शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची जडणघडण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:30 PM2019-03-20T13:30:17+5:302019-03-20T13:38:54+5:30

बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गोव्यात घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी १९९१मध्ये ते कोल्हापूरातील गंगावेश येथील गंगा आयुर्वेदीक कॉलेजमध्ये दाखल झाले.

Pramod Sawant obtained a BAMS degree from the Ganga Education Society's Ayurvedic Medical College in Kolhapur | शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची जडणघडण

शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची जडणघडण

Next
ठळक मुद्देशाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची जडणघडणशिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ची पदवी १९९७मध्ये त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले.

कोल्हापूर : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी शपथविधी झालेले डॉ. प्रमोद सावंत यांची राजकीय जडणघडण ही कोल्हापूरातून झाली आहे. या ठिकाणी वैद्यकिय शिक्षण घेताना त्यांनी जनरल सेक्रेटरी (जी.एस.) पदी निवडून येऊन आपल्यातील नेतृत्व गुणाची चुणूक दाखविली.

गोव्यातील छोट्याशा खेड्यात डॉ. सावंत यांचा जन्म झाला. वडील हे जनसंघाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्यावर घरातूनच राजकीय व सामाजिक कार्याचे धडे मिळाले. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गोव्यात घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी १९९१मध्ये ते कोल्हापूरातील गंगावेश येथील गंगा आयुर्वेदीक कॉलेजमध्ये दाखल झाले.

या काळात ते रंकाळा परिसरात भाड्याने राहीले. त्यांच्या नेतृत्व गुण ओळखून मित्र परिवाराने त्यांना १९९२मध्ये जनरल सेक्रेटरी पदाच्या निवडणुकीसाठी उभे केले. यामध्ये ते चांगल्या मतांनी विजयी झाले. त्यांच्या आयुष्यातील ही पहिली निवडणूक होती. या निमित्ताने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.

१९९७मध्ये त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ची पदवी घेतली. या काळात त्यांचा अनेकांशी ऋणानुबंध आला. ते अंबाबाईचे निस्सिम भक्त आहेत. दरवर्षी ते नवरात्रात न चुकता अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. तसेच ते आपल्या महाविद्यालयीन मित्र परिवारालाही आवर्जुन भेटतात. गप्पांचा फड रंगतो व जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

ते २०१२मध्ये पहिल्यांदा साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यावेळी कोल्हापूरातील त्यांच्या १९९७च्या बॅचने त्यांचा सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी होऊन विधानसभा सभापती झाल्यानंतरही कोल्हापूरात त्यांचा बॅचच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. ते मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने त्यांच्यावर विधानसभा अध्यक्ष आणि आता मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्याचे त्यांचे मित्र डॉ. रणजीत सावंत सांगतात.

ते कोल्हापूरात आल्यानंतर चर्चेवेळी नेहमीच मुख्यमंत्री पर्रिकरांचा विषय काढून त्यांच्या कामाचे कौैतुक करायचे. कोल्हापूरात आल्यावर ते आवर्जून माझ्या उचगाव येथील निवासस्थानी रहायला यायचे,आमदार असतानाही ते आले होते. परंतु आत राजशिष्टाचारामुळे त्यांना ते शक्य होत नाही. परंतु आमच्या भेटी गाठी होत असतात असे रणजीत सावंत यांनी सांगितले.
----------------
आमचा वर्गमित्र हा गोव्याचा मुख्यमंत्री झाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. सर्वात तरुण व मनमिळाऊ असणारे हे मुख्यमंत्री नक्कीच चांगले काम करतील असा विश्वास आहे. त्यांचा लवकरच आम्ही कोल्हापूरात सत्कार करणार आहोत.
-डॉ.रणजीत सावंत, 
(मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कोल्हापूरातील मित्र)

Web Title: Pramod Sawant obtained a BAMS degree from the Ganga Education Society's Ayurvedic Medical College in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.