मतांच्या पिकासाठी पाणी सोडल्याने साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:42 AM2019-06-12T00:42:07+5:302019-06-12T00:43:25+5:30

शिल्लक पाण्यासह पावसाळ्याला सामोरे जाणारी जिल्ह्णातील धरणे यंदा मात्र पावसाळा सुरू होण्याआधीच कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या वारणा धरणात आठ टीएमसी पाणी शिल्लक राहत असताना यावर्षी सर्व लहान-मोठी ६७ धरणे मिळून केवळ सात टीएमसी पाणी शिल्लक आहे. धरणे मोकळी होण्यास कडक उन्हाळा, पाण्याची वाढलेली गरज,

Stocks ended due to drop of water for votes | मतांच्या पिकासाठी पाणी सोडल्याने साठा संपला

मतांच्या पिकासाठी पाणी सोडल्याने साठा संपला

Next
ठळक मुद्देलोकसभेचा परिणाम : चार मोठ्या धरणांत पाच टक्केच पाणी कोल्हापूर जिल्ह्यात केवळ आठ टक्के पाणीसाठा

नसिम सनदी ।

कोल्हापूर : शिल्लक पाण्यासह पावसाळ्याला सामोरे जाणारी जिल्ह्णातील धरणे यंदा मात्र पावसाळा सुरू होण्याआधीच कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या वारणा धरणात आठ टीएमसी पाणी शिल्लक राहत असताना यावर्षी सर्व लहान-मोठी ६७ धरणे मिळून केवळ सात टीएमसी पाणी शिल्लक आहे. धरणे मोकळी होण्यास कडक उन्हाळा, पाण्याची वाढलेली गरज, सिंचनाचे वाढीव क्षेत्र आणि बाष्पीभवन ही कारणे सांगितली जात असली तरी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून सोडलेल्या पाण्यामुळे ही स्थिती उदभवली आहे. एप्रिल महिन्यात नदी दुथडी भरून राहू दे, म्हणून लोकप्रतिनिधींनीच आग्रह धरल्याने पाटबंधारे खात्याने जलविसर्गात हात सैल सोडला. परिणामी आज धरणांनी पहिल्यांदाच तळ गाठला असून, मान्सून लवकर सुुरु झाला नाही तर जिल्ह्णाला पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार आहे.

राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी या चार मोठ्या धरणांत तर अवघा पाच टक्केच पाणीसाठा उरला आहे. आठवडाभरात तब्बल दोन टीएमसीने कमी होऊन तो ७.०७ टीएमसीवर आला आहे. मागील आठवड्यात तो ९.६७ टक्के होता. उपलब्ध पाणी या महिनाअखेरपर्यंत पुरेल असा पाटबंधारेचा दावा असला तरी वेगाने घट होत असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत; तथापि मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने सिंचनावरील भार हलका झाल्याने काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे. जिल्ह्णात चार मोठी, नऊ मध्यम आणि ५४ लघुपाटबंधारे प्रकल्पांची क्षमता ८७.५४ टीमएसी असली तरी आॅक्टोबर २०१८ अखेर प्रत्यक्षात ८४.६१ टीमएसी पाणीसाठा या धरणांमध्ये होता. ७८ टीएमसी पाण्याचा आतापर्यंत धरणातून विसर्ग झाला असून तो सिंचन, औद्योगिक आणि पिण्यासाठी वापरले गेले आहे. ‘वारणे’चे कृष्णेतून म्हैसाळला नऊ, तर दूधगंगेतून कर्नाटकला १५ टीएमसी पाणी देण्याचा करार आहे. ‘राधानगरी’चे पाणी कोल्हापूर शहराला सहा व इचलकरंजी शहरासाठी सहा याप्रमाणे १२ टीएमसी देण्याचे पूर्वीपासूनचेच धोरण आहे. त्याप्रमाणेच विसर्ग करण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. तथापि यावर्षी पाणीविसर्गाच्या वेळापत्रकावर लोकसभा निवडणुकीचा प्रभाव राहिल्याने लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे मार्च ते एप्रिल या महिन्यात धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी पाणीटंचाईची झळ लोकांना बसू नये म्हणून लोकप्रतिनिधीने नद्या दुथडी भरून कशा वाहतील याची दक्षता घेतली. धरणांतून विसर्ग कमी करू नये, अशी पत्रेच प्रत्येक लोकप्रतिनिधीने पाटबंधारे विभागाकडे पाठविली. परिणामी एप्रिल महिन्यात रोटेशन नसतानाही पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करावा लागला. मान्सून लांबणार असल्याचा अंदाज वर्तविला तरी यात सुधारणा झाली नाही. परिणामी धरणांनी वेगाने तळ गाठण्यास सुरुवात केली. आता हेच लोकप्रतिनिधी ‘पाणी सोडा’ म्हणून ‘पाटबंधारे’कडे आग्रह धरत आहेत. वारणा धरणातून नऊ टीएमसी पाणी म्हैसाळ योजनेला देण्याचा करार आहे; पण यावर्षी १३ टीएमसीपेक्षाही जास्त पाणी वारणेतून सोडण्यात आले. दूधगंगा धरणातून कर्नाटकला सहा टीमएसी पाणी सोडले जाते. यावर्षी ते आतापर्यंत सात टीमएसी सोडण्यात आले आहे.

करारापेक्षा जास्त पाणी दिले गेल्याने नागरिकांवर मात्र उपसाबंदीला सामोरे जावे लागले आहे. दूधगंगेतून वेदगंगेला सोडण्यात येणारे पाणी बंद केल्याने शेती संकटात आली आहे. वारणा खोºयातही उपसाबंदी लागू करून शेतीसाठी पाणी उचलण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वारणेत गेल्या वर्षी आजच्या घडीला ७.४० टीमएसी पाणी शिल्लक होते, ते आता केवळ १.४५ टक्के इतक्या नीचांकावर आले आहे. दूधगंगेची परिस्थितीही तशीच आहे. आज केवळ ०.४१ टक्के साठा शिल्लक आहे. गतवर्षी तो ४.९८ टक्के होता. आठवडाभरात ०.८८ वरून ०.४१ टक्के इतका निम्म्याने कमी झाला असून केवळ दोन टक्के साठा आहे.


१२ टीएमसी पाण्याची तूट
लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे विसर्ग वाढवविल्याचा फटका धरणातील साठ्यावर झाला असला तरी परतीचा पाऊस, वळीव आणि बाष्पीभवनही तुटीला कारणीभूत ठरले आहे. आॅक्टोबरपासून परतीचा पाऊस न झाल्याने तीन, वळीव न झाल्याने पाच आणि बाष्पीभवनामुळे चार अशी एकूण १२ टीएमसी पाण्याची तूट झाली आहे. त्यामुळेही धरणातील साठा कमी झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात केवळ आठ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा या चार मोठ्या धरणांमध्ये आजच्या घडीला केवळ ३.३४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मागील आठवड्यात हे प्रमाण ४.५२ टीएमसी इतके होते. आठवडाभरात १.१८ टीएमसी पाणी संपले आहे. हीच परिस्थिती कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे या नऊ मध्यम प्रकल्पांची आहे. येथेही केवळ ३.७३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मागील आठवड्यात हे प्रमाण ३.९९ टक्के होते. ५४ लघू प्रकल्पातील साठाही एक टीएमसीपर्यंत खाली आला आहे.


धरणांतील पाणीसाठा
धरण साठा टक्केवारी

तुळशी ०.७४ २३
राधानगरी ०.७४ १०
वारणा १.४५ ०५
दूधगंगा ०.४१ ०२
कासारी ०.३६ १३
कडवी ०.८७ ३५
कुंभी ०.६१ २३
पाटगाव ०.६२ १७
चिकोत्रा ०.४० २६
चित्री ०.२४ १३
जंमगहट्टी ०.१२ १०
घटप्रभा ०.४७ ३०
जांबरे ०.०२ ०२
कोदे ०.०२ ११

Web Title: Stocks ended due to drop of water for votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.