स्वयंम् शाळेला लाभली ‘निखळ मैत्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:40 AM2018-07-17T00:40:22+5:302018-07-17T00:40:27+5:30

Self-reliance ' | स्वयंम् शाळेला लाभली ‘निखळ मैत्री’

स्वयंम् शाळेला लाभली ‘निखळ मैत्री’

Next


कोल्हापूर : गतिमंद मुलांना स्वयंनिर्भर बनविणाऱ्या स्वयंम्् विशेष मुलांच्या शाळेला निखळ मैत्री परिवाराने सोमवारी सव्वा लाखाची मदत दिली. या गु्रपच्या सदस्यांनी शाळेतील २५ मुलांचे आर्थिक पालकत्व स्वीकारले असून, ही रक्कम सोमवारी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. निखळ मैत्रीसह विविध व्यक्ती, संस्थांच्या पुढाकारातून गेल्या वीस दिवसांत ‘स्वयंम्’मधील ५० गतिमंद मुलांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च या मदतनिधीतून उभा राहिला आहे.
कसबा बावड्यातील न्याय संकुलाच्या मागील बाजूस इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने स्वयंम् विशेष गतिमंद मुलांची शाळा चालविली जाते. येथे सध्या १४५ मुले-मुली शिक्षण घेत आहेत. वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे व्यवस्थापनाला शाळेचा खर्च भागविणे अवघड जात आहे; त्यामुळे शाळेने दत्तक पालक योजना सुरू केली. याद्वारे केवळ पाच हजार रुपये भरून एका विद्यार्थ्याचे एका वर्षासाठीचे आर्थिक पालकत्व स्वीकारायचे आहे. याबाबतचे वृत्त २५ जूनला ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. ‘लोकमत’ने केलेल्या या आवाहनाला कोल्हापूरकरांनी प्रतिसाद दिला आणि शाळेकडे दातृत्वाचा ओघ सुरू झाला. गेल्या वीस दिवसांत विविध व्यक्ती व संस्थांनी २५ मुलांचे दत्तक पालकत्व स्वीकारले आहे.
शाळेला अर्थसाहाय्य मिळावे यासाठी निखळ मैत्री परिवार या गु्रपने शाळेवर चार मिनिटांचा विशेष व्हिडिओ तयार करून तो फेसबुक आणि व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवर पोस्ट केला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे, तर मुंबईसारख्या शहरातूनही अनेक व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आणि शाळेतील २५ गतिमंद मुलांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च मदतनिधीतून उभा राहिला. संस्थेने सोमवारी शाहू स्मारक भवनात आयोजित केलेल्या ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्यांच्या कार्यक्रमात शाळेचे खजिनदार महेंद्र परमार यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील, शाळेचे संचालक मनीष देशपांडे, मुख्याध्यापक प्रमोद भिसे, गु्रपचे अ‍ॅडमिन सरदार पाटील, किरण रणदिवे, मनोज सोरप, विजय तांबे, दिलीप अहुजा उपस्थित होते.
यावेळी सरदार पाटील म्हणाले, ‘लोकमत’मुळे आम्हाला शाळेची माहिती मिळाली आणि अधिकाधिक अर्थसाहाय्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. सोशल मीडियामुळे बातमी सर्वदूर पोहोचली आणि गु्रपच्या सदस्यांनी २५ मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला.
महेंद्र परमार यांनी ‘लोकमत’ आणि ‘निखळ मैत्री’ने केलेल्या मदतीबद्दल संस्था कायम ऋणी राहील, अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले. ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनीही ‘लोकमत’च्यावतीने सामाजिक उपक्रमात घेतला जाणारा पुढाकार व कोल्हापूरकरांची दातृत्वाची परंपरा याबद्दल मनोगत व्यक्त केले.
स्वीकारले दहा मुलांचे पालकत्व
कोल्हापुरातील निवृत्त अभियंता अशोक शिवराम सूर्यवंशी यांनी संस्थेतील दहा मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे, तर मुंबईचे सुनील पद्माकर आरोळे यांनीही मदत केली. कागल येथील प्रणीत चितारी या विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसाची रक्कम संस्थेला देण्याची इच्छा जाहीर केली. त्यानुसार वडील संजय चितारी यांच्यासह कुटुंबीयांनी यावेळी रक्कम दिली.
यांनी केले अर्थसाहाय्य
निखळ मैत्री गु्रप, एस.टी.मधील सुरक्षा रक्षक आनंदा केरबा पाटील, लेखापरीक्षक जितेंद्र कानकेकर, भोई समाजाचे उपाध्यक्ष निखील उत्तम मुळे, आयर्नमॅन विनोद हरदास चंदवाणी, उद्योजक मुरलीभाई पंजानी, लखमीचंद कलानी, उदय नचिते, राजश्री निंबाळकर, म्हाळुंगेचे सरपंच प्रकाश चौगले, तेंडुलकर कंपनीचे मालक भरत तेंडुलकर, अनिता पाटील.

Web Title: Self-reliance '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.