Wadanage's name is 'Prakash' trainer | वडणगेचे नाव ‘प्रकाश’मान करणारे प्रशिक्षक

सुधाकर पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वडणगे : कबड्डी खेळाची पंढरी म्हणून करवीर तालुक्यातील वडणगे गावची ओळख आहे. या माध्यमातून जयकिसान क्रीडा मंडळाने अनेक खेळाडू घडविलेत. राज्य व देश पातळीवरही ते चमकलेत. जसा खेळात दबदबा ठेवला तसाच दबदबा प्रशिक्षक म्हणून या मंडळाचे खेळाडू प्रकाश भीमराव पाटील यांनी ठेवला आहे.
सध्या ते महाराष्टÑ पोलीस विभागाचे प्रशिक्षक व कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे क्रीडा विभागप्रमुख आहेत. ते मुख्य प्रशिक्षक असताना राज्याच्या पोलीस संघाने राष्टÑीय क्रीडा स्पर्धांमधून दोनवेळा अजिंक्यपद मिळविले आहे. आपल्या खेळाने मैदान गाजविणाºया पाटील यांचे प्रशिक्षक म्हणून ‘प्रकाश’मान केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे.
वडणगे येथील जयकिसान क्रीडा मंडळाची ओळख कबड्डीसारख्या रांगड्या खेळामुळे आहे. मंडळाचे अनेक खेळाडू आजपर्यंत राज्य, राष्टÑीय संघांमधून खेळले आहेत. तसेच या खेळाच्या जोरावर राज्य उत्पादन शुल्क, महाराष्टÑ पोलीस, काही नामवंत खासगी कंपन्यांमध्ये प्रामाणिक सेवा बजावत आहेत. नियमित सरावही करत त्याठिकाणीही त्यांनी संघाची बांधणीही केली. त्यांचे हे संघ आजही क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी बजावत आहेत. त्यातलेच प्रकाश पाटील हे एक.
प्रकाश पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबातला. धष्टपुष्ट, उंचापुरी शरीरयष्टी असल्याने माळावरच्या शाळेसमोरच्या मंडळाच्या पटांगणावर कबड्डीत त्यांनी नियमित सरावावर लक्ष देत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमधून आक्रमक खेळ केला. त्यांच्या पकडी व चढाया अत्यंत
चपळ असल्याने ते उत्कृष्ट खेळाडू म्हणून अल्पावधीतच नावारुपास आले.
जय किसान संघातून खेळतानाच त्यांनी त्रिपुरामधील आगरतळामध्ये झालेल्या स्कूल कबड्डी सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि त्यांच्या संघाने सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर १९८७ मध्ये त्यांची महाराष्टÑ पोलीस दलात खेळाडू म्हणून नेमणूक झाली. राज्याच्या पोलीस संघाकडून खेळताना दहा आॅल इंडिया स्पर्धा खेळल्या. सीनिअर नॅशनल स्पर्धेतही ते चमकले. काहीवेळा नॅशनल स्पर्धांमधून राज्याचे त्यांनी नेतृत्व केले. त्यामुळे देशभरात कबड्डीमध्ये त्यांचा दबदबा अजूनही आहे.
प्रो कबड्डी स्पर्धेतील खेळाडू महेंद्रसिंग रजपूत व सुल्तान डांगे (दोघेही गुजरात लायन्स संघ), बाजीराव होडगे (दबंग दिल्ली संघ) व अनिल पाटील (जयपूर बिग पॅँथर संघ) या महाराष्टÑ पोलीस दलातील खेळाडंूना प्रकाश पाटील यांनीच प्रशिक्षण दिले. गेले काही महिन्यांत हे खेळाडू कोल्हापूरमध्ये सरावासाठी येत होते. ते वडणगेतील जय किसान मंडळाच्या पटांगणावर दररोज तीन तास सराव करत होते, असे प्रकाश पाटील सांगतात.
प्रकाश पाटील यांनी सांगितले की, मैदानावर अनेक चांगले खेळाडू घडलेत व आजही घडत आहेत. आपापल्या क्षेत्रात नावलौकिक वाढवित आहेत. या मंडळाचे अध्यक्ष बी. एच. पाटील हे खेळातील गुरू आहेत. त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी सांगितलेली तत्त्वे कधीही विसरलो नाही. आज जो मी आहे, तो निव्वळ जय किसान क्रीडा मंडळामुळे आहे. नियमित सराव, गुरूंची शिकवण, खेळातील जिद्द व चिकाटीमुळे आजपर्यंतचे यश मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात.