हातकणंगलेला नगरपंचायत कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:18 AM2019-01-12T00:18:54+5:302019-01-12T00:22:18+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, गाव बंद आंदोलन, उपोषण, अशी लोकशाही मार्गाची विविध जनआंदोलने पूर्ण झाली. पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा होऊनही हातकणंगले

 When is the Hathkangala Nagar Panchayat? | हातकणंगलेला नगरपंचायत कधी?

हातकणंगलेला नगरपंचायत कधी?

Next
ठळक मुद्देग्रामस्थांचा सवाल : भाजप-शिवसेनेच्या राजकारणाचा फटका!लोकसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले नगरपंचायत स्थापन होण्याच्या अशा पल्लवित

दत्ता बिडकर ।
हातकणंगले : ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, गाव बंद आंदोलन, उपोषण, अशी लोकशाही मार्गाची विविध जनआंदोलने पूर्ण झाली. पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा होऊनही हातकणंगले तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्यामध्ये भाजपचे शासन दुजाभाव करीत असल्याची भावना हातकणंगले ग्रामस्थांची झाली आहे. आजरा, चंदगडपेक्षा हातकणंगलेची लोकसंख्या जास्त असूनही येथील नगरपंचायत निर्मितीसाठी राज्य शासन उदासीन असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

हातकणंगले नगरपंचायतसाठी कृती समितीच्यावतीने २०१६ पासून ग्रामस्थांच्यावतीने वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. आॅक्टोबर २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला. तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलने झाली, तरीही शासनाने नगरपंचायत स्थापनेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले. नगरपंचायतीच्या स्थापनेसाठी ग्रामस्थांनी कृती समिती स्थापन करून आमदार, खासदार, पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे नगरपंचायत स्थापनेत शासन दुजाभाव करीत आहे, अशी ग्रामस्थांची भावना झाली आहे.

शिरोळ, आजरा आणि चंदगड या तालुक्यांच्या ग्रामपंचायती बरखास्त होऊन या ठिकाणी नगरपंचायती निर्माण झाल्या. मात्र, अद्याप हातकणंगलेसारख्या मोठ्या गावाचा नंबर लागला नाही. आजरा आणि चंदगडपेक्षा हातकणंगलेची लोकसंख्या मोठी असूनही त्याला वेगळा न्याय लावला जात आहे. शिरोळ, आजरा आणि चंदगडचे नेतृत्व सर्वच पातळींवर सरस ठरले असल्याची भावना झाली आहे. हातकणंगलेसाठी कोणी वाली आहे का? अशी हाकही ग्रामस्थ घालत आहेत.

हातकणंगले येथील आमदार सुजित मिणचेकर, राधानगरी-भुदरगडचे स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर आणि शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील हे तीन आमदार शिवसेनेचे आहेत. त्यांच्या मतदारसंघातील हातकणंगले, राधानगरी, गारगोटी आणि शाहूवाडी ही तालुक्याची ठिकाणे जाणूनबुजून नगरपंचायतीपासून वंचित ठेवली जात असल्याचा आक्षेप शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये आहे.सेना-भाजपमधील राजकारणात भाजप शिवसेनेच्या आमदारांवर कुरघोडीचे राजकारण करत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राजकीय काटशहांमध्ये नागरिकांना नगरपंचायतीपासून वंचित रहावे लागत आहे.

मागणी कायम : मुख्यमंत्र्यांना निवेदन
हातकणंगलेचे सेना आमदार सुजित मिणचेकर यांनी हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी आणि दादा गोरे यांच्यासह मुख्यमंत्री यांची भेट घेऊन हातकणंगले नगरपंचायत तत्काळ स्थापन करावी, असे निवेदन दिले. मख्यमंत्र्यांनी या निवेदनावर तत्काळ अंमलबजावणीचा शेरा मारून पुढील कार्यवाहीसाठी निवेदन नगरविकास विभागाकडे पाठवून दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले नगरपंचायत स्थापन होण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

हातकणंगले नगरपंचायतीच्या मागणीसाठी आमदार सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी सागर पुजारी, दादा गोरे उपस्थित होते.

Web Title:  When is the Hathkangala Nagar Panchayat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.