सिंधुदुर्ग : हत्तींना पकडून माणसाळविण्यात येणार, आजरा येथे प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:25 PM2018-07-03T16:25:19+5:302018-07-03T16:28:30+5:30

गेल्या चार वर्षांपासून तिलारी खोऱ्यात माड व केळी बागायतींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या जंगली हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी या हत्तींना पकडून त्यांना माणसाळविण्याची संकल्पना वनविभागाच्या विचाराधीन आहे.

Sindhudurg: Elephants will be manned and trained at Azra | सिंधुदुर्ग : हत्तींना पकडून माणसाळविण्यात येणार, आजरा येथे प्रशिक्षण केंद्र

सिंधुदुर्ग : हत्तींना पकडून माणसाळविण्यात येणार, आजरा येथे प्रशिक्षण केंद्र

Next
ठळक मुद्दे हत्तींना पकडून माणसाळविण्यात येणार, आजरा येथे प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांना दिलासा;  वनविभागाचा वरिष्ठस्तरावर प्रस्ताव 

सिंधुदुर्ग : गेल्या चार वर्षांपासून तिलारी खोऱ्यात माड व केळी बागायतींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या जंगली हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी या हत्तींना पकडून त्यांना माणसाळविण्याची संकल्पना वनविभागाच्या विचाराधीन आहे.

या पकडलेल्या हत्तींना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील वनविभागाच्या मालकीच्या क्षेत्रात सोडून त्या ठिकाणच्या बंदिस्त जागेत त्यांना माणसाळविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वनविभागाने वरिष्ठ स्तरावर गेल्यावर्षीच पाठविला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिलारीतील हत्ती उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि पर्यायाने कोकणला हत्ती हा प्राणी दुर्मीळच! मात्र सन २००२ मध्ये कर्नाटकातून आलेल्या हत्तींनी तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सिंधुुदुर्गात हत्तींचे कुतूहल कमी झाले. दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथे प्रथम हत्तींनी प्रवेश केला आणि तेथूनच हत्तींचा प्रवास सुरू झाला.

भातशेती, केळी, पोफळी, माड बागायतींचे दर दिवशी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करीत या हत्तींनी थेट जिल्ह्याचे मुख्यालय असलेले ओरोस गाठले आणि हत्ती उपद्रवाची झळ संपूर्ण जिल्ह्याला बसली.

त्यानंतर पर्यटकांनाही हे हत्ती पाहण्यासाठी उपलब्ध होतील. हा एलिफंट कॅम्प पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरेल, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर गेल्यावर्षीच पाठविला असून, मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.

पकडलेल्या हत्तींना माणसाळविण्यासाठी आजराच का? तेथील जमीन निश्चित करण्यामागचे कारण काय? याबाबत पुराणिक यांना विचारले असता त्यांनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली. हत्तींना थंड वातावरण, सपाट-विस्तीर्ण जागा आवश्यक असते, जी आजऱ्यात उपलब्ध आहे. त्यांच्यासाठी तिलारीचा परिसर नैसर्गिक अधिवास होऊ शकत नाही.

तिलारीतील वातावरण उष्ण आहे. शिवाय जमीनही सपाट नाही. त्यामुळे हत्तींना माणसाळविण्यासाठी आजऱ्याचा परिसर आणि वातावरण पोषक आहे. शिवाय हत्तींचा लोकांनाही कोणताही त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.

मंत्र्यांकडून पाठपुरावा

पालकमंत्री दीपक केसरकर हत्ती प्रश्नाबाबत संवेदनशील आहेत. त्यांनाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी वनविभागाची योजना चांगली असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. लवकर हत्तींना पकडून माणसाळविण्यात येईल, असे ते म्हणाले.

Web Title: Sindhudurg: Elephants will be manned and trained at Azra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.