भाड्याच्या मिळकतींना घरफाळ्यात दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:45 AM2019-02-22T00:45:55+5:302019-02-22T00:48:53+5:30

शहरातील वाणिज्य वापरातील भाड्याने दिलेल्या मिळकतींचा घरफाळा कमी करण्यासंदर्भात सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही

Relief in property | भाड्याच्या मिळकतींना घरफाळ्यात दिलासा

कोल्हापुरातील वाणिज्य वापरातील भाड्याने दिलेल्या मिळकतींच्या घरफाळ्यासंदर्भात गुरुवारी महापालिकेत विविध पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक यांची संयुक्त बैठक महापौर सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी भूपाल शेटे, महादेव आडगुळे, आर. के. पोवार, संजय शेटे, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, जयंत पाटील, दिलीप पोवार, विलास वास्कर, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देस्थायी सभापतींचे आश्वासन : दर वाढण्यास कारणीभूत तांत्रिक चूक दूर करणार;कोल्हापूर महापालिकेत संयुक्त बैठक

कोल्हापूर : शहरातील वाणिज्य वापरातील भाड्याने दिलेल्या मिळकतींचा घरफाळा कमी करण्यासंदर्भात सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

भाड्याने दिलेल्या मिळकतींचा घरफाळा मालकाला मिळणाºया घरभाड्याच्या ७० ते ७५ टक्के असल्याने तो कमी करून द्यावा, अशी मागणी क्रिडाई, चेंबर आॅफ कॉमर्स, हॉटेल मालक असोसिएशन यांच्यासह अनेकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी स्थायी सभापती देशमुख यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अनेकांनी आपल्या सूचना मांडताना घरफाळा वाढलेला असून, त्यामुळे भाडेकरू मिळत नसल्याने मिळकतधारकांचे पर्यायाने शहराचे नुकसान होत आहे. रोजगारनिर्मिती होत नाही, अशी तक्रार मांडली.

भाड्याच्या मिळकतींचा घरफाळा जास्त असल्याचे मान्य करून, तो कमी करण्याची आमची भावना आहे. एका तांत्रिक चुकीचा फटका मिळकतधारकांना बसत आहे. त्यातून आम्हाला मार्ग काढायचा आहे; मात्र घरफाळा कसा कमी करायचा याबाबत आम्ही ( पान १ वरून) विचार करतोय. लोकांकडून सूचना याव्यात म्हणून ही बैठक आयोजित केली असल्याचे सभापती देशमुख यांनी सांगितले.
भांडवली मूल्यांवर आधारित घरफाळा आकारत असताना त्यामध्ये १२ महिन्यांचे भाडे धरण्याचे काहीच कारण नव्हते; त्यामुळे मिळकतधारकांवर वरवंटा फिरला गेला आहे. त्याचा फेरविचार करावा, असे अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी सांगितले. ज्या नियमानुसार घरफाळा आकारला जातो, त्यास शासनाची मान्यता घ्यायला पाहिजे होती, ती घेतलेली नाही. कारपेट एरिया सोडून बिल्टअप एरियावर घरफाळा घेता, तेही चुकीचे असल्याची बाब अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी निदर्शनास आणून दिली.

घरफाळा आकारताना काही तांत्रिक चूक झाली असेल, तर त्यासंबंधी चूक दुरुस्त करण्याचा अधिकार महापालिका प्रशासनास आहे. तो अधिकार आयुक्तांनी वापरावा आणि सभागृहाने त्यास मान्यता द्यावी. जे आपले उत्पन्नच नव्हते ते बुडेल अशी भीती बाळगण्याचेही कारण नाही, असे अ‍ॅड. अशोकराव साळोखे यांनी सांगितले. चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी घरफाळा आकारणी सूत्रातील भारांक कमी करा, अशी सूचना केली. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, परिवहन सभापती अभिजित चव्हाण, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, प्रा. जयंत पाटील, हरिभाई पटेल, किसन कल्याणकर उपस्थित होते.


प्रलंबित खटल्यामुळे नुकसान
महापालिका घरफाळ्याच्या वादाबाबत न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत. त्याबाबत तडजोडी केल्या, तर तत्काळ उत्पन्न वाढू शकते; परंतु आपले अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी केली.
देवलापूरकरांचे सादरीकरण
भाड्याच्या मिळकतींवर चुकीच्या पद्धतीने कशाप्रकारे घरफाळा लावला गेला आहे, याचे विस्तृत सादरीकरण ‘क्रिडाई’तर्फे दीपक देवलापूरकर यांनी बैठकीत केले. भाडेमूल्य धरल्यानंतर पुन्हा वार्षिक भाड्याचा विचार केल्यामुळे घोळ झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत झालेल्या सूचना
आर. के. पोवार- मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण करा. घरफाळा नाही अशा मिळकती शोधा.
आनंद माने-नव्या इमारतींना नवीन, तर जुन्या इमारतींना जुन्या रेडीरेकनरप्रमाणे घरफाळा घ्या.
राजेश लाटकर- घरफाळा चुकवेगिरी करणाऱ्यांना शोधण्यात प्रशासन अपयशी.
अनिल कदम- रेडीरेकनरचा दर ठरविण्याचा अधिकार आयुक्तांना दिला आहे, तो वापरा.
रामेश्वर पत्की- भाडे मूल्यावर घरफाळा घेत असताना भाड्याचा आग्रह धरूनका.


 

Web Title: Relief in property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.