कोल्हापुरात बंदला हिंसक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 12:57am

कोल्हापूर : देशाला अस्पृश्यता निवारणाचा संदेश देणाºया राजर्षी शाहू महाराजांच्या करवीरनगरीत बुधवारी केवळ अघटितच घडले नाही, तर येथील फुले-शाहू-आंबेडकर यांच्या वैचारिक परंपरेलाही काळिमा फासणारी घटना घडली. भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्याकरिता रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांनी अक्षरश: धुडगुस घालत बंद असलेल्या दुकानांवर, वाहनांवर, पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी ...

कोल्हापूर : देशाला अस्पृश्यता निवारणाचा संदेश देणाºया राजर्षी शाहू महाराजांच्या करवीरनगरीत बुधवारी केवळ अघटितच घडले नाही, तर येथील फुले-शाहू-आंबेडकर यांच्या वैचारिक परंपरेलाही काळिमा फासणारी घटना घडली. भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्याकरिता रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांनी अक्षरश: धुडगुस घालत बंद असलेल्या दुकानांवर, वाहनांवर, पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रतिमोर्चा काढला. त्यामुळे शहरात दिवसभर प्रचंड तणाव राहिला. सीपीआर चौकात दोन्ही गट आमने-सामने आले. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर केला. दिवसभराच्या बंदमध्ये ५ पोलिसांसह १३ कार्यकर्तेही रक्तबंबाळ झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. सीपीआर चौकात दोन समाज समोरासमोर आल्याने दोन्ही बाजंूकडून प्रचंड दगडफेक झाली. पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने जमाव हिंसक बनला. बंद काळात दोनशेहून अधिक मोटारसायकली; तसेच कारचीही मोडतोड करून प्रचंड नुकसान करण्यात आले. हातात दगड आणि दांडकी घेऊन फिरणारे कार्यकर्ते त्यांना आवर घालायला कोणही नेता नाही आणि पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत यामुळे आपण कोल्हापुरात आहोत की काश्मीरमध्ये असा प्रश्न पडावा, असे चित्र कोल्हापुरात होते. कोल्हापूरला फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा आहे. याच विचारांचा पुरस्कार करणारे कार्यकर्ते मात्र बुधवारी हिंसक बनले आणि त्यांनी संपूर्ण शहराला वेठीस धरले. एवढेच नाही तर भीमसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तीन ठिकाणी समोरासमोर आल्याने एकमेकांवर दगडांचा वर्षाव झाला. त्यातून पोलीस कर्मचारी, अधिकारीही सुटले नाहीत. पोलिसांना प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी जोरदार लाठीमार करावा लागला. बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची वाहनेही जमावाच्या तावडीतून सुटली नाहीत. शेकडो दुचाकी, चारचाकी वाहनांचे बुधवारच्या दंगलीत नुकसान झाले. भीमा कोरेगाव येथील दंगलीचे पडसाद मंगळवारीच (दि. २) कोल्हापुरात उमटले. या घटनेचा निषेध करण्याकरिता जिल्'ातील भीमसैनिक कार्यकर्त्यांनी बुधवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली. आंबेडकरवादी समाजाच्या सर्वच स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. करवीरवासीयांनीही आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला होता. रस्त्यावर रिक्षा व के.एम.टी. धावत नव्हती. शाळा बंद होत्या. एस. टी. वाहतूकही बंद होती. रस्त्यावर तुरळक गर्दी होती; परंतु त्यानंतर संतप्त जमावांकडून मुख्यत: गळ्यात निळे झेंडे घालून विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांकडून तोडफोडीला सुरुवात झाली. गुजरी परिसर व शाहूपुरीच्या दोन गल्ल्या जमावाच्या हल्ल्याच्या बळी ठरल्या. रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारसायकली व कारही या जमावाने मोठ-मोठे दगड टाकून फोडल्या. या वाहनांचा चक्काचूर केला. आमचा तुमच्या बंदला पाठिंबा आहे आणि तुम्ही दारात लावलेली वाहने का फोडताय, अशी विचारणा स्थानिक नागरिक करत होते. त्यातून वातावरण तापत गेले. ही गोष्ट काहींनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना सांगितली. ते शिवाजी चौकात आले. त्यामुळे हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते अधिक संघटित झाले. त्यानंतर हा सुमारे पाच-सहा हजार संतप्त तरुणांचा जमाव बिंदू चौकातून दसरा चौकाकडे धावला. स्वयंभू गणेश मंदिराच्या समोरच हा जमाव समोरासमोर येऊन प्रचंड दगडफेक केली. तिथे पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला. पुन्हा हा जमाव दोन तास सीपीआर चौकात थांबून राहिला. प्रचंड तणाव होता. पलीकडे सिद्धार्थनगरातही भीमसैनिक थांबून होते. काय होईल सांगता येत नाही, अशी स्थिती होती; परंतु अशाही स्थितीत पोलिसांनी दोन तास नुसतेच आवाहन केले. शेवटी ४.२० वाजता अश्रूधुराच्या कांड्या फोडून लाठीमार केल्यावर जमाव पांगला व परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर शहरातील व्यवहारही तासाभरात सुरळीत झाले. पोलिसांनी झेलले अंगावर दगड हातामध्ये काठ्या, हॉकी स्टिक, लोखंडी गज घेऊन रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून कोणत्याही क्षणी काय होईल याची शाश्वती नव्हती. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, अनिल गुजर, दिनकर मोहिते, अशोक धुमाळ, संजय साळुंखे, संजय मोरे, शशिराज पाटोळे, सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, युवराज खाडे यांच्यासह महिला व पुरुष कॉस्टेबलनी जिवाची पर्वा न करता दोन्ही समाजांकडून भिरकावलेले दगड अंगावर झेलले. आज कोल्हापूर बंद नाही.. बुधवारी कोल्हापुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आज, गुरुवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली होती; पण समाज-समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, यासाठी आजचा बंद मागे घेत असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकातून दिली. इंटरनेट सेवा बंद कोल्हापूरमधील ‘बंद’ला बुधवारी हिंसक वळण लागले. त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण व चित्रफिती इंटरनेटद्वारे अथवा प्रसारमाध्यमे व अन्य सामाजिक माध्यमे, आदींद्वारे प्रसारित करून समाजात अस्थिरता निर्माण केली जाऊ शकते. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून बुधवारी रात्री आठ ते आज, गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा प्रक्षेपण व वहन, आदींवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. याबाबतचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी बुधवारी काढला आहे. ‘लोकमत’चे शांततेचे आवाहन कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्म आणि कर्मभूमी आहे. या राजाने देशाला समतेचा विचार दिला. कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचे शहर म्हणून देशभर ओळखले जाते. या परंपरेला गालबोट लागेल, अशा काही घटना बुधवारी घडल्या. त्याला कोण जबाबदार आहे, याची शहानिशा करण्याची ही वेळ नाही. जे झाले ते मागे टाकून सर्वांनी एकोपा आणि सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे. या शहराला आजपर्यंत कधीच जातीय, धार्मिक दंगलींचा इतिहास नाही. उलट, सर्व जातिधर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहणारे आणि एकमेकांना आधार देणारे हे शहर आहे. तीच ओळख माणूस म्हणून आपल्याला पुढे नेणारी आहे. तेव्हा सर्व समाजबांधवांनी संयम राखून कटुता संपेल, असे प्रयत्न करावेत. शांतता राखावी, असे आवाहन ‘लोकमत’ समूहातर्फे करण्यात येत आहे. -संपादक

संबंधित

कोल्हापूर : बालकांच्या आरोग्य बांधीलकीबद्दल सरकारवरील संशयास वाव : पी. चिदंबरम
सांगलीच्या दूषित पाण्याचा शिरोळ तालुक्याला फटका, पंचगंगेपाठोपाठ कृष्णा नदीही प्रदूषित : भाजीपाल्यांवरील कीटकनाशके, औषधांमुळेही आरोग्य धोक्यात
‘नाबार्ड’ने दिले.. शासनाने अडविले..! पुनर्वसनासह धरणही रखडले : वीस वर्षांत एकही बंधारा नाही; लाभक्षेत्रातील शेतकºयांना कसे मिळणार पाणी ?
कोल्हापूर : दाभोलकर प्रकरणातील दोषरोपपत्राचेच पानसरे खटल्यात सीबीआयचे कॉपी पेस्ट, शनिवारी पुन्हा सुनावणी
साखरेचे दर तीन हजारांच्या आत साखर उद्योग संकटात : ‘एफआरपी’ देणेही अवघड; सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी

कोल्हापूर कडून आणखी

कोल्हापूरकर उद्या धावणार; शहरात ‘प्रोमो-रन’, ‘लोकमत महामॅरेथॉन’ चा वाजणार बिगुल; नाव नोंदणी सुरु
बंदोबस्तावरील जवानांचा रंगला कौतुक सोहळा जुना बुधवार पेठेने व्यक्त केली कृतज्ञता : पुष्पगुच्छ आणि कोल्हापुरी भगवा फेटा प्रदान
सांगलीच्या दूषित पाण्याचा शिरोळ तालुक्याला फटका, पंचगंगेपाठोपाठ कृष्णा नदीही प्रदूषित : भाजीपाल्यांवरील कीटकनाशके, औषधांमुळेही आरोग्य धोक्यात
‘नाबार्ड’ने दिले.. शासनाने अडविले..! पुनर्वसनासह धरणही रखडले : वीस वर्षांत एकही बंधारा नाही; लाभक्षेत्रातील शेतकºयांना कसे मिळणार पाणी ?
कोल्हापूर : कर्जमाफीच्या ५३ हजार खातेदारांच्या पिवळ्या यादीत चार हजारच पात्र?,पडताळणीचे काम अंतिम टप्यात

आणखी वाचा