगोदरच ईर्षेसाठी होणारी कुस्ती अधिक ईर्षेने होते. कुस्ती कलेवरील प्रेमापोटी त्यांनी बराच पदरमोड केली आहे. विभागीय,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्लांना मार्गदर्शन करणारे राडे मास्तर दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांच्या गुणांची कदर कुठे झाली नाही असे वाटते. माझ्यासह त्यांनी हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, मारुती माने, त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर नांव कमावलेले राम सारंग, संभाजी वरुटे, दादू चौगले, लक्ष्मण वडार, गणपत खेडकर, विष्णू जोशीलकर आदींना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राच्या संघातून मी पतियाळा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी गेलो. गणपत खेडकर, मारुती वडार आणि मी असे तिघे त्या संघात होतो. मी ९० किलो गटातून स्पर्धेत भाग घेतला. तिथे चार दिवसांत ५ लढती खेळलो व त्यात मला रौप्यपदक मिळाले. मला मातीच्या कुस्तीचा सराव होता. बूट घालून कुस्ती करणे मला जमलेच नाही. मिलिटरीच्या माधवसिंग यांने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. तो आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेचाही सुवर्णपदक विजेता होता. त्याने ती लढत जिंकली. त्यावेळी भीमासिंग, विश्वनाथ सिंग हे लष्कराचे गाजलेले पैलवान होते. त्यांचे गादीवरील कुस्तीत वर्चस्व असायचे. सुपर हेवी गटातून ते खेळायचे. गणपत खेडकर या गटातून खेळले परंतु त्यांना पदक मिळाले नाही. आम्ही परत कोल्हापूरला आलो. त्यानंतर वस्ताद म्हणाले गादीची कुस्ती विसरून जा व मातीचा सराव वाढव. कारण नोव्हेंबरमध्ये जळगांवला ‘महाराष्ट्र केसरी’ची स्पर्धा आहे.
सांगलीहून गंगावेस तालमीत आल्याचा माझा एक फायदा झाला. सांगलीत माझे वजन ८२ किलो होते. कोल्हापुरात वातावरण चांगले. खाणे-पिणे चांगले यामुळे माझे वजन वाढू लागले. पतियाळाला मी ९० किलोगटात खेळलो; परंतु पुढच्या दोन-तीन महिन्यांत माझे वजन १०५ किलो झाले. त्यावेळी २ रुपये दिले की चड्डी शिवून मिळायची. शिवून आणलेली चड्डी मला लगेच घट्ट होऊ लागली. मी वस्तादांना म्हणू लागलो की मला चड्डी लहान होत आहे. ते म्हणाले, ‘लेका चड्डी लहान होत नाही तुझे वजन वाढले आहे.’ व्यायाम जोरात करून घेत होते. खाणंही पौष्टीक होते. त्याचा हा परिणाम होता.
आता माझ्यासमोर ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा हेच ध्येय होते. या स्पर्धेत मी मुंबई संघाकडून उतरलो. कोल्हापूरहून मुंबईला गेलो व तिथून जळगांवला रेल्वेने गेलो. जळगांवला एस. टी. स्टँडजवळच कुस्तीचे मैदान होते. माझी पहिली लढत पुण्याच्या तुकाराम शिंदे यांच्या बरोबर झाली. साडेचार मिनिटे ही लढत झाली. त्यामध्ये मी त्यांना चितपट केले. सांगलीच्या शंकरराव घारे याच्याबरोबर दुसरी लढत झाली. ती देखील पाच मिनिटांत मी चीतपट केली. तिसरी व चौथी कुस्ती बीड व अहमदनगरच्या मल्लांबरोबर झाली. मी ग्रुप ‘अ’ मधून व चंबा मुत्नाळ हे ‘ब’ मधून खेळत होतो. त्यामुळे आम्ही दोन्ही गटांकडून अंतिम आलो तेव्हा ती लढत मुंबई विरुद्ध कोल्हापूर अशी झाली. आम्ही दोघेही तालीम कोल्हापुरातच करत होतो; परंतु मी मुंबईकडून खेळत असल्याने तसे घडले.
- शब्दांकन : विश्वास पाटील

Web Title: Wrestling Experience on Matte - Life story of Hindakesari Dinanath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.