Pawar's 'ND' Sangha Sangatha: Pvt. Patil's work is inspiring for the new generation | पवार यांच्या तोंडून ‘एन.डीं.’ची संघर्षगाथा- : प्रा. पाटील यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी
पवार यांच्या तोंडून ‘एन.डीं.’ची संघर्षगाथा- : प्रा. पाटील यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी

ठळक मुद्देशानदार सोहळ्यात कणबरकर पुरस्कार प्रदानआपल्या वैचारिक भूमिकेला त्यांनी कधीच बटा लागू दिला नाही.’

कोल्हापूर : समाजातील उपेक्षित आणि शेवटच्या माणसाच्या हितासाठी संघर्ष करणे, त्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हेच प्रा. एन. डी. पाटील यांच्या जीवनाचे सूत्र राहिले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी येथे काढले. एक शिक्षणतज्ज्ञ, एक कष्टकऱ्यांच्या चळवळीचा नेता, निष्कलंक राजकारणी, सीमा प्रश्नासाठी हाकेला धावून जाणारा हक्काचा माणूस अशी एन. डी. यांच्या चौफेर कर्तृत्वाची गाथाच पवार यांनी सूत्रबद्धपणे मांडली व त्यातून एन.डी. यांचा जीवनसंघर्षच त्यांनी नेमक्यापणाने उभा केला. एन.डी. जे महाराष्ट्राच्या सार्वनिक जीवनात जगले ते नव्या पिढीला कायमच मार्गदर्शक राहील, असे पवार यांनी सांगितले. नात्याने मेव्हणे-पाहुणे असलेल्या, परंतु वैचारिक व राजकीय भूमिका वेगळ््या असलेल्या पवार यांच्या हस्ते एन. डी.सर यांचा सत्कार होत असल्याने त्याबाबत जनमानसातही कुतूहल होते.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित शानदार समारंभात प्रा. एन. डी. पाटील यांना पवार यांच्या हस्ते प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार देऊन सन्मानित केले. दक्षिण महाराष्ट्रातून आलेले विविध स्तरांतील मान्यवर, चळवळीतील कार्यकर्ते, सीमालढ्यातील कार्यकर्ते ‘रयत’ परिवारातील सदस्य आणि एन. डी.प्रेमींनी यावेळी तुडुंब गर्दी केली होती. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

एन. डी. पाटील यांच्या चौफेर कार्याचा आढावा पवार यांनी अत्यंत अचूक शब्दांत मांडला. ते म्हणाले, ‘एन. डी. पाटील यांनी चोवीसहून अधिक वर्षे विधिमंडळात काम केले; परंतु या कालावधीत त्यांनी पदाचा उपयोग सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत यासाठीच केला. त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. स्वातंत्र्यानंतर समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधाºयांची विचारसरणी पुरेशी नाही, असे मानणारा एक वर्ग कॉँग्रेसमधून बाहेर पडला आणि त्यांनी ‘शेतकरी कामगार पक्षा’ची स्थापना केली. कोल्हापूर तर या पक्षाचे आगर होते. एन. डी. पाटील यांनी ही विचारसरणी स्वीकारली आणि आयुष्यभर ते या पक्षात कार्यरत आहेत. आपल्या वैचारिक भूमिकेला त्यांनी कधीच बटा लागू दिला नाही.’

विधिमंडळामध्ये त्यांच्या भाषणातील एक-एक शब्द कानांत कोरून ठेवला जायचा. कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता, संकुचित विचार न मांडता सामान्यांचे अश्रू पुसण्याची आग्रही मांडणी ते करत असत. विरोधी पक्षात असताना त्यांनी ज्या तडफेने सरकारला धारेवर धरले, त्याच तडफेने मंत्री झाल्यावर प्रशासन राबविले व सत्तेचा उपयोग समाजातील शेवटच्या माणसाच्या हिताकरिता केला. माझ्या मंत्रिमंडळामध्ये ते सहकारमंत्री होते तेव्हा सर्व बाजार समित्यांना त्यांनी शेतकºयांच्या मालाला योग्य किंमत देण्यासाठी आग्रह धरला. रात्री बारा-एक वाजता जाऊन त्यांनी कापसाचे चुकारे शेतकºयांना वेळेत मिळतात का याची खातरजमा करून घेतली. देशभरात कुठेही नसलेली ‘कापूस एकाधिकार योजना’ प्रभावीपणे राबविण्याचे काम एन. डी. पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत केले. आयुष्यामध्ये विविध महाविद्यालयांना महत्त्वाचे स्थान मिळवून देणाºया रा. कृ. कणबरकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार अशाच एका सामान्यांसाठी सर्वस्व अर्पण करणाºया व्यक्तीला दिला गेला याबद्दल मी विद्यापीठाचे आभार मानतो.

व्यासपीठावर सरोज पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते. डॉ. बी. एन. खोत यांनी प्रास्ताविक केले. कणबरकर कुटुंबीयांतर्फेही
प्रा. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या डॉ. भारती पाटील यांनी संपादित केलेल्या ‘कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, प्रा. एन. डी. पाटील यांचे जीवन म्हणजे मानवी मूल्यांची समरगाथा असून, त्यांना पुरस्कार देताना विद्यापीठाचाच गौरव झाला आहे. कार्यक्रमाला भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, वैभव नाईकवडी, प्रा. जे. एफ. पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, शिक्षण मंडळाचे सभापती अशोक जाधव, सुरेश शिपूरकर, व्यंकाप्पा पत्की, क्रांतिकुमार पाटील, ए. वाय. पाटील, भैया माने, आर. के. पोवार, भालबा विभूते यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

खणखणीत आवाजात ४० मिनिटे भाषण
काही दिवसांपूर्वी आवाज उमटत नसताना त्यातून बरे झालेल्या एन. डी. पाटील यांनी तब्बल ४० मिनिटे खणखणीत शब्दांत भाषण केले. त्यामध्ये वैचारिक स्पष्टता होती. उत्तम स्मरण होते. भाषण थोडे लांबले म्हणून त्यांना थांबण्याची विनंती पत्नी सरोज यांनी केली. त्यावर एन.डी यांनी त्यांच्या मूळ स्वभावानुसार ‘या विषयावर मला कुणाचा रेट चालत नाही; अगदी कुणाचा म्हणजे कुणाचाच!’ असे स्पष्ट करत भाषण सुरूच ठेवले. यावेळी उपस्थितांनी त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली. खैरमोडे या शिक्षकांबद्दल त्यांच्या मनात किती अपार श्रद्धा होती याचेच प्रत्यंतर त्यातून आले.

एन.डीं.चे खरे घर कोणते? : एन. डी. पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेविषयीच्या बांधीलकीविषयी बोलताना पवार म्हणाले, एन. डी. यांची दोन घरे आहेत. एक म्हणजे माझ्या बहिणीचे घर आणि दुसरे म्हणजे रयत शिक्षण संस्था. मात्र, त्यातील त्याचं खरं घर कुठलं, हे सांगता येणार नाही. पवार यांच्या या वाक्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.


रक्कम खैरमोडेंच्या स्मारकासाठी
१ लाख ५१ हजार रुपये, मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आवडते विद्यार्थी रामकृष्ण वेताळ खैरमोडे यांचे आष्टा (जि. सांगली) येथील शाळेत स्मारक व्हावे, अशी माझी इच्छा आहे, असे सांगत एन. डी. पाटील यांनी पुरस्काराचा निधी या स्मारकासाठी दिला. यावेळी पाटील यांच्या इच्छेनुसार यामध्ये ‘रयत’चे १० लाख रुपये घालून हे स्मारक उभारणार असल्याचे पवार आणि ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी जाहीर केले.

‘रयत’ माझा श्वास
सत्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करताना एन. डी. पाटील यांनी आपल्या उत्तम स्मरणशक्तीचा दाखला दिला. १९३९ च्या आठवणी सांगत त्यावेळचे वातावरणच त्यांनी आपल्या भाषणातून उभे केले. ते म्हणाले, रयत शिक्षण संस्था ही माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहेत. रयत माझा श्वास आहे, रयत माझा ध्यास आहे.

यांचा दिवस कधी ढळणार नाही
एन. डी. पाटील यांचा अनेकवेळा ‘नारायणराव’ असा उल्लेख करीत शरद पवार यांनी त्यांच्या अनेक आठवणी जागविल्या. भा. रा. तांबे यांच्या कवितेचा दाखला देत ‘यांचा (एन. डी.) दिवस कधी ढळणार नाही, विचारांचा मधुघट कधी रिता होणार नाही’ अशा काव्यमय शब्दांत पवार यांनी एन. डी. यांचे वर्णन केले.

बहिणीचा व्हिप चालला नाही, आमचा काय चालणार?
पवार म्हणाले, नारायणराव हे माझे मेहुणे, माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान आणि मी कुटुंबात लहान. मी मंत्रिमंडळात आणि हे विरोधी पक्षनेते. त्यामुळे त्यावेळी कठीण परिस्थिती होती.
जिथे आमच्या बहिणीचा व्हिप चालला नाही, तिथं आमचा व्हिप काय चालणार? आम्ही तसा कधी प्रयत्नही केला नाही, असे पवार म्हणताच जोरदार
हशा पिकला.


कोल्हापुरात शनिवारी शिवाजी विद्यापीठाच्यावतीने आयोजित शानदार समारंभात प्रा. एन. डी. पाटील यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सत्कारानंतर प्रा. एन. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सोबत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि सरोज पाटील उपस्थित होते. दुसºया छायाचित्रात प्रा. एन. डी. पाटील यांच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला समाजातील विविध स्तरांतील मान्यवर, कार्यकर्त्यांनी तुडुंब गर्दी केली होती.


Web Title: Pawar's 'ND' Sangha Sangatha: Pvt. Patil's work is inspiring for the new generation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.