ठळक मुद्दे पहिल्याच नाटकाला रसिकांची गर्दी : ज्येष्ठ रंगकर्मी पवन खेबुडकर यांचा विशेष सत्कारकोल्हापुरात गेल्या सहा वर्षांपासून पुन्हा नव्याने सुरू झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सोमवारपासूनऔपचारिक उद्घाटनानंतर तिसरी घंटा वाजली आणि कोल्हापूरच्या यशोधरा पंचशील थिएटर

कोल्हापूर : रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सोमवारपासून ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली. आपल्या खुमासदार लेखणीने अवघ्या महाराष्ट्राला लोटपोट हसवणारे आणि साहित्य क्षेत्राला समृद्ध करणारे पु. लं. देशपांडे यांच्या ‘वटवट वटवट’ या पहिल्याच नाटकाला प्रेक्षकांनी गर्दी करत पुढचे अठरा दिवस चालणाºया नाट्यजल्लोषाची झलक दिली.

कोल्हापुरात गेल्या सहा वर्षांपासून पुन्हा नव्याने सुरू झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सोमवारपासून केशवराव भोसले नाट्यगृहात प्रारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी पवन खेबूडकर यांचा नाट्यक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार केला. व्यासपीठावर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुर्इंगडे, परीक्षक सुहास गिरकर, वसंत दातार, मानसी राणे, स्पर्धेचे समन्वयक मिलिंद अष्टेकर उपस्थित होते. यावेळी गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत ‘अग्निदिव्य’ नाटकात राजर्षी शाहू महाराजांची भूमिका सादर करताना रंगमंचावरच जगाचा निरोप घेतलेले सागर चौगुले यांना श्रद्धांजली वाहिली.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नाट्यगृहात गर्दी झाली. औपचारिक उद्घाटनानंतर तिसरी घंटा वाजली आणि कोल्हापूरच्या यशोधरा पंचशील थिएटर अकॅडमी या संस्थेने लेखक पु. लं. देशपांडेलिखित ‘वटवट वटवट’ नाटकाच्या सादरीकरणाला सुरुवात केली. सूत्रधार, सोंगाड्या, गण, वग अशा सादरीकरणातून मनोरंजनातून प्रबोधन करत हे नाटक पुढे सरकले.

निर्मिती खर्चाच्या रकमेत वाढ
राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेणाºया संघांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे नाट्य निर्मितीचा खर्च म्हणून तीन हजार रुपये दिले जातात. मात्र निर्मिती खर्च आणि कलाकारांच्या योगदानाच्या दृष्टीने पाहता ही रक्कम कमी होती. मात्र यंदाच्यावर्षीपासून या रकमेच वाढ करून निर्मिती खर्चाची रक्कम सहा हजार रुपये केल्याची माहिती समन्वयक मिलिंद अष्टेकर यांनी दिली.