कागल येथे शक्तिप्रदर्शनाने शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:43 AM2018-02-20T00:43:06+5:302018-02-20T00:45:31+5:30

Shiv Jayanti exhibited with power at Kagal | कागल येथे शक्तिप्रदर्शनाने शिवजयंती

कागल येथे शक्तिप्रदर्शनाने शिवजयंती

Next

कागल : कागल शहरात युगपुरुष छत्रपती शिवरायांची जयंती अभूतपूर्व स्वरूपात सोमवारी साजरी करण्यात आली. शहरातील प्रमुख दोन राजकीय गटांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत ही जयंती साजरी केल्याने या सोहळ्याला अभूतपूर्व असे स्वरूप आले. दोन्ही बाजूंकडून उपस्थित असलेले मान्यवर नेते, कार्यकर्ते आणि तालुक्यातून आलेले समर्थक, देखावे, मिरवणूक, दौड, प्रचंड घोषणाबाजी यामुळे वातावरण ‘शिवमय’ झाले.

कागल नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे येथील बसस्थानक चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिषेक घालून जयंती साजरी करण्यात आली. माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या हस्ते हा अभिषेक घालून पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, नविद मुश्रीफ, भैया माने, रमेश माळी, आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंती लोकोत्सव समितीच्यावतीने पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, नवोदिता घाटगे यांच्या हस्ते उत्सवमूर्तीवर धार्मिक विधी आणि मंत्रोपच्चाराच्या गजरात अभिषेक घालण्यात आला. यावेळी श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे, नंदितादेवी घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, विशाल पाटील-मळगेकर, दीपक मगर, आदी प्रमुख उपस्थित होते.

शहरात रॅली, पदयात्रा
जयंती लोकोत्सव समितीतर्फे लक्ष्मी टेकडी येथून शिवज्योत आणि जलकुंभाची भव्य रॅली काढण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी ती आणली. उत्सवमूर्तीस अभिषेक झाल्यानंतर समरजितसिंह घाटगे हे बसस्थानक ते राम मंदिरापर्यंत चालत गेले, तर आ. हसन मुश्रीफ, भैया माने, युवराज पाटील हेदेखील बसस्थानक ते गैबी चौकापर्यंत चालत गेले. त्यांच्यापाठोपाठ हॉलीडेन इंग्लिश स्कूलची शोभायात्रा होती.

तणाव आणि उत्साही
जयंती सोहळा लोकोत्सव समितीने उभारलेल्या भव्य किल्ला प्रतिकृतीसमोर शाहिरी कार्यक्रम सुरू असताना राष्टÑवादी कॉँग्रेसचे समर्थक नगरपालिकेच्या सोहळ्यासाठी याच ठिकाणी आले. घोषणाबाजीमुळे वातावरण तापू लागले. त्यातच भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या निषेधाच्या घोषणा सुरू झाल्या. शेवटी भाजपाचे नगरसेवक विशाल पाटील-मळगेकर यांनी शांततेचे आवाहन करीत समितीच्यावतीने आ. मुश्रीफ, नगराध्यक्षा माळी यांचेही आम्ही स्वागत करीत आहोत, असे म्हणत ‘गुगली’ टाकली. यातून दोन्ही बाजूला उत्साह संचारला.

Web Title: Shiv Jayanti exhibited with power at Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.