निर्यातीला संधी, तरीही कारखान्यांचे ‘आस्ते कदम’ : बारा लाख टनांचे करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:08 AM2018-12-19T01:08:47+5:302018-12-19T01:13:41+5:30

अतिरिक्त साखरेच्या प्रश्नावर साखरेची निर्यात हाच उतारा आहे. आंतरराष्टÑीय बाजारातील स्थिती पाहता भारताला निर्यातीची संधीही चांगली आहे. आॅक्टोबरपासून आतापर्यंत सुमारे सहा लाख टन साखर निर्यातीचे करार झालेले आहेत

 Opportunity for exports, still the 'Aasta Kadam' of the factory: Contract of 12 lakh tonnes | निर्यातीला संधी, तरीही कारखान्यांचे ‘आस्ते कदम’ : बारा लाख टनांचे करार

निर्यातीला संधी, तरीही कारखान्यांचे ‘आस्ते कदम’ : बारा लाख टनांचे करार

Next
ठळक मुद्देप्रत्यक्षात २.१६ लाख टन साखरेची निर्यात डिेसेंबरमध्ये आणखी ३ लाख टन निर्यात होण्याची शक्यता

चंद्रकांत कित्तुरे।

कोल्हापूर : अतिरिक्त साखरेच्या प्रश्नावर साखरेची निर्यात हाच उतारा आहे. आंतरराष्टÑीय बाजारातील स्थिती पाहता भारताला निर्यातीची संधीही चांगली आहे. आॅक्टोबरपासून आतापर्यंत सुमारे सहा लाख टन साखर निर्यातीचे करार झालेले आहेत. त्यातील अवघी दोन लाख १५ हजार ९४९ मेट्रिक टन साखर आॅक्टोबर ,नोव्हेंबरमध्ये निर्यातीसाठी बाहेर पडली आहे. डिेसेंबरमध्ये आणखी ३ लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. हा वेग वाढविण्यासाठी आणि निर्यात कोटा पूर्ण करण्यासाठी गरज आहे इच्छाशक्तीची आणि कारखान्यांनी पुढाकार घेण्याची.

आंतरराष्टय बाजारातील सर्वांत मोठा साखर निर्यातदार देश असलेल्या ब्राझीलने यंदा साखरेचे उत्पादन सुमारे १०० लाख टनांनी कमी केले आहे. हा ऊस त्याने इथेनॉल निर्मितीकडे वळविला आहे. त्याचबरोबर थायलंड हाही एक मोठा साखर निर्यातदार देश आहे. तेथील साखरेचे उत्पादनही यंदा घटलेले आहे.

याउलट भारतात गत हंगामातील १०० लाख टन साखर नवा हंगाम सुरू होण्याच्या वेळेस शिल्लक होती. शिवाय या हंगामातही ३१५ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे यंदाही साखर अतिरिक्तच राहणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेले ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण करणे कारखानदारीसाठीही आवश्यक आहे.
सध्या न्यूयॉर्कच्या वायदे बाजारात साखरेचा दर मार्चसाठी १२.६५ सेंट प्रतिपौंडच्या आसपास आहे. म्हणजेच प्रतिकिलो १९ रुपयांच्या जवळपास दर मिळतो. त्यात केंद्राकडून मिळणारे अनुदान जमा केल्यास हा दर २८ रुपयांच्या आसपास जातो. भारतात सध्या साखरेचा किमान विक्री दर २९ रुपये प्रतिकिलो आहे. त्यापेक्षा एखादा रुपया कमी मिळत असला तरी भविष्यकाळाचा विचार करता या दराने साखर निर्यात करणे फायद्याचे आहे. कारण निर्यात न केल्यास द्याव्या लागणाऱ्या व्याजाची रक्कम यापेक्षा जादा होऊन साखर गोदामातच ठेवणे आतबट्ट्याचे ठरू शकते. त्यामुळे कारखान्यांनी पुढाकार घेऊन साखर निर्यात करायला हवी.

शिवाय ५० लाख टन साखरेची निर्यात झाल्यास साखर कारखान्यांना सुमारे १०० अब्ज रुपये मिळतील, असा अंदाज आहे.गेल्या अडीच महिन्यांत सुमारे बारा लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. ब्राझील आणि थायलंडचे साखर उत्पादन घटल्याने साखर आयातदार देश भारताकडे वळू लागले आहेत. त्यामध्ये चीनने सर्वाधिक स्वारस्य दाखवून २० लाख टन साखर खरेदीची तयारी दाखविली आहे.

याशिवाय शेजारील श्रीलंका, बांगलादेश, नेपाळसह इंडोनेशिया, मलेशिया, इराण, युनायटेड अरब अमिरात, आदी देशांची साखरेची गरज सुमारे १६० लाख टनांची आहे. त्यामुळे भारताला ५० लाख टनांचे लक्ष्य गाठणे सहज शक्य आहे. मात्र, यासाठी कारखान्यांनी पुढाकार घेऊन आंतरराष्टÑीय बाजाराला हवी तशी साखर निर्माण करून द्यायला हवी, तरच मागणी वाढून कारखान्यांना साखर निर्यातीची गोडी लागेल आणि कारखानदारीवरील अतिरिक्त साखरेच्या प्रश्नाची तीव्रताही कमी होईल.

अडीच महिन्यांत एक लाख ८० हजार टन साखरेची निर्यात
आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या आकडेवारीनुसार आॅक्टोबर , नोव्हेंबर या दोन महिन्यात प्रत्यक्षात देशभरातील साखर कारखाने आणि साखर रिफायनरींमधून निर्यातीसाठी दोन लाख १५ हजार ९४९ मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली आहे. यातील एक लाख ७९ हजार ८४९ टन साखरेची निर्यात झाली आहे. उर्वरित ३६ हजार ५२४ टन कच्ची साखर बंदरातील साखर रिफायनरीजकडे निर्यातीसाठी पाठविण्यात आली आहे.

श्रीलंकेचा वाटा ४७ टक्के
भारताने आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्या २० देशांना साखर निर्यात केली आहे. त्यामध्ये श्रीलंकेचा सर्वांत मोठा ४७ टक्के इतका वाटा आहे. प्रमुख पाच देशांना निर्यात झालेली साखर अशी..
देश निर्यात टन टक्के
श्रीलंका ८४,५३६.९० ४७
यूएई १६,८०१ .०० ९.३४
सोमालिया १५,३४०.०० ८.५३
सुदान ११,५५८.०० ६.३४
अफगाणिस्तान ११,०१८.४० ६.१३
इतर ४०,५९४.७० २२.५७
एकूण १,७९,८४९.०० १००

सुरुवातीला चालू हंगामात ३५५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, नंतर तो कमी करून ३१५ लाख टनांवर आणण्यात आला. यामुळे यंदा साखर उत्पादन कमी होते आहे असा समज करून घेऊन कारखान्यांनी साखर निर्यातीत ‘आस्ते कदम’ घेतले आहेत. मात्र, अंदाजापेक्षा ३० लाख टन साखर उत्पादन कमी झाले तरी गरजेपेक्षा ते जास्तच आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न कायम राहणार आहे हेही कारखान्यांनी लक्षात घेऊन साखर निर्यातीला गती द्यायला हवी.
 

साखर निर्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गती संथ दिसत असली तरी तिला आता गती आली आहे. डिेसेंबर अखेर पर्यत आणखी ३ लाख टन साखरेची निर्यात होवून हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यातील निर्यातीचा आकडा ५ लाख १५ हजार टनांवर जाण्याची शक्यता आहे.
- प्रफुल्ल विठ्ठलानी  अध्यक्ष , आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन

- समाप्त.

Web Title:  Opportunity for exports, still the 'Aasta Kadam' of the factory: Contract of 12 lakh tonnes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.