रखडलेले पाणी प्रकल्प तातडीनं मार्गी लावू; चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:27 PM2019-06-26T13:27:00+5:302019-06-26T13:29:07+5:30

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 145 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील यांचं आश्वासन

will complete water projects immediately says kolhapur guardian minister chandrakant patil | रखडलेले पाणी प्रकल्प तातडीनं मार्गी लावू; चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन

रखडलेले पाणी प्रकल्प तातडीनं मार्गी लावू; चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन

Next

कोल्हापूर: जिल्ह्यातील धामणी, उचंगी यासह सहा रखडलेले पाणी प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करु, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 145 व्या जयंती निमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देवून शाहूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, महापौर सरीता मोरे, आमदार सतेज पाटील, कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी  दौलत देसाई, महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन गिरी, ज्येष्ठ विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराजांच्या अनेक गोष्टी समाजाला दिशादर्शक आहेत. त्यातील महाराजांच्या पाणी धोरणानुसार कमी पाणी व जास्त पिकांचे उत्पादन करण्यासाठी येत्या काळात भर दिला जाणार आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, राजर्षी शाहूंचा पाणी साठे वाढविण्यावर भर होता. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणी प्रकल्पांची कामे सुरु आहेत. त्यातील सहा प्रकल्प सद्यस्थितीत रखडलेले आहेत. या प्रकल्पात सर्वात मोठा धामणी प्रकल्प वेगाने पूर्ण  करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे. उंचगी व अन्य प्रकल्पांचे कामही येत्या काळात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.    

पालकमंत्री म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये शिक्षण या मुलभूत गोष्टीवर प्राधान्याने भर दिला होता. त्याच धर्तीवर राज्य शासन शिक्षणावर भर देत आहे. राज्यातील मुलींचे 12 वी पर्यंतचे सर्व शिक्षण मोफत आहे. तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. खासगी शिक्षण संस्थांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या असून या 25 टक्क्यामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची 25 टक्के शुल्क राज्य शासनाकडून भरली जाते. राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी शासनाने आजपर्यंत 608 कोटी रुपये भरलेले आहेत असे शेवटी सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर व महाराष्ट्राच्या जनतेला राजर्षी शाहू जयंती निमित्त त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी शाहू जन्मस्थळवर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.      

दसरा चौक चित्रमय
दसरा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजर्षी  छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, महापौर सरिता मोरे, कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, प्रांताधिकारी सचिन इथापे, समाज कल्याण निरीक्षक संजय पवार, यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.  

सामाजिक न्याय विभागातर्फे समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शाहू महाराजांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हलगी व लेझीम पथक, शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्षवेधी चित्ररथासह शाहू महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी उत्सव समितीचे मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
 

Web Title: will complete water projects immediately says kolhapur guardian minister chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.