वर्षभरात निवडणुकांचा नुसता धुरळाच : राजकारण ढवळून निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 01:10 AM2019-05-28T01:10:33+5:302019-05-28T01:10:58+5:30

लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसतो न बसतो तोच विधानसभेचे बिगुल वाजणार आहे. येत्या वर्षभरात विधानसभेसह ‘गोकुळ’, जिल्हा मध्यवर्ती बॅँक, बाजार समितीसह बॅँका व अर्धा डझन साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये ‘गोकुळ’ आणि राजाराम साखर कारखान्याची निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

Only a few of the elections in the year: Dharmakara politics will come out | वर्षभरात निवडणुकांचा नुसता धुरळाच : राजकारण ढवळून निघणार

वर्षभरात निवडणुकांचा नुसता धुरळाच : राजकारण ढवळून निघणार

Next
ठळक मुद्देयावेळेला दोन्ही कॉँग्रेस विरोधात शिवसेना-भाजप असा सामना होण्याची शक्यता आहे

राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसतो न बसतो तोच विधानसभेचे बिगुल वाजणार आहे. येत्या वर्षभरात विधानसभेसह ‘गोकुळ’, जिल्हा मध्यवर्ती बॅँक, बाजार समितीसह बॅँका व अर्धा डझन साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये ‘गोकुळ’ आणि राजाराम साखर कारखान्याची निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीने गेले तीन-चार महिने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. या निवडणुकीची प्रक्रिया संपते तोच विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. विधानसभेसाठी जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी राहिला असून, सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागणार आहे; त्यामुळे निवडणुकीसाठी अवघे तीन महिने राहिले आहेत, त्यात पावसाचे दिवस असल्याने इच्छुक आतापासूनच तयारीला लागणार आहेत. नवीन मुख्यमंत्री विराजमान होतो न होतो, तोपर्यंत राजाराम साखर कारखान्याची निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. गेल्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यात निकराची झुंज झाली होती. यावेळेलाही येथे काटा लढत होईल, अशी परिस्थिती आहे. याच दरम्यान ‘गोकुळ’ची प्रक्रिया सुरू होईल. गेल्या वेळेला ‘राजाराम’चे पडसाद ‘गोकुळ’मध्ये उमटले होते. सतेज पाटील यांनी सर्व विरोधकांची मोट बांधत महाडिक व पी. एन. पाटील यांनाच आव्हान दिले. दोन जागा निवडून आणत पाटील यांनी सत्तारूढ गटाची पुरती दमछाक केली होती. गेल्या साडेचार वर्षांत पाटील यांनी मल्टिस्टेटसह विविध मुद्यांच्या माध्यमातून कोंडी केली आहे. जिल्ह्याची नवीन राजकीय समीकरणे पाहता विरोधकांची ताकद वाढल्याने येथे रंगतदार लढत पाहावयास मिळणार आहे.

‘गोकुळ’ संपते न संपते तेच जिल्हा बॅँकेची प्रक्रिया सुरू होते. गेल्या वेळेला दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित येऊन निवडणूक लढविल्याने बहुतांशी जागा बिनविरोध झाल्या होत्या. भाजपने आव्हान देण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या एकमेव पतसंस्था गटातून अनिल पाटील विजयी झाले. यावेळेला दोन्ही कॉँग्रेस विरोधात शिवसेना-भाजप असा सामना होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान प्राथमिक शिक्षक बॅँक, गव्हर्न्मेंट सर्व्हंटस बॅँकेची निवडणूक होणार आहे. शिक्षक बॅँकेत तिरंगी, तर गव्हर्न्मेंट सर्व्हंटस बॅँकेत दुरंगी लढत झाली. या वेळेलाही अशीच लढत होईल. ‘कोजिमाशि’ पतसंस्था, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची निवडणूक होत आहे. शेतकरी संघ व बाजार समितीची प्रक्रिया जून २०२० पासून सुरू होणार आहे.

‘वारणा’, ‘शरद’, ‘डी. वाय. पाटील’ या साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होत असल्याची तरी प्रक्रिया सुरू राहणार आहे. याच वर्षात ‘कुंभी’, ‘भोगावती’ व ‘बिद्री’त जोरदार सामना होणार आहे. एकंदरीत आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असून, सर्व प्रमुख संस्थांच्या निवडणुकांमुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.

विधानसभेसाठी जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी राहिला असून, सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागणार आहे; त्यात पावसाचे दिवस
असल्याने इच्छुक तयारीला लागणार आहेत.

संस्था निवडणूक प्रक्रिया
गोकुळ दूध संघ एप्रिल २०२०
जिल्हा बॅँक मे २०२०
बाजार समिती आॅगस्ट २०२०
प्राथमिक शिक्षक बॅँक एप्रिल २०२०
कोजिमाशि पतसंस्था एप्रिल २०२०
गव्हर्न्मेंट सर्व्हंटस बॅँक मार्च २०२०
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी मे २०२०
ग्रामसेवक पतसंस्था आॅगस्ट २०२०
शेतकरी संघ आॅगस्ट २०२०
राजाराम साखर कारखाना फेबु्रवारी २०२०
वारणा साखर कारखाना फेब्रुवारी २०२०
शरद साखर कारखाना फेबु्रवारी २०२०
डी. वाय. पाटील साखर कारखाना जानेवारी २०२०

Web Title: Only a few of the elections in the year: Dharmakara politics will come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.