‘चौगले’ आडनावाबाबत अजूनही हीनता, चुकीची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:59 AM2018-06-22T00:59:23+5:302018-06-22T00:59:23+5:30

There is still a laxity, misconception about the 'chaugale' surname | ‘चौगले’ आडनावाबाबत अजूनही हीनता, चुकीची भावना

‘चौगले’ आडनावाबाबत अजूनही हीनता, चुकीची भावना

googlenewsNext

विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठा समाजात ‘चौगले’ किंवा ‘चौगला’ आडनावाबाबत अजूनही हीनतेची भावना असून त्यामुळे या समाजातील मुला-मुलींची लग्ने ठरताना मोठी अडचण येत आहे. आपल्याच समाजातील ज्याच्या कनिष्ठतेबद्दल ठोस असा दाखला फारसा आढळून येत नाही, अशा समाजाबद्दल आजही अशी भावना बाळगणे हे खरेतर एकूण मराठा समाजाच्या पायातील लोखंडी बेडी बनून घट्ट बसली आहे.
गेल्याच आठवड्यात करवीर तालुक्यातील एका तरुणाने ठरलेले लग्न मोडले म्हणून आत्महत्या केली. ‘तुमचे आडनाव चौगले आहे म्हणून स्थळ आम्हाला पसंत नाही,’ असा निरोप त्यांना आल्याचे सांगण्यात येते. लग्न ठरल्याच्या आनंदात असताना असा निरोप आल्याने त्याचा ताण न सहन झाल्याने त्याने जीवनयात्राच संपवली. मागच्या दोन दिवसांपूर्वी याच तालुक्यातील एका गावातील कष्टकरी तरुणाचेही लग्न ठरत आले होते. त्याचे आडनाव ‘साळोखे ऊर्फ चौगले’. कागल तालुक्यातील मुलीच्या नातेवाइकांनी ‘साळोखे ऊर्फ चौगले’ असे आडनाव समजल्यावर अन्य सगळ्या गोष्टी पसंत असतानाही स्थळास नकार दिला. त्या मुलासही त्याचा मानसिक धक्का बसला.
ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे असून मुळात वधू-वर सूचक केंद्रात माहिती घ्यायला गेल्यावर ‘चौगले’ आडनाव असेल तर लोक बायोडाटाच हातात घ्यायला तयार नाहीत. त्यातही ‘चौगले’ आडनावाची सून करून आणतात; परंतु त्यांच्यात मुलगी द्यायला सहसा तयार नाहीत. पूर्वी गावगाड्यामध्ये पाटील, देशपांडे, इनामदार, मुसलमान व चौघला यांनाही मानकरी मानले गेले. काही ठिकाणी गावाची वेश राखण करणारा तो ‘चौघला’ असाही उल्लेख आढळतो. हे लोक मराठा समाजातीलच आहेत. त्यांचे गावात अळीला घर आहे. इतरांप्रमाणेच त्यांची शेतजमीन आहे म्हणजे तो देखील मराठा कुणबीच आहे.
कधी तरी कुठल्या शतकात त्यांच्याबद्दल एखादा अपसमज पसरला गेला व तोच धरून
आजही आपण अशा जातीतील उच्च-नीचतेच्या भिंतीला कवटाळून
बसणार असू तर ‘एक मराठा...
लाख मराठा...’ म्हणणे व्यर्थ
आहे.
हे जरूर बघा..
‘चौगले’ आडनाव असलेल्या मुलांमध्ये काही अनुवंशिक आजार असतील तर त्याबाबत जरूर हरकत घेतली जावी. त्याचे करिअर पाहावे. त्याचा रक्तगटही पाहावा. त्याची आर्थिक स्थिती, घरदार, सामाजिक वर्तन याबद्दल आग्रह धरावा व त्यानुसार अपेक्षापूर्ती होत नसेल तर जरूर स्थळ नाकारावे; परंतु निव्वळ ‘चौगले’ आडनाव आहे म्हणून स्थळ नाकारणे हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण मानले पाहिजे.
सुशिक्षितच जास्त अडाणी..
पूर्वीचे लोक ‘जाडे-भरडे बघा आणि सांभाळून घ्या,’ असे म्हणायचे परंतु आता शिकलेले लोकच जास्त अडाणी झाले असून ते कुळी, पदर, उच्च-नीचता याचा बाऊ करू लागले आहेत. त्यामुळे हा समाज पुढे निघाला आहे की मागे याचा विचार करण्याची गरज आहे.
उलटे चित्र..
लिंगायत-जैन समाजातही ‘चौगुले’ आडनावाचे लोक आहेत. लिंगायत समाजात हे आडनाव जास्त लोकांचे आहे; परंतु त्या समाजात ‘चौगुले’ आडनावाबाबत अशी भावना नाही. उलट त्या समाजात चौगुले यांना ‘पंचम’ म्हणजे उच्च कुळातील मानले जाते. आडनाव एकच परंतु दोन समाजात त्याबद्दल वेगवेगळी भावना आहे.

Web Title: There is still a laxity, misconception about the 'chaugale' surname

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.