साखरेचे दर तीन हजारांच्या आत साखर उद्योग संकटात : ‘एफआरपी’ देणेही अवघड; सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 07:02 PM2018-01-18T19:02:27+5:302018-01-18T19:02:54+5:30

कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर गेल्या दीड वर्षात प्रथमच तीन हजारांच्या आत आले आहेत. बुधवारी हा दर २९५० ते ३००० रुपये प्रतिक्ंिवटल इतका होता.

 Sugar industry crisis: Under three thousand sugar prices, it is difficult to give FRP; Government intervention demand | साखरेचे दर तीन हजारांच्या आत साखर उद्योग संकटात : ‘एफआरपी’ देणेही अवघड; सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी

साखरेचे दर तीन हजारांच्या आत साखर उद्योग संकटात : ‘एफआरपी’ देणेही अवघड; सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी

Next

चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर गेल्या दीड वर्षात प्रथमच तीन हजारांच्या आत आले आहेत. बुधवारी हा दर २९५० ते ३००० रुपये प्रतिक्ंिवटल इतका होता. यामुळे साखर कारखानदार चिंतेत आहेत. हे दर वाढण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पावले उचलली नाहीत, तर देशातील साखर उद्योगच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यंदा उसाचे उत्पादन चांगले असल्याने देशात चालू हंगामात २५१ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. साखरेची मागणीही जवळपास २५० लाख टन आहे. गतवर्षी साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा कमी म्हणजे २०३ लाख टन इतके झाले होते. परिणामी, गेल्यावर्षी साखरेचे घाऊक बाजारातील दर चार हजारांपर्यंत, तर किरकोळ बाजारातील दर प्रतिक्विंटल ४५०० रुपयांवर गेले होते. त्यावेळी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून विविध उपाययोजना केल्या आणि साखरेची दरवाढ रोखली. हे दर सरासरी ३५०० ते ३६०० रुपयांच्या दरम्यान राहतील आणि किरकोळ बाजारातील साखरेचे दर ४० ते ४२ रुपये किलो दरम्यान स्थिर राहतील, याची दक्षता घेतली होती.

साखरेचा शिल्लक साठा आणि चालू हंगामातील अपेक्षित उत्पादन लक्षात घेता यंदा साखरेचे दर आॅक्टोबरपासूनच घसरू लागले. ही घसरण ३५०० वरून २९५० रुपयांपर्यंत झाली आहे. ती १५ टक्क्यांहून अधिक आहे. यामुळे कारखान्यांना एफआरपी अधिक २०० रुपये हा दर देणे अवघड बनले आहे. ही घसरण अशीच चालू राहिली, तर देशातील साखर उद्योगच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यंदा गळीत हंगामाची सुरुवात शांततेत झाली होती. दर ३५०० रुपये प्रतिक्विंटल स्थिर असल्याने कारखानदारांनी शेतकरी संघटनेचा आग्रह मान्य करून एफआरपी अधिक २०० रुपये अशी तडजोड केली होती. यातील एफआरपी अधिक १०० रुपये पहिली उचल आणि पुढील १०० रुपये नंतर देण्याचे ठरले होते. यामुळे ऊस उत्पादकही खूश होते. दर स्थिर राहतील या अपक्षेने कारखानदारही बिनधास्त होते. मात्र, दरात घसरण सुरू होताच त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सरकारने पावले उचलावीत
साखरेच दर वाढण्यासाठी केंद्र सरकारने दुहेरी किंमत धोरण, बफर स्टॉक, निर्यात अनुदानासह विविध पावले उचलावीत, अशी मागणी कारखानदार करीत आहेत.

 

गेल्या वर्षी साखरेचे किरकोळ बाजारातील दर ४० ते ४२ रुपयांच्या वर जाऊ नयेत, यासाठी केंद्राने उपाययोजना करून घाऊक बाजारातील दर स्थिर ठेवण्यासाठी उपाय योजले होते. तशीच उपाययोजना आता दर घसरू नयेत, यासाठीही सरकारने केले पाहिजेत. अन्यथा, साखर कारखानदारीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत येईल.
- विजय औताडे,
साखर उद्योगातील तज्ज्ञ.

Web Title:  Sugar industry crisis: Under three thousand sugar prices, it is difficult to give FRP; Government intervention demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.