मातीनंच केलं माझ्या आयुष्याचं सोनं

By admin | Published: June 27, 2014 01:10 AM2014-06-27T01:10:55+5:302014-06-27T01:12:48+5:30

गणपतराव आंदळकर यांची भावना : दिमाखदार सोहळ्यात शाहू पुरस्कार प्रदान

Soon the gold of my life | मातीनंच केलं माझ्या आयुष्याचं सोनं

मातीनंच केलं माझ्या आयुष्याचं सोनं

Next

कोल्हापूर : जन्म मातीत झाला, झालो मातीतच मोठे, कणाकणांत मातीच्या फुले प्राण माझा.. श्वास माझा.. तिच्यासाठीच जगावे, हाच खरा ध्यास माझा..या मातीनंच केलं माझ्या आयुष्याचं सोनं, किती घ्यावे किती द्यावे नाही फिटणार देणे...अशा शब्दांत हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांनी राजर्षी शाहू पुरस्काराबद्दलचे आणि कोल्हापूरच्या मातीचे ऋण व्यक्त केले.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार आज, गुरुवारी हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांना श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी आंदळकर यांनी भावना व्यक्त केल्या. शाहू स्मारक भवनात हा सोहळा झाला. आयुष्यभर तांबड्या मातीशी गुज करणाऱ्या या निधड्या छातीच्या मल्लाचा कोल्हापूरचा हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव झाला तेव्हा साऱ्या सभागृहाने उभे राहून टाळ्यांचा गजर केला. अध्यक्षस्थानी गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते. व्यासपीठावर आंदळकर यांच्या पत्नी सुनेत्रादेवी आंदळकर, जिल्हाधिकारी राजाराम माने, त्यांच्या पत्नी रंजना माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू अशोक भोईटे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते. रोख एक लाख, सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल, जरी फेटा असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आंदळकर यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या भावना स्नुषा ममता अभिजित आंदळकर यांनी वाचून दाखविल्या.
आंदळकर म्हणाले, ‘शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला शाहूरायांच्या नगरीने घडविले, म्हणून मी अनेक कुस्तीचे आखाडे जिंकलो. घरादाराची पर्वा न करता कुस्तीचा ध्यास घेतला. मला अनेक पुरस्कार मिळाले, पण राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने आयुष्य कृतार्थ झाले.’
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ‘आंदळकर यांंनी शाहूंची ही कुस्ती परंपरा पुढे नेली. सध्या तरुणांना क्रिकेटचे वेड असले तरी पारंपरिक खेळांकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे. या पारंपरिक खेळांना शासनाने आणि जनतेने प्रोत्साहन द्यायला हवे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘शाहू महाराज यांनी ज्या मल्लविद्येला प्रोत्साहन दिले त्या कोल्हापूरच्या मातीतल्या पैैलवानाला हा पुरस्कार दिला आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. प्रास्ताविकात डॉ. जयसिंगराव पवार यांनी शाहूंच्या कुस्तीप्रेमाची महती सांगितली. सुरुवात कवी सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेल्या शाहूगौरव गीताने झाली. शिवाजी विद्यापीठाच्या ललितकला विभागाच्या विद्यार्थिनींनी गीत गायिले. जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी स्वागत केले. श्रीमती रंजना माने यांच्या हस्ते सुनेत्रादेवी आंदळकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अशोक चौसाळकर यांनी मानपत्राचे वाचन केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Soon the gold of my life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.