कोल्हापुरात प्राध्यापकांची निदर्शने; शिवाजी विद्यापीठावर मंगळवारी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 05:37 PM2018-10-08T17:37:44+5:302018-10-08T17:39:20+5:30

विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाच्या १४ व्या दिवशी सोमवारी कोल्हापुरात प्राध्यापकांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

Professors' demonstrations in Kolhapur; Morcha on Shivaji University on Tuesday | कोल्हापुरात प्राध्यापकांची निदर्शने; शिवाजी विद्यापीठावर मंगळवारी मोर्चा

कोल्हापुरात सोमवारी टाऊन हॉल बागेत प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यासांठी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केली. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात प्राध्यापकांची निदर्शने; शिवाजी विद्यापीठावर मंगळवारी मोर्चाविद्यार्थी हित लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्याची मागणी

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाच्या १४ व्या दिवशी सोमवारी कोल्हापुरात प्राध्यापकांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

विद्यार्थीहित लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाबाबत तोडगा काढावा; त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन्सच्या (एम्फुक्टो) शिष्टमंडळासमवेत बैठक घ्यावी, अशी मागणी एम्फुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी यावेळी केली.

येथील टाऊनहॉल बागेत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा) तर्फे प्राध्यापकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रा. जाधव म्हणाले, राज्य सरकार प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत तोडगा काढत नसल्याने आंदोलन वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा जवळ येत आहेत.

अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेले नाहीत; त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीने या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी बैठक घ्यावी, अशी मागणी एम्फुक्टो करीत असूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत; त्यामुळे संप लांबण्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यास मुख्यमंत्री जबाबदार आहेत.

‘सुटा’चे ज्येष्ठ नेते प्रा. एस. जी. पाटील म्हणाले, प्राध्यापकांनी संघटितपणे आंदोलन करून सरकारवर दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. या मेळाव्यात आयटकचे नेते दिलीप पवार, प्रा. डॉ. मेघा पानसरे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

यानंतर उपस्थित प्राध्यापकांनी विविध मागण्यांबाबत आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केली. यावेळी ‘सुटा’चे कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर, डॉ. डी. एन. पाटील, अरुण पाटील, अरुण शिंदे, प्रकाश कुंभार, आर. जी. कोरबू, एस. ए. बोजगर, संतोष जेठीथोर, सयाजी पाटील, विजय देठे, आदी उपस्थित होते.

कुलगुरूंना निवेदन देणार

या आंदोलनाअंतर्गत  मंगळवारी सकाळी ११ वाजता सुटाच्यावतीने शिवाजी विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्व नियमित, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक सहभागी होणार आहेत. राजारामपुरीतील जनता बझारपासून मोर्चाला सुरुवात होईल.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर निदर्शने करून कुलगुरूंना निवेदन दिले जाणार आहे. बेमुदत कामबंद आंदोलनामुळे होत असलेले नुकसान सातत्याने सरकारला कळवावे. आंदोलनाबाबत मार्ग काढण्यासाठी सरकारला प्रवृत्त करावे, या मागण्या निवेदनाद्वारे केले जाणार असल्याची माहिती सुटाचे सहकार्यवाह डॉ. अरुण शिंदे यांनी दिली.

 

 

Web Title: Professors' demonstrations in Kolhapur; Morcha on Shivaji University on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.