हवी कशाला टाल्कम पावडर? भिरभिरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:57 PM2018-12-14T23:57:41+5:302018-12-14T23:58:55+5:30

- उदय कुलकर्णी घरात लहान मूल जन्माला आलं की, तान्हुल्याची काळजी घेण्याची जबाबदारी भारतात घरातील म्हाताऱ्या बायका पूर्वी स्वखुशीने ...

Why should Tolkump Powder? Overflow | हवी कशाला टाल्कम पावडर? भिरभिरं

हवी कशाला टाल्कम पावडर? भिरभिरं

Next

- उदय कुलकर्णी
घरात लहान मूल जन्माला आलं की, तान्हुल्याची काळजी घेण्याची जबाबदारी भारतात घरातील म्हाताऱ्या बायका पूर्वी स्वखुशीने स्वीकारत असत. मुलाची टाळू भरणं, त्याची त्वचा निरोगी व्हावी यासाठी हळद, चंदन आणि बेसन वगैरे मिसळून काही गोष्टी वापरून मुलांना हलक्या हातानं मालीश करणं असं सगळं काही आवडीनं आणि हौसेनं केलं जायचं. आता सगळा आॅनलाईन खरेदी-विक्रीचा मामला. मूल जन्माला येण्याच्या आधीपासून त्याच्यासाठी उत्तम काय याच्या जाहिराती पाहून आॅनलाईन किंवा मॉलमध्ये जाऊन खरेदी सुरू होते. टाळू भरणं, मुलांच्या अंगात तेल जिरवणं हा सगळा जुनाट बायकांचा वेडेपणा आहे, यावर आता सुशिक्षित महिलांनी आणि नव्या बाजार व्यवस्थेनं शिक्कामोर्तब केलं आहे. मुलांचं अंग कोरडं ठेवायचं किंंवा त्यासाठी विशिष्ट कंपनीची टाल्कम पावडरच वापरावी लागते, हे आता मनामनात ठसलंय.

लहान मुलांच्या बाबतीतच काय, मोठ्या माणसांसाठीही आता गोरेपणाकरिता अमूक पावडर आणि तमूक क्रीम हे सर्वतोमुखी झालेलं आहे. जाहिरातींनी अशा गोष्टी मनामनांवर नको इतक्या ठसविलेल्या आहेत. सावळ्या वर्णाच्या भारतीयांमध्ये तर अशा क्रीम आणि पावडरची भयंकर क्रेझ आहे. भारतात अशा पावडरींचं मार्केट किती आहे माहिती आहे? किमान सातशे कोटी रुपयांचं! पण, अनेकांना हे माहितीच नाही की, कॅनडासारख्या देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेनं टाल्कम पावडरचा वापर हा घातक असल्याचं काही तपासण्यानंतर जाहीर केलं आहे.

यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘रिस्क असेसमेंट ड्राफ्ट’मध्ये म्हटलंय की, टाल्कम पावडर श्वसनातून शरीरात जात राहण्याने श्वसनाचे त्रास जसे होऊ शकतात, त्याचप्रमाणे महिलांना ओव्हरी म्हणजे गर्भाशयाशी निगडित कर्करोग होऊ शकतो. कॅनडामधील सार्वजनिक आरोग्य विभागानं आपल्या ड्राफ्टवरती लोकांनी आपले अनुभव आणि मते मांडावीत असंही म्हटलं आहे. लोकांकडून याबाबतच्या निष्कर्षांना दुजोरा मिळाला, तर ६० दिवसानंतर कॅनडाचे सरकार टाल्कम पावडरचा समावेश विषारी पदार्थांमध्ये करणार आहे.

टाल्कम पावडरमुळे खोकला होऊ शकतो, श्वास घेण्यामध्ये अडचण जाणवू शकते. फुप्फुसांची क्षमता कमी होऊ शकते. विशेषत: जननेंद्रियांच्या स्वच्छतेसाठी म्हणून अनेकजण शरीराच्या त्या भागात टाल्कम पावडर फवारतात; पण ही बाबदेखील धोकादायक ठरू शकते, असे आता अभ्यासकांना वाटू लागले आहे. जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच आता इंटरनॅशनल एजन्सी आॅन कॅन्सर आणि डॅनिश एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी याबाबतीत गांभीर्यानं अभ्यास करण्याच्या मागे आहे.

इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्सच्या मुंबई विभागाच्या पदाधिकारी बेला वर्मा यांच्या म्हणण्यानुसार बहुसंख्य भारतीय घाम आणि घामाची दुर्गंधी यापासूनच्या सुटकेसाठी टाल्कम पावडर वापरतात; पण यामुळे त्वचेवरची जी छिदं्र मोकळी राहण्याची आवश्यकता असते तीच बंद होतात आणि याच्या परिणामी वेगवेगळे त्वचारोग उद्भवतात. लहान मुलांच्या बाबतीत तर टाल्कम पावडरच्या अ‍ॅलर्जीचे प्रकारही आढळून येतात.

खरं तर ज्यांचा अभ्यास आहे, असे बालरोगतज्ज्ञ सांगतात की, नवजात मुलांना कोणत्याही प्रकारच्या टाल्कम पावडरची गरज असत नाही. केवळ कोट पाणी त्यांच्या स्वच्छतेसाठी पुरेसं असतं. ना साबणाची गरज असते, ना पावडरची. अगदी क्वचितच एखाद्या बाळाला ग्लिसरीनयुक्त साबणाची गरज असू शकते; पण टाल्कम पावडरची नाही. माहिती नसेल तर माहिती करून घ्यायला हवं की, याच वर्षीच्या जुलै महिन्यात अमेरिकेच्या न्यायालयानं जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनसारख्या कंपनीला एकूण २२ महिलांना जबर नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे, कारण या कंपनीच्या टाल्कम पावडरच्या वापरानं आपल्याला कर्करोगाचा त्रास झाला असा संबंधित महिलांचा दावा आहे.

अर्थात, या दाव्याला कंपनीनं पुन्हा आव्हान दिलेलं आहे हा भाग वेगळा! सांगण्याचा मुद्दा इतकाच की, गोरं दिसण्यासाठी असो किंंवा नव्यानं जन्मलेल्या लहान मुला-मुलींसाठी असो, बड्या कंपन्यांच्या टाल्कम पावडरचा वापर करणे म्हणजे आपण जाहिरातींना भुलून नसत्या आजारांना निमंत्रण तर देत नाही ना! याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. घरातल्या अनुभवी, वृद्ध महिलांचे पारंपरिक ज्ञानच आपण योग्य प्रकारे आधुनिक विज्ञानाच्या आधारे तपासून उपयोगात आणायला काय हरकत आहे?


(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
kollokmatpratisad@gmail.com

Web Title: Why should Tolkump Powder? Overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.