इचलकरंजीसाठी वारणा नळ योजना दिवास्वप्नच :राजकीय अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:00 AM2018-09-03T00:00:43+5:302018-09-03T00:03:05+5:30

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा अशा दोन योजना असूनही गळती व पंपांची क्षमता कमी झाल्याने आवश्यक असलेल्या ५४ दशलक्ष लिटर पाण्याऐवजी ६० टक्के पाणीपुरवठा होतो. त्यासाठी वारणा नळ योजना

 Varna tap program for Ichalkaranji | इचलकरंजीसाठी वारणा नळ योजना दिवास्वप्नच :राजकीय अनास्था

इचलकरंजीसाठी वारणा नळ योजना दिवास्वप्नच :राजकीय अनास्था

Next
ठळक मुद्देदोन योजना; पण तीन दिवसांतून एकवेळ पाणी

राजाराम पाटील ।
इचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा अशा दोन योजना असूनही गळती व पंपांची क्षमता कमी झाल्याने आवश्यक असलेल्या ५४ दशलक्ष लिटर पाण्याऐवजी ६० टक्के पाणीपुरवठा होतो. त्यासाठी वारणा नळ योजना प्रस्तावित असूनही तिला होणारा विरोध पाहता शाश्वत व शुद्ध पाणी दररोज मिळणे हे शहरवासीयांसाठी सध्यातरी दिवास्वप्नच आहे. परिणामी, पावसाळ्यात सुद्धा इचलकरंजीकरांना तीन दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होत आहे.

पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा करण्याची नळ योजना संस्थानकालीन आहे. त्यावेळी इचलकरंजीत विविध ठिकाणी जमिनीत व जमिनीवर बांधलेल्या हौदातून नागरिक घरी पाणी नेत असत. अशा प्रकारे महादेव मंदिर, मुजुमदार, फडणीस, गणपती, नारायण, आदी ठिकाणी दगडी बांधलेले हौद होते. तर मोठे तळे याठिकाणी सुद्धा पाण्याची सोय केली होती.

साधारणत: ५० वर्षांपूर्वी नगरपालिकेने नळाद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला. पाणीपुरवठ्यासाठी पंचगंगा नदीवरील जॅकवेलवर १२५ अश्वशक्तीचे दोन पाणी उपसा पंप आहेत. मात्र, पंप जुने झाल्याने त्यांची क्षमता कमी झाली आहे. २५ वर्षांपूर्वीपासून पंचगंगा नदी प्रदूषित झाली आणि कृष्णा नदीवरून मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित झाली. कृष्णा योजनेची दाबनलिका सडली असून, तिला वारंवार गळती लागत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी ही योजना अनेकवेळा बंद ठेवावी लागते, तर पंपांचीही क्षमता कमी झाली. त्यामुळे दोन्ही नळ योजनांतून ३५ दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते आहे. म्हणून इचलकरंजीसाठी शुद्ध व शाश्वत पाणी मिळावे म्हणून दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणारी नळ योजना शासनाने मंजूर केली.

मात्र, या योजनेला तीव्र विरोध झाला. मे महिन्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत वारणा योजनेसाठी दानोळीऐवजी कोथळी येथून पाणी उपसा करण्याचे ठरविण्यात आले. ही योजना पूर्ण होईपर्यंत गळकी असलेल्या कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलणे हा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे ताबडतोब द्यावा, असे निर्देश मंत्र्यांनी दिले. त्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी कृष्णा योजनेची अकरा किलोमीटर लांबीची दाबनलिका व एक पंप बदलणे, अशा २६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास जीवन प्राधिकरणने तांत्रिक मंजुरी दिली आहे. आता कोथळी येथून सुद्धा पाण्याचा उपसा करण्यासाठी विरोध होऊ लागला आहे.

कृष्णेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न
कृष्णा नळ योजनेची दाबनलिका व पंप बदलणे आणि दाबनलिकेसाठी पंचगंगा नदीवर पूल बांधणे, अशा प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. आता हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे तातडीने पाठविण्यात येईल आणि या प्रस्तावास त्वरित मंजुरी मिळावी, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतील. जेणेकरून नजीकच्या पाच-सहा महिन्यांमध्ये कृष्णा नळ योजना पूर्ण क्षमतेने चालू होईल. याकरिता पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती जलअभियंता अजय साळुंखे यांनी सांगितले.

Web Title:  Varna tap program for Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.