कोल्हापुरातील बालकास स्क्रब टायफस, जिल्ह्यातील पहिला रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 04:44 AM2018-09-24T04:44:44+5:302018-09-24T04:45:14+5:30

सोनाळी (ता. कागल) येथील सात वर्षांच्या बालकाचा स्क्रब टायफस या रोगाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. प्रज्वल प्रभाकर कातोरे असे त्याचे नाव आहे.

scrub typhus in Kolhapur | कोल्हापुरातील बालकास स्क्रब टायफस, जिल्ह्यातील पहिला रुग्ण

कोल्हापुरातील बालकास स्क्रब टायफस, जिल्ह्यातील पहिला रुग्ण

googlenewsNext

बोरवडे - सोनाळी (ता. कागल) येथील सात वर्षांच्या बालकाचा स्क्रब टायफस या रोगाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. प्रज्वल प्रभाकर कातोरे असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच रुग्ण आहे. या रोगावर लस उपलब्ध नसल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत माहिती अशी, प्रज्वलला डोकेदुखी, गरगरणे, चक्कर येणे आणि ताप जास्त असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करूनदेखील ताप कमी येत नसल्याने त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले.
तेथे रक्त व लघवीचे नमुने तपासूनसुद्धा निदान झाले नाही. त्यामुळे हे नमुने मुंबईला पाठविले. तेथे प्रज्वलला स्क्रब टायफसची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले. त्यानंतर त्याच्यावर तातडीने योग्य उपचार सुरु करण्यात आले असून, प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.
गावामध्ये आरोग्य विभागाचे एम. जी. वड, एस. डी. खाडे, एस. के. चिखले, आरोग्य सेविका एस. एस. आडसूळे , टी. ए. मोरे, एस. एस. आनुसे, मनीषा कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. ग्रामस्थांनी दाट झाडाझुडपांत जाऊ नये, पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले आहे.

ओरिएंटिया सुत्सुगामुशी बॅक्टेरियामुळे लागण
ओरिएंटिया सुत्सुगामुशी नामक बॅक्टेरियामुळे स्क्रब टायफस हा अतिशय गंभीर रोगाची लागण होते. रुग्णामध्ये डोकेदुखी, मेंदूज्वर, मळमळ, सुस्ती येणे, चालताना तोल जाणे अशी लक्षणे दिसतात. काही रुग्णांमध्ये किडनीचा, तर काहींना फुप्फुसाचा त्रास होतो.

कीटक चावल्यामुळे रोग पसरतो
शेतात काम करताना, गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करताना ट्रॉम्बिक्युलिड माइट अर्थात बारीक कीटक (चिगर) चावल्यामुळे या रोगाचे जंतू पसरतात. संक्रमित कीटक उंदरांना चावल्यामुळे उंदराच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. संक्रमित मोठे कीटक चावत नाही. ते जमिनीवरच असतात. बारीक कीटक जे अतिशय सूक्ष्म, डोळ्यांना दिसत नाहीत ते चावतात आणि या रोगाचा प्रसार होतो.

जपानमध्ये १८९९ मध्ये पहिला रुग्ण सापडला
माणसाला स्क्रब टायफस झाल्याची पहिल्यांदा १८९९ मध्ये जपानमध्ये नोंद आहे. भारतात दुसऱ्या महायुद्धाच्यावेळीच आसाममध्ये या रोगाच्या रुग्णाची नोंद झाली. भारत, पाकिस्तान युद्धाच्यावेळी १९६५ मध्ये या रोगाचे रुग्ण आढळले. परंतु, त्यानंतर हा आपल्या देशातून गायब झाला. १९९०मध्ये हा रोग परत आला आणि देहराडून येथे काही सैनिकांना या रोगाची लागण झाली. तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम या राज्यांत या रोगाचे रुग्ण अधिक आहेत.

या रोगाचे निदान होण्यासाठी कोल्हापूरमध्ये तपासणी यंत्रणा नाही. मुंबई येथे चाचणीसाठी रक्त व लघवीचे नमुने पाठवावे लागतात. त्यामुळे बराच कालावधी लागून रुग्णावर उपचार होण्यास विलंब होतो. त्यासाठी कोल्हापुरात या रोगाची चाचणी करण्यासाठी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. सुदैवाने माझा मुलगा डॉ. व्यंकटेश दीक्षित यांच्या प्रयत्नामुळे योग्य उपचार मिळाल्याने बचावला आहे.
- प्रभाकर कातोरे, वडील

Web Title: scrub typhus in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.