धान्यबाजारात व्यापारी संकुलाचे नियोजन - कोल्हापूर महापालिकेकडे आराखडे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:10 AM2019-01-17T01:10:48+5:302019-01-17T01:11:05+5:30

भारत चव्हाण । कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील धान्यबाजारात मोठे व्यापारी संकुल उभारण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा विचार असून, त्यासंबंधीचे आराखडेही तयार केले ...

Planning of a business complex in the grain market - Plans for Kolhapur Municipal Corporation | धान्यबाजारात व्यापारी संकुलाचे नियोजन - कोल्हापूर महापालिकेकडे आराखडे तयार

धान्यबाजारात व्यापारी संकुलाचे नियोजन - कोल्हापूर महापालिकेकडे आराखडे तयार

googlenewsNext
ठळक मुद्देपार्किंगचा प्रश्न सुटणार; खर्चाचे अंदाजपत्रक नव्याने होणार

भारत चव्हाण ।
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील धान्यबाजारात मोठे व्यापारी संकुल उभारण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा विचार असून, त्यासंबंधीचे आराखडेही तयार केले गेले आहेत. धान्यबाजार मार्केट यार्डात स्थलांतरित झाल्यानंतर आराखड्याची फाईल पुन्हा चर्चेत आली आहे. या नियोजित व्यापारी संकुलामुळे लक्ष्मीपुरीसारख्या गजबजलेल्या परिसराला एक चांगली शिस्त लागण्यास मदत होणार असून, पार्किंगचा प्रश्नही कायमचा सुटणार आहे.

लक्ष्मीपुरीतील जयधवल बिल्डिंग ते चांदणी चौक, फोर्ड कॉर्नर ते श्रमिक हॉल आणि राज हॉटेल ते जयधवल बिल्डिंग चौकदरम्यानच्या बाजारपेठेतील हातगाड्यांचे जाळे, विक्रेत्यांनी मांडलेला बाजार, अनियंत्रित वाहतूक, दुकानदारांचे अतिक्रमण, स्कॅ्र प मार्केट, वाहनदुरुस्ती करणारे गॅरेजवाले यांच्यामुळे शहराच्या मध्यवस्तीतील हा परिसर अक्षरश: बेशिस्तीचा आणि प्रचंड गर्दीचा झाला आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. या परिसरात महापालिकेच्या मालकीची सुमारे २० हजार चौरस फूट इतकी जागा असून त्यावर सुमारे ४० वर्षांपासून ५४ दुकानगाळे आहेत.

धान्यबाजारामुळे दिवसभर मोठ्या अवजड ट्रकची ये-जा सुरू असल्यामुळे केवळ या परिसरातच वाहतुकीची कोंडी होत नव्हती; तर संपूर्ण शहरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मनावर घेऊन शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली. त्यामुळे परिसरातील वाहतुकीला काही प्रमाणात शिस्त लागली. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. आता महापालिका प्रशासनाने त्याहीपुढे जाऊन व्यापारी संकुल उभारले तर येथील दुकानदारांना शिस्त लागेल आणि पार्किंगचा मोठा प्रश्नही कायमचा सुटण्यास मदत होणार आहे.

महापालिका प्रशासनाने २०१३-१४ या आर्थिक वर्षात नगरसेविका ज्योत्स्ना बाळासाहेब मेढे यांच्या पुढाकारातून धान्यबाजारातील महापालिकेच्या मालकीच्या २० हजार चौरस फूट जागेवर व्यापारी संकुल उभारण्याकरिता आराखडे तयार केले आहेत. तेथील दुकानदारांना भाडेतत्त्वावर गाळे देण्याचा करारही संपला असल्याने त्याचा आधार घेऊन हे आराखडे, अंदाजपत्रक तयार केले; परंतु त्यातील काही व्यापारी प्रशासनाने दिलेल्या नोटिसीचा आधार घेऊन न्यायालयात गेले आणि स्थगिती मिळविली. त्यामुळे या प्रयत्नाला खीळ बसली.

चार वर्षांनंतर मात्र नियोजित व्यापारी संकुल पुन्हा चर्चेत आले आहे. धान्य दुकानदारांबरोबर केलेल्या कराराची मुदत संपली असल्याने गाळे ताब्यात घेऊन त्या ठिकाणच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याच्या मागणीला आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना गती आली आहे.चार वर्षांत बांधकाम खर्च वाढला असल्याने २०१४ मध्ये केलेल्या आराखड्याची मात्र किंमत वाढणार आहे. त्यामुळे खर्चाचे एस्टिमेट नव्याने तयार करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.

दोन गाळे विकले कोणी?
धान्यबाजारातील महापालिकेच्या मालकीच्या जागेतील ५४ दुकानगाळ्यांपैकी दोन दुकानगाळे परस्पर मालकी हक्काने विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. हा व्यवहार अधिकारी पातळीवर रीतसर करून दिला आहे; परंतु या व्यवहारास महासभेची, स्थायी समितीची अथवा आयुक्तांची मान्यता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोन गाळे विकले कोणी आणि कोणाच्या अधिकारात विकले, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
जर बेकायदेशीरपणे कोणी गाळे विकले असतील तर तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होऊ शकतो. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांचा छडा लावण्याची आवश्यकता आहे.
व्यापारी संकुलात जाणीवपूर्वक महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी खोडे घातल्याची चर्चाही महापालिकेत आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या प्रकरणात लक्ष घालणे अपेक्षित आहे.

व्यापारी संकुलाचा आराखडा
जागेचे एकूण क्षेत्रफळ - १९ हजार ९३० चौरस फूट.
चटई क्षेत्र - मध्यवस्तीतील जागा असल्याने चटई क्षेत्र २.
६२ हजार चौरस फुटांच्या बांधकामाचा आराखडा तयार.
२०१४ च्या ‘डीएसआर’प्रमाणे व्यापारी संकुलाची किंमत १४ कोटी.
 

लक्ष्मीपुरीत जर व्यापारी संकुल उभारले गेले तर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटणार आहेत. दुकानदार, विक्रेते, हातगाडीवाले यांना शिस्त लागणार आहे. सध्याचे ओंगळवाणे चित्र बदलणार आहे. महापालिका प्रशासनाचे वार्षिक उत्पन्नही वाढणार आहे. महापालिका प्रशासनाने स्वत: व्यापारी संकुल विकसित करावे, अशी आपली मागणी आहे.
- निलोफर आजरेकर, नगरसेविका, महापालिका

Web Title: Planning of a business complex in the grain market - Plans for Kolhapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.