पदभ्रमंतीचा जुना मार्ग-शिवा काशीद यांची समाधी-हिल रायडर्सची मोहीम गिनिज बुकमध्ये जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 10:55 PM2018-07-12T22:55:41+5:302018-07-12T22:57:27+5:30

 Old Street of Padmrinti-Shiva Kashid's Samadhi-Hill Riders campaign to go to Guinness Book | पदभ्रमंतीचा जुना मार्ग-शिवा काशीद यांची समाधी-हिल रायडर्सची मोहीम गिनिज बुकमध्ये जाणार

पदभ्रमंतीचा जुना मार्ग-शिवा काशीद यांची समाधी-हिल रायडर्सची मोहीम गिनिज बुकमध्ये जाणार

Next

-संदीप आडनाईक

शिवशौर्याने पावन झालेल्या पावनखिंडीच्या जुन्या मार्गाने काही संस्था ही मोहीम पूर्ण करतात. पांढरपाणी येथे जुनी फरसबंदी असलेली वाट साफ केली. इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. श्रीदत्त राऊत व शिवशौर्यच्या ट्रेकर्स श्रमदानाने कालांतराने लुप्त होत चाललेल्या पावनखिंड मार्गावर चालतात. या मार्गावर शिवकालीन मार्ग असा उल्लेख असलेला फलकही रस्त्याच्या कडेने लावण्यात आला आहे. याच गावात शिवाजी महाराजांनी विहीर बांधून दिली त्याचाही नामफलक तेथे आहे.

इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी टाकला
शिवा काशीद, बाजीप्रभूंच्या समाधीवर प्रकाश
पन्हाळ्याचे भूषण असलेले इतिहास संशोधक कै. मु. गो. गुळवणी यांनी हयातभर इतिहास संशोधनाचे काम केले. शिवकाळातील अनेक वीररत्नांच्या समाधीचा शोध त्यांनीच लावला. नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची विशाळगडावरील समाधी, जोत्याजी केसरकर यांची पुनाळ
(ता. पन्हाळा) येथील समाधी, संभाजी महाराजांचे टेहळणीचे ठिकाण असलेले बारद्वारी (बादेवाडी), पेठवडगाव येथील सेनापती धनाजी जाधव, कोल्हापूरचे पहिले छत्रपती शिवाजीराजे यांची समाधी तसेच यशवंतराव थोरात यांचे मंदिर, जोतिबावरील बगाड ही त्यांची काही मौलिक संशोधने होय.

शिवा काशीद यांची समाधी
शिवा काशीद यांचे थेट वंशज बापूसाहेब केदारी काशीद यांच्याकडून इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांना प्राथमिक माहिती मिळाली. त्यांच्या घराण्यात पूर्वापार न्हावकीचा धंदा असून त्यांना सर्व्हे नंबर ४७ चा हिस्सा २, ३, ४, ५ क्षेत्र १७ गुंठे ही जमीन नेबापुरात इनाम मिळाली आहे. ती न्हावकीची जमीन म्हणून ओळखली जाते. यावरून गुळवणी गुरुजींनी शिवा काशीद यांची समाधी शोधून काढली. ही समाधी एका मोठ्या जांभ्या दगडावर व्यवस्थित फोडून केलेल्या बैठकीवर एकावर एक अशी दोन मोठी दगडे ठेवून बांधलेली आहे. त्यावर महादेवाची पिंडी असून त्यावर शिवा का असे लिहिलेले आढळते. आजही शिवा काशीद यांचे तेरावे थेट वंशज रघुनाथ बापू काशीद आणि आनंदा रघुनाथ काशीद हे नेबापुरात शिवा काशीद यांच्या समाधीच्या मागे असणाऱ्या घरात राहतात.

हिल रायडर्सची मोहीम गिनिज बुकमध्ये जाणार
इंदूमती गणेश
पन्हाळगड-पावनखिंड मोहीम आता अनेक संस्थांकडून आयोजित केली जात असली तरी त्याची सुरुवात केली ती हिल रायडर्स या संस्थेने. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीला कळावा यासाठी सन १९८६ मध्ये मोहिमेला प्रारंभ झाला. पहिल्यावेळी शंभर मावळ्यांनिशी सुरू झालेला हा प्रवास आता ५१ वी मोहीम आणि एक हजार मावळ्यांवर आला आहे. या इतिहासाची उजळणी करताना समाजभान ठेवत वाटेवरील वाड्या-वस्त्यांचे, लहान गावांमधील जगण्याचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. संस्थेने चार गावे दत्तक घेतली असून तेथे आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य अशा सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक, ‘माईल स्टोन’सह मोहिमेत सहभागी होणाºया युवक-युवतींसाठी संस्थेच्या पुढाकारामुळे मोठा हॉल बांधण्यात आला आहे. ही मोहीम जगाच्या नकाशावर आणण्यासाठी गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.


महाराष्ट्रातील पहिली रात्र मोहीम केवळ स्वराज्याची गरज म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी जो धाडसी प्रयोग केला त्यासाठी त्यांनी निसर्गाचा पूर्ण अभ्यास केला होता. आषाढी पौर्णिमेची रात्र, तुफान पाऊस, जोडीला दाट धुके यामुळेच शत्रूला सुगावा लागण्याची शक्यता कमी. याच परिस्थितीचा फायदा उठवत शिवरायांनी विशाळगड गाठला. त्यांनी ज्या तिथीला रात्री हा प्रवास केला त्याच दिवशी गेली १५ वर्षे मैत्रेय प्रतिष्ठानची ‘किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड’ ही महाराष्ट्रातील पहिली रात्रमोहीम आयोजित केली जाते. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी ३५ वर्षांपूर्वी ही मोहीम सुरू केली. परंतु ती दिवसा होती. दोन दिवसांची होती. नंतर ती एक दिवसाची करण्यात आली; मात्र आता एका रात्रीत ४९ किलोमीटर अंतर कापणारी ही साहसी रात्रमोहीम लक्षवेधी ठरत आहे.

तयारी चार महिन्यांपासून आधी
पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमांची संख्या वाढत असताना त्यामध्ये सहभागी होणाºयांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये महिला आणि युवतीही मागे नाहीत; मात्र यासाठी या संयोजक संस्थांना आधी चार महिन्यांपासून तयारी करावी लागते. संपूर्ण मार्ग पायाखाली पाहून कुठे काही धोकादायक नैसर्गिक परिस्थिती नव्याने निर्माण झाली का याचा आढावा घ्यावा लागतो. यानंतर वैद्यकीय सेवेपासून ते भोजनापर्यंतचे नियोजन करावे लागते. हिल रायडर्सचे प्रमोद पाटील म्हणाले, संपूर्णपणे आडवाटेने असणारी ही मोहीम असल्याने आम्हाला सर्वबाजूंनी दक्षता घ्यावी लागते; त्यामुळे आधीपासूनच नियोजन सुरू होते. दरवर्षी आम्ही जात असल्याने आता अनेक गावांमध्ये कार्यकर्ते तयार झाले आहेत. त्यांचे सहकार्य लाभते. मुक्कामाची सोय, मधूनच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पर्यायी वाहन व्यवस्था, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक यांची तयारी केली जाते.
-समीर देशपांडे-

 

Web Title:  Old Street of Padmrinti-Shiva Kashid's Samadhi-Hill Riders campaign to go to Guinness Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.